दानीएल 4
4
नबुखद्नेस्सरचे झाडाचे स्वप्न
1नबुखद्नेस्सर राजाने,
जगातील सर्व राष्ट्रातील विविध भाषा बोलणार्या सर्व लोकांना जाहीरनामा पाठविला तो हा:
तुम्हा सर्वांची भरभराट होवो.
2परमोच्च परमेश्वराने मला जी चिन्हे व चमत्कार दाखविले ते तुम्ही सर्वांना सांगण्यात मला आनंद होत आहे.
3किती महान त्यांनी प्रकट केलेली चिन्हे,
किती थोर त्यांनी केलेले चमत्कार!
त्यांचे राज्य सदासर्वकाळचे आहे;
त्यांचे प्रभुत्व पिढ्यान् पिढ्या राहणारे आहेत.
4मी नबुखद्नेस्सर आपल्या महालात शांतीने, संतुष्टीचे आणि समृद्धीचे जीवन जगत होतो. 5मी एक स्वप्न पाहिले, जेव्हा मी माझ्या बिछान्यावर निजलेला होतो, ते चित्र आणि दृष्टान्त जे माझ्या मनात आले, त्यामुळे मी अतिशय भयभीत झालो. 6माझ्या स्वप्नाचा अर्थ काय ते कळावे या हेतूने मी बाबेलमधील सर्व ज्ञानी लोकांना आज्ञा दिली. 7जेव्हा जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, दैवप्रश्न सांगणारे आले, तेव्हा मी त्यांना माझे स्वप्न सांगितले, पण ते मला त्याचा अर्थ सांगू शकले नाही. 8अखेरीस दानीएल माझ्या उपस्थितीत आला आणि मी त्याला माझे स्वप्न सांगितले. (माझ्या देवाच्या नावावरून मी त्याचे बेलटशास्सर असे नाव ठेवले होते. याच माणसामध्ये पवित्र देवाचा आत्मा आहे.)
9मी म्हणालो, “हे बेलटशास्सर, धुरंधर जादुगारा, पवित्र देवाचा आत्मा तुझ्यामध्ये आहे हे मला ठाऊक आहे आणि तुझ्यासाठी कोणतेच रहस्य कठीण नाही. माझे हे स्वप्न आहे; मला त्याचा अर्थ सांग. 10मी माझ्या बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले: पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष लावलेला मी पाहिले. तो प्रचंड उंचच उंच होता. 11तो वृक्ष वाढला आणि मजबूत झाला आणि त्याचा शेंडा आकाशापर्यंत पोहोचला; पृथ्वीच्या सीमेपासूनही तो दिसू शकत होता. 12त्याची पाने हिरवीगार होती, त्याला फळे भरपूर होती आणि त्यामध्ये प्रत्येकासाठी भोजन होते. त्याच्या खाली जंगली पशू विसावले होते, आणि त्याच्या फांद्यांमध्ये पक्षी राहत असत; त्यांनी आपली घरटी बांधली. त्यातून प्रत्येक प्राण्याला खायला मिळत असे.
13“मी बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले की, स्वर्गातून एक पवित्र, एक दूत#4:13 किंवा पहारेकरी खाली येत आहे. 14त्याने मोठ्याने ओरडून सांगितले ‘हे वृक्ष तोडून टाका, फांद्या कापून टाका; पाने ओरबाडून काढा आणि फळे विखरून द्या. त्याच्या खालचे पशू निघून जावोत आणि फांद्यांवरील पक्षी उडून जावोत. 15परंतु त्याचा बुंधा व मुळे लोखंड व कास्याने बांधून सभोवतालच्या गवतात जमिनीवरच राहू द्या.
“ ‘आकाशातील दव पडून त्यास भिजू द्या आणि त्याला भूमीवरील गवतामध्ये पशूंसोबत राहू द्या. 16सात वर्षापर्यंत#4:16 किंवा सात वेळा, त्याचे माणसाचे मन बदलले जावो आणि त्याला पशूचे मन दिले जावो.
17“ ‘हा निर्णय दूतांद्वारे घोषित केला जातो, पवित्र लोक हा निर्णय जाहीर करतात, जेणेकरून जिवंतांना हे कळावे की जे परात्पर आहेत, ते पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च राज्यकर्ता आहेत आणि ज्याला ते इच्छितात, त्यांना ते देतात आणि त्यांच्यावर अगदी कनिष्ठाला नियुक्त करतात.’
18“हे स्वप्न आहे जे मी, राजा नबुखद्नेस्सरने पाहिले. हे बेलटशास्सर, आता याचा अर्थ काय तो मला सांग, कारण माझ्या राज्यात कोणताही ज्ञानी मनुष्य मला त्याचा अर्थ सांगू शकत नाही. फक्त तूच मला अर्थ सांगू शकशील, कारण पवित्र देवांचा आत्मा तुझ्यामध्ये आहे.”
दानीएल स्वप्नाचा अर्थ सांगतो
19नंतर दानीएल (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जात), काही वेळेसाठी व्याकूळ झाला आणि त्याचे विचार त्याला भयभीत करू लागले. म्हणून राजा म्हणाला, “हे बेलटशास्सर, माझे स्वप्न किंवा त्याचा अर्थ यामुळे भयभीत होऊ नको.”
तेव्हा बेलटशास्सराने (अर्थात् दानीएलाने) उत्तर दिले, “महाराज, जर हे स्वप्न तुमच्या शत्रूंवर आणि त्याचा अर्थ तुमच्या विरोधकांवर ओढवला असता, तर किती बरे झाले असते! 20तुम्ही पाहिलेले वृक्ष, जे वाढले आणि मजबूत झाले, ज्याचे शिखर आकाशाला स्पर्श करू लागले आणि जे सर्व पृथ्वीवरून पाहिले जाऊ शकते, 21ज्यामध्ये सुंदर पाने आणि विपुल फळे होती, ज्याने सर्वांना अन्न दिले, ज्याने वन्यपशूंना आश्रय दिला आणि ज्याच्या फांद्यांवर पक्षी घरटे बांधली; 22महाराज, तुम्ही तो वृक्ष आहात! आपण समर्थ व थोर झाला आहात. आपले थोरपण आकाशाला जाऊन भिडले आहे आणि आपली सत्ता पृथ्वीच्या टोकांपर्यंत गेली आहे.
23“हे महाराज, नंतर आपणाला येणारा एक पवित्र दूत दिसला आणि तो म्हणत होता, ‘वृक्ष तोडा, त्याचा नाश करा, पण त्याचा बुंधा व मुळे तशीच जमिनीतील गवतात राखा. त्याच्याभोवती हिरवळ असेल व तो लोखंडाच्या आणि कास्याच्या पट्टयाने बांधलेला असेल. आकाशातील दवाने तो भिजून जावो! सात वर्षे मैदानातल्या पशूंसारखी त्याची गत होवो!’
24“महाराज हे आहे याचा अर्थ, आणि महाराज, हा अर्थ आहे आणि परात्पर परमेश्वराने माझ्या स्वामी राजाच्या विरुद्ध काढलेला हा आदेश आहे: 25तुम्हाला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तुम्ही वन्यप्राण्यांबरोबर राहाल; तुम्ही बैलाप्रमाणे गवत खाल आणि आकाशाच्या दवाने भिजून जाल. सात कालखंड संपेपर्यंत तुम्ही या स्थितीत राहाल आणि मग तुमचा असा विश्वास असेल की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला ही राज्ये देतात. 26परंतु बुंधा व मुळे जमिनीतच ठेवण्याची आज्ञा देण्यात आली आहे, याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही स्वीकाराल स्वर्ग राज्य करते तेव्हा तुमचे राज्य तुम्हाला परत केले जाईल. 27म्हणून महाराज, आनंदाने माझा सल्ला स्वीकारा: चांगले ते करून आपली पापे सोडा आणि वाईट सोडून पीडितांवर दया करा. मग तुमची समृद्धी होत राहील.”
स्वप्न पूर्ण झाले
28हे सगळे नबुखद्नेस्सर राजासोबत झाले. 29बारा महिन्यानंतर राजा बाबेलमधील राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता, 30मग राजा म्हणाला, “हे महान बाबेल नाही का, जे मी माझ्या प्रतापी सामर्थ्याने माझ्या वैभवाच्या गौरवासाठी शाही निवासस्थान म्हणून बांधले आहे?”
31तो हे शब्द उच्चारतो न उच्चारतो, तोच स्वर्गातून वाणी आली, “हे राजा नबुखद्नेस्सर, तुझ्यासाठी हे फर्मान घेण्यात आले आहे: तुझा राजेशाही अधिकार तुझ्यापासून काढून घेण्यात आला आहे. 32तुला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तू वन्यप्राण्यांसह राहशील; तू बैलाप्रमाणे गवत खाशील. सात कालखंड संपेपर्यंत तू असे स्वीकारशील की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला राज्ये देतात.”
33नबुखद्नेस्सरबद्दल जे बोलण्यात आले होते ते त्याच घटकेला पूर्ण झाले. त्याला लोकांमधून हाकलून देण्यात आले आणि तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे शरीर दवाने भिजून ओलेचिंब झाले, त्याचे केस गरुडाच्या पिसांसारखे लांब वाढले आणि पक्ष्यांच्या नखांसारखी त्याची नखे वाढली.
34निर्धारित कालखंडाच्या शेवटी, मी, नबुखद्नेस्सरने माझी नजर वर स्वर्गाकडे वळवली आणि माझी बुद्धी मला पुन्हा लाभली. मग मी परात्पर परमेश्वराची महिमा केली; त्यांना आदर आणि गौरव दिला, जे सदासर्वकाळ जिवंत आहेत,
त्यांची सत्ता शाश्वत आहे.
त्यांचे साम्राज्य पिढ्यान् पिढ्या राहणारे आहे.
35पृथ्वीवरील सर्व लोक
कवडीमोलाचे आहेत.
स्वर्गातील शक्तींमध्ये आणि
पृथ्वीवरील रहिवाशांमध्ये
त्यांना जे योग्य वाटते तेच ते करतात.
त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही
अथवा त्यांना बोलू शकत नाही: “तुम्ही हे काय केले?”
36माझी बुद्धी मला परत लाभली. त्याचप्रमाणे माझा मान, वैभव आणि राज्य हेदेखील सर्व मला परत मिळाले. माझे मंत्री व अधिकारी माझ्याकडे परत आले, आणि मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मी पूर्वीपेक्षा अधिक महान झालो. 37आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाधिराजाची स्तुती, गौरव व सन्मान करतो, कारण ते जे काही करतात ते योग्य करतात आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. आणि जे गर्वाने चालतात त्यांना ते नम्र करण्यास समर्थ आहेत.
सध्या निवडलेले:
दानीएल 4: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.