दानीएल 1
1
दानीएलाचे बाबेल येथे प्रशिक्षण
1यहूदीयाचा राजा यहोयाकीमच्या कारकिर्दीच्या तिसर्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने यरुशलेमला वेढा दिला. 2आणि प्रभूने यहूदीयाच्या राजा यहोयाकीमला परमेश्वराच्या मंदिरातील काही पात्रांसोबत त्याच्या हाती दिले. ती शिनार#1:2 किंवा बाबेल प्रांतातील त्याच्या दैवताच्या मंदिरासाठी नेली आणि त्याच्या दैवताच्या खजिन्यात नेऊन ठेवली.
3मग राजाने आपल्या दरबारातील प्रमुख अधिकारी अश्पनजास राजघराण्यातील काही इस्राएली आणि कुलीन लोकांना राजाच्या सेवेत आणण्याचा आदेश दिला— 4शारीरिक दोष नसलेले तरुण पुरुष, देखणे, सर्वप्रकारच्या विद्येत निष्णात, ज्ञानसंपन्न, समजण्यास त्वरित आणि राजाच्या महालात सेवा करण्यास पात्र. त्याने त्यांना खाल्डियन भाषा व विद्या शिकवावी. 5राजाने स्वतःच्या भोजनातून रोजचे भोजन आणि द्राक्षारसातून देण्याचा आदेश दिला. त्यांना तीन वर्षे प्रशिक्षित करावे आणि त्यानंतर त्यांना राजाच्या सेवेत आणावे.
6जे निवडलेले होते, त्यामध्ये काही यहूदाह वंशातील होते: दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्याह. 7अश्पनज अधिकार्याने त्यांना नवीन नावे दिली: त्याने दानीएलला बेलटशास्सर; हनन्याहला शद्रख; मिशाएलला मेशख; आणि अजर्याहला अबेदनगो.
8पण दानीएलने राजाचे अन्न व द्राक्षारस घेऊन स्वतःला भ्रष्ट न करण्याचा निर्धार केला आणि त्याने मुख्य अधिकाऱ्याला अशा प्रकारे स्वतःला भ्रष्ट न करण्याची विनंती केली. 9आता परमेश्वराने दानीएलविषयी अधिकार्याची कृपा आणि दया प्राप्त होईल असे केले, 10परंतु अधिकारी दानीएलास म्हणाला, “मला माझे स्वामीराजाचे भय आहे, ज्यांनी मला तुमच्या खाण्या आणि पिण्याची देखरेख करण्यास नेमले आहे. तुमच्याबरोबरीच्या तरुणापेक्षा तुम्ही अशक्त का दिसावे? राजा तुमच्यामुळे माझे डोके उडवेल.”
11दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्याह यांच्या देखरेखीसाठी अधिकार्याने जो कारभारी नेमला होता, त्याला दानीएल म्हणाला, 12“कृपा करून आपल्या सेवकांना दहा दिवस पारखून पाहावे: आम्हाला काहीही देऊ नको, आम्हाला खाण्यास फक्त डाळ आणि पिण्यास पाणी द्या. 13मग आम्ही कसे दिसतो याची तुलना राजाच्या मेजवानीत भोजन करणार्या तरुणांशी करा आणि या तुमच्या सेवकांना तुमच्या दृष्टीस जे दिसेल त्याप्रमाणे वागवा.” 14तो हे करण्यास सहमत झाला आणि त्याने त्यांना दहा दिवस पारखून पाहिले.
15दहा दिवसानंतर राजाचे भोजन खाणार्या तरुणापेक्षा ते स्वस्थ आणि धष्टपुष्ट दिसू लागले. 16म्हणून कारभाऱ्याने त्यांच्यासाठी नेमलेले भोजन आणि जे द्राक्षारस पीत होते ते काढून घेतले आणि त्याऐवजी डाळी देऊ लागला.
17परमेश्वराने या चार तरुणांना सर्वप्रकारच्या साहित्याचे ज्ञान आणि समज दिली. दानीएलला सर्व प्रकारची स्वप्ने व दृष्टान्त समजत असत.
18राजाने नेमून दिलेल्या वेळेनंतर प्रमुख अधिकार्याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरपुढे त्याच्या सेवेसाठी प्रस्तुत केले. 19राजा त्यांच्यासोबत बोलला आणि त्या सर्वांमध्ये दानीएल, हनन्याह, मिशाएल व अजर्याह यांच्यासारखे कोणीही सापडले नाही; म्हणून त्यांना राजाच्या सेवेसाठी निवडण्यात आले. 20बुद्धीच्या आणि शहाणपणाच्या प्रत्येक बाबतीत ज्याबद्दल जेव्हा राजाने त्यांना विचारले, त्याला ते त्याच्या संपूर्ण राज्यातील सर्व जादूगार आणि ज्योतिषीच्या सल्ल्यापेक्षा दसपटीने चांगले आहेत, असे आढळून आले.
21आणि कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षापर्यंत दानीएल राजाचा सल्लागार या पदावर होता.
सध्या निवडलेले:
दानीएल 1: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.