दानीएल 7
7
दानीएलला झालेला चार पशूंचा दृष्टान्त
1बाबेलचा राजा बेलशस्सर याच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी दानीएल आपल्या बिछान्यावर पडला असताना त्याने स्वप्न पाहिले व मनात दृष्टान्त पाहिला. त्याने आपल्या स्वप्नाचा सारांश लिहून ठेवला.
2दानीएल म्हणाला: रात्री मी आपल्या दृष्टान्तात पाहिले, माझ्यापुढे स्वर्गातील चार वाऱ्यांनी मोठ्या समुद्राला घुसळले. 3चार महाकाय पशू समुद्रातून वर आले. प्रत्येक पशू एकमेकांपासून वेगळा होता.
4“पहिला पशू सिंहासारखा होता आणि त्याला गरुडाचे पंख होते. मी पाहत असतानाच त्याचे पंख उपसून काढण्यात आले आणि त्याला जमिनीवरून उचलून माणसासारखे दोन पायांवर उभे करण्यात आले आणि त्याला मानवाचे अंतःकरण देण्यात आले.
5“आणि तिथे मी माझ्यापुढे दुसरा पशू पाहिला, जो अस्वलासारखा दिसत होता. त्याच्या शरीराची एका बाजू वर उचललेली होता. त्याने आपल्या दातांमध्ये तीन फासळ्या धरल्या होत्या. त्याला सांगण्यात आले, ‘ऊठ! पोटभर मांस खा!’
6“यानंतर मी पाहिले तो, मला आणखी एक पशू माझ्यापुढे दिसला, तो एखाद्या चित्त्यासारखा दिसत होता. त्याच्या पाठीवर पक्ष्यांसारखे चार पंख होते. या पशूला चार डोकी होती आणि सत्ता गाजविण्याचा त्याला अधिकार देण्यात आला होता.
7“यानंतर रात्री मी दृष्टान्तात पाहत होतो आणि तिथे माझ्यापुढे चौथा पशू होता—तो भयंकर आणि विक्राळ आणि फार बलिष्ठ होता. त्याला मोठे लोखंडी दात होते; त्याने आपल्या काही बळींना चिरडून टाकले, काहींना फाडून खाल्ले आणि उरलेल्यांना पायाखाली तुडविले. पूर्वीच्या सर्व पशूपेक्षा हा पशू वेगळा होता. त्याला दहा शिंगे होती.
8“या शिंगांविषयी मी विचार करीत असता, त्या शिंगांमध्ये आणखी एक लहान शिंग उगवले आणि आधीच्या शिंगांपैकी तीन शिंगांना या नव्या शिंगाने मुळासकट उपटून टाकले. या शिंगाला माणसासारखे डोळे होते आणि बढाई करणारे तोंडही होते.
9“जसे मी पाहिले,
“सिंहासने मांडली गेली
आणि प्राचीन पुरुष आपल्या आसनावर बसला आहे.
त्याची वस्त्रे हिमासारखी शुभ्र होती;
त्याच्या मस्तकावरील केस लोकरीप्रमाणे पांढरे होते.
त्याचे सिंहासन अग्निज्वालायुक्त होते,
आणि त्याच्या सिंहासनाची चाके प्रज्वलित केलेल्या अग्नीप्रमाणे होती.
10अग्नीची नदी निघून वाहत होती
जी त्याच्यामधून बाहेर येत होती.
हजारोच्या हजार लोक त्याची सेवा करीत होते;
कोट्यावधी लोक त्याच्यासमोर उभे होते.
न्यायालयाचे कामकाज सुरू झाले
आणि पुस्तके उघडली गेली.
11“मग मी सतत त्याच्याकडे पाहत होतो कारण ते शिंग फुशारकीचे शब्द बोलत होते. मी सतत पाहत राहिलो जोपर्यंत चौथ्या पशूचे वध करण्यात आले नाही आणि त्याचे शरीर अग्निज्वालांमध्ये फेकण्यात आले नाही. 12(इतर पशूंचे अधिकार काढून घेण्यात आले, परंतु त्यांना आणखी काही काळ जिवंत राहण्याची परवानगी देण्यात आली.)
13“नंतर रात्री दृष्टान्तात पाहत होतो आणि मी पाहिले, मानवपुत्रासारखा आकाशात मेघारूढ होऊन येत असलेला दिसला. तो प्राचीन पुरुषाकडे गेला आणि त्याच्या उपस्थितीत त्याला सादर करण्यात आले. 14त्याला अधिकार, गौरव व सार्वभौम सामर्थ्य देण्यात आले; सर्व राष्ट्रांनी आणि प्रत्येक सर्व भाषा बोलणार्यांनी त्याची उपासना केली. त्याचे सामर्थ्य शाश्वतचे आहे, जे कधीही ढळणार नाही आणि त्याचा कधी अंत होत नाही आणि म्हणून त्याचे राज्य हे असे राज्य आहे, ज्याचा कधीही नाश होणार नाही.
स्वप्नाचा उलगडा
15“मी, दानीएल, माझ्या आत्म्यात खूप व्यथित झालो आणि मी माझ्या मनात जो दृष्टान्त पाहिला, त्यामुळे मी गोंधळून गेलो. 16मी तिथे उभ्या असलेल्यांपैकी एकाकडे गेलो आणि मी त्याला या सर्व गोष्टींचा अर्थ काय हे विचारले.
“मग त्याने मला सांगितले व गोष्टींचा अर्थ समजावून सांगितला: 17‘हे चार महाकाय पशू म्हणजे पृथ्वीवर उदय पावणारे चार राजे आहेत. 18तरी परमोच्च परमेश्वराच्या पवित्र जणांना राज्य मिळेल आणि ते सदासर्वकाळ त्याच्या ताब्यात राहतील—होय, सदासर्वकाळ.’
19“मग मला चौथ्या प्राण्याचा अर्थ जाणून घ्यायचा होता, जो इतर सर्व पशूंपेक्षा वेगळा होता. तो आपल्या लोखंडी दातांनी आणि कास्याच्या नखांमुळे अति भयानक होता—त्याने आपल्या काही बळींना चिरडून टाकले, काहींना फाडून खाल्ले आणि उरलेल्यांना पायाखाली तुडविले. 20मला हे देखील जाणून घ्यायचे होते की त्याच्या डोक्यावर असलेली दहा शिंगे आणि दुसरे शिंग जे बाहेर आले, त्यापैकी तीन शिंगे बाहेर आल्यावर पडली. मला त्या दहा शिंगांविषयी आणि जे शिंग नंतर आले, ज्याच्या येण्याने तेथील तीन शिंगे तुटून पडली—ते शिंग जे इतरांपेक्षा अधिक आकर्षक दिसले आणि ज्याला डोळे होते व फुशारकी मारणारे बढाईखोर तोंड होते, मला हे जाणून घ्यायचे होते. 21मी पाहिले की, हे शिंग पवित्र लोकांशी युद्ध करीत आहे आणि त्यांचा पराभव करीत राहिले, 22जोपर्यंत सनातन पुरुष येईपर्यंत आणि परमोच्च परमेश्वराच्या पवित्र लोकांच्या बाजूने निर्णय घोषित होईपर्यंत, त्यांनी राज्य ताब्यात घेण्याची वेळ आली.
23“त्याने मला हे स्पष्टीकरण दिले: ‘हा चौथा पशू म्हणजे हे चौथे राज्य होईल जे पृथ्वीवर प्रकट होईल. ते सर्व राज्याहून निराळे होईल आणि ते संपूर्ण पृथ्वीला गिळंकृत करेल, तिला तुडवून टाकेल, आणि तिचे तुकडे करेल. 24ती दहा शिंगे म्हणजे दहा राजे. जे या राज्यातून येतील. यानंतर आणखी एक राजा येईल, जो आधीच्या राजांपेक्षा भिन्न असणार; तो या तिघांना वश करेल. 25तो परमोच्च परमेश्वराच्या विरुद्ध बोलेल आणि त्यांच्या पवित्र लोकांवर अत्याचार करेल आणि निर्धारित वेळ आणि कायदे बदलण्याचा प्रयत्न करेल. पवित्र लोक एक वेळ, दोन वेळा आणि अर्धा वेळ त्याच्या हातात देण्यात येतील.#7:25 किंवा एक वर्ष, दोन वर्षे आणि अर्धे वर्ष
26“ ‘परंतु न्यायसभा बसेल आणि त्याचे सामर्थ्य काढून घेण्यात येईल आणि त्याचा कायमचा नाश करण्यात येईल. 27मग परमोच्च परमेश्वराच्या पवित्र लोकांना आकाशाखाली असलेल्या राज्यांचे सार्वभौमत्व, सामर्थ्य आणि महानता देण्यात येईल. त्यांचे राज्य सनातन राज्य आहे आणि सर्व शासक त्यांची सेवा करतील व त्यांच्या आज्ञा पाळतील.’
28“येथे हा विषय समाप्त होतो. मी दानीएल, आपल्या विचारांनी व्याकूळ झालो. आणि माझा चेहरा पांढराफटक पडला, परंतु मी ही गोष्ट आपल्या मनात ठेवली.”
सध्या निवडलेले:
दानीएल 7: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.