YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 2

2
नबुखद्नेस्सर राजाचे स्वप्न
1आपल्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरला स्वप्न पडले; त्याचे मन व्याकूळ झाले आणि त्याला झोप येत नव्हती. 2म्हणून राजाने आदेश दिला की जादूगार, मांत्रिक, तांत्रिक आणि ज्योतिषी यांना बोलवावे आणि त्याला जे स्वप्न पडले ते सांगावे, जेव्हा ते आत आले आणि राजासमोर उभे राहिले, 3तो राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे, ज्यामुळे मी व्याकूळ झालो आणि त्याचा अर्थ मला जाणून घ्यायचा आहे.”
4त्या ज्योतिषांनी राजाला उत्तर दिले, “महाराज, चिरायू असा! आपले स्वप्न काय होते ते आपल्या सेवकांना सांगावे, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”
5त्यावर राजाने ज्योतिषांना उत्तर दिले, “मी हा दृढ निश्चय केले आहे: जर मला ते स्वप्न कोणते आणि त्याचा अर्थ काय हे तुम्ही सांगितले नाहीतर मी तुमचे तुकडे करेन आणि तुमच्या घरादारांचे उकिरडे केले जातील. 6पण माझे स्वप्न काय होते, त्याचा अर्थ काय आहे, हे तुम्ही मला सांगितले, तर तुम्ही माझ्याकडून भेट व इनामे आणि मोठा सन्मान प्राप्त कराल. म्हणून मला माझे स्वप्न सांगा आणि त्या स्वप्नांचा अर्थ सांगा.”
7त्यांनी पुन्हा उत्तर दिले, “महाराजांनी, स्वप्न आपल्या सेवकांना सांगावे आणि आम्ही त्याचा अर्थ सांगू.”
8तेव्हा राजाने उत्तर दिले, मला आता खात्री झाली आहे की तुम्ही वेळ काढण्याचा प्रयत्न करीत आहात, कारण मी हा दृढ निश्चय केला आहे, हे तुम्हाला कळले आहे: 9जर तुम्ही मला माझे स्वप्न सांगणार नाही, तर तुम्हासाठी फक्त एकच शिक्षा आहे. परिस्थिती बदलेल या आशेने तुम्ही मला भ्रामक आणि दुष्ट गोष्टी सांगण्याचा कट रचला आहे. म्हणून तुम्ही मला स्वप्न सांगा आणि मला कळेल की तुम्ही मला त्याचा परिणाम सांगू शकता.
10ज्योतिषी लोकांनी राजाला उत्तर दिले, “पृथ्वीवर असा कोणताही व्यक्ती नाही, जे राजाने सांगितले आहे ते करू शकेल! कोणत्याही राजाने मग तो कितीही महान आणि पराक्रमी असला तरी जादूगार किंवा तांत्रिक किंवा ज्योतिषी यांना असे विचारले नाही. 11महाराजाने जे विचारत आहेत ते अशक्य आहे. ज्या दैवतांचे राहणे मनुष्यात नाही, त्यांच्या खेरीज हे महाराजांना कोणीही प्रकट करू शकणार नाही.”
12हे ऐकून राजाला क्रोध आला आणि तो संतप्त झाला आणि त्याने फर्मान काढले की बाबेलमधील सर्व ज्ञानी लोकांचा शिरच्छेद करा. 13ज्ञानी लोकांना मारण्याचे फर्मान काढण्यात आले आणि दानीएल व त्याच्या मित्रांचा वध करण्यासाठी लोकांना पाठविण्यात आले.
14जेव्हा अर्योक हा राजाच्या संरक्षकांचा प्रमुख बाबेलमधील ज्ञानी पुरुषांचा वध करण्यासाठी गेला तेव्हा दानीएल शहाणपणाने व सुज्ञपणे त्याच्याशी बोलला. 15त्याने राजाच्या अधिकार्‍याला विचारले, “राजाने असा कठोर निर्णय का घेतला?” अर्योकने मग दानीएलला सर्व हकिकत सांगितली. 16ते ऐकून दानीएलने राजाची भेट घेतली व त्याला म्हणाला मला थोडा वेळ देण्याची मागणी केली, म्हणजे तो स्वप्न व त्याचा अर्थ सांगू शकेल.
17मग दानीएल आपल्या घरी परत आला व सर्व घटना त्याने आपल्या सोबत्यांना हनन्याह, मिशाएल व अजर्‍याह यांना सांगितली. 18दानीएलाने त्यांना या रहस्याबद्दल स्वर्गाच्या परमेश्वराची दया मागण्याची विनंती केली, जेणेकरून बाबेलमधील इतर ज्ञानी माणसांसह त्याचा आणि त्याच्या मित्रांचा नाश होऊ नये. 19त्या रात्री याहवेहने दानीएलला दृष्टान्तात ते रहस्य प्रकट केले. तेव्हा दानीएलने स्वर्गाच्या परमेश्वराला धन्यवाद दिला. 20आणि दानीएल म्हणाला:
“परमेश्वराचे नाव सदासर्वकाळ धन्यवादित असो;
कारण ज्ञान आणि सामर्थ्य हे त्यांचेच आहे.
21ते समय व ॠतू बदलतात;
ते राजांना पदच्युत करतात व इतरांना उंच करतात.
शहाण्यांना तेच शहाणपण देतात,
सुज्ञांना बुध्दीही देतात.
22गहन आणि गूढ रहस्य तेच प्रकट करतात;
अंधारात काय आहे हे ते जाणतात
आणि प्रकाश त्यांच्यामध्ये राहतो.
23हे आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा,
मी तुम्हाला धन्यवाद देतो व तुमची स्तुती करतो:
तुम्हीच मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले,
मी तुम्हाला जे काही मागितले, ते मला ज्ञात करून दिले,
तुम्ही आम्हाला राजाचे स्वप्न ज्ञात करून दिले.”
दानीएलकडून स्वप्नाचा खुलासा
24बाबेलमधील ज्ञानी लोकांचा वध करण्याचे काम अर्योकवर सोपविले होते. दानीएल त्याला जाऊन भेटला व म्हणाला, “बाबेलमधील ज्ञानी लोकांचा वध करू नका. मला राजाकडे घेऊन चला आणि मी राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगेन.”
25अर्योकने लगबगीने दानीएलला राजाकडे घेऊन गेला आणि म्हणाला, “यहूदी कैद्यांपैकी मला एक पुरुष सापडला आहे जो राजाच्या स्वप्नाचा अर्थ सांगू शकेल.”
26राजाने दानीएलला (ज्याला बेलटशास्सर असेही म्हटले जाते) विचारले, “मी जे स्वप्न पाहिले ते आणि त्याचा अर्थ तू सांगण्यास सक्षम आहेस काय?”
27दानीएलने उत्तर दिले, “महाराजांनी ज्या रहस्याबद्दल विचारले, त्याबद्दल कोणीही ज्ञानी मनुष्य, ज्योतिषी, जादूगार किंवा दैवप्रश्न करणारे राजाला या गोष्टी सांगू शकणार नाही, 28परंतु स्वर्गामधील परमेश्वर गूढ रहस्ये प्रकट करतात. येणार्‍या दिवसात काय घडणार ते त्यांनीच नबुखद्नेस्सर राजाला दाखविले आहे. तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टान्त जे तुमच्या मनातून पार झाले ते हे आहेत:
29“महाराज जेव्हा तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता, तुमचे मन होणार्‍या भावी घटनेकडे लागले आणि रहस्ये प्रकट करणार्‍यांनी तुम्हाला भविष्यात काय होणार आहे हे दाखविले आहे. 30माझ्यासाठी, हे रहस्य मला उघड केले गेले कारण माझ्याकडे इतर जिवंत माणसापेक्षा जास्त बुद्धी आहे म्हणून नाही, परंतु महाराजांना रहस्याचा अर्थ कळावा आणि तुमच्या मनात काय चालले आहे ते समजावे.
31“महाराज, तुम्ही पाहिले की तुमच्यापुढे एक प्रचंड पुतळा उभा आहे—एक प्रचंड, चकाकदार पुतळा, दिसण्यात अद्भुत. 32त्या पुतळ्याचे डोके शुद्ध सोन्याचे होते, त्याची छाती व दंड चांदीचे होते, त्याचे पोट व मांड्या कास्याच्या होत्या, 33त्याचे पाय लोखंडाचे होते आणि पावले लोखंडाची व त्यात काही अंश मातीचा होता. 34तुम्ही पहात असताना, एका खडकाने कोणताही मानवी स्पर्श न होता स्वतःला छेदले आणि त्या मूर्तीच्या लोखंडी आणि मातीच्या पायावर अशा प्रकारे आदळले की त्याचा चुराडा झाला. 35मग लोखंड, माती, कास्य, चांदी आणि सोने यांचे तुकडे तुकडे झाले आणि ते उन्हाळ्यात खळ्यातील भुशाप्रमाणे झाले. वाऱ्याने त्यांना अशा प्रकारे उडवून दिले की त्यांचा एक छोटासा तुकडाही शिल्लक राहिला नाही. पण ज्या दगडाने पुतळा उलथून टाकला, त्या दगडाचा एक प्रचंड डोंगर झाला व त्याने सर्व पृथ्वी झाकून टाकली.
36“हे आपले स्वप्न आणि आता त्याचा अर्थ महाराजासाठी सांगतो. 37महाराज, आपण राजाधिराज आहात. स्वर्गाच्या परमेश्वरानेच आपणाला हे राज्य, सत्ता, सामर्थ्य आणि वैभव दिले आहे; 38आपल्या हाताखाली त्यांनी सर्व मनुष्यप्राणी, भूमीवरील प्राणी आणि आकाशातील पक्षी निर्माण केले आहेत. ते जिथे कुठेही राहतात, त्यांनी तुम्हाला त्यांचा अधिपती म्हणून नियुक्त केले आहे. ते सोन्याचे मस्तक म्हणजे आपण स्वतःच आहात.
39“तुमच्यानंतर आणखी एक राज्य उदयास येईल जे तुमच्या राज्यापेक्षा कमी दर्जाचे असेल. त्यानंतर, तिसरे राज्य उदयास येईल, एक कास्याची प्रतिमा, जी संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल. 40शेवटी, एक चौथे राज्य असेल जे लोखंडासारखे मजबूत असेल—कारण लोखंड सर्व गोष्टींचे तुकडे करतो आणि चुराडा करतो—आणि लोखंड ज्याप्रमाणे गोष्टींचे तुकडे करेल, त्याचप्रमाणे हे राज्य त्याचे तुकडे करून चुराडा करेल. 41जसे तुम्ही पाहिले की पाय आणि बोटे काही प्रमाणात भाजलेल्या मातीची होती आणि काही प्रमाणात लोखंडाची होती, म्हणून ते एक विभाजित राज्य असेल; तरीही त्यात काही लोखंडी ताकद असेल, जसे तुम्ही लोखंड मातीत मिसळलेले पाहिले. 42काही लोखंड व काही माती यांनी बनलेली पावले आणि बोटे आपल्याला दिसली म्हणजेच हे साम्राज्य काही मजबूत व काही दुबळी असतील. 43आणि जसे तुम्ही लोखंडाला भाजलेल्या मातीत मिसळलेले पाहिले, तसे लोक मिसळले जातील, पण एकरूप होणार नाहीत, कारण लोखंड मातीत मिसळत नाही.
44“त्या राजांच्या काळात, स्वर्गातील परमेश्वर एक राज्य स्थापन करतील, ज्याचा नाश होणार नाही किंवा इतर कोणीही त्याच्यावर राज्य करू शकणार नाही. हे त्या सर्व राज्यांना चिरडून टाकेल आणि त्यांचा नाश करेल, परंतु ते स्वतःच कायम टिकून राहील. 45हा त्या खडकाच्या दृष्टान्ताचा अर्थ आहे, जो मनुष्याच्या हातून नव्हता, परंतु स्वतः एका पर्वतापासून तो खडका वेगळा झाला होता—ज्याने लोखंड, कास्य, माती, चांदी आणि सोने यांचा सर्वांचा चुराडा केला होता.
“महान परमेश्वराने महाराजांना भविष्यात काय घडणार आहे हे दाखवून दिले. हे स्वप्न खरे आहे आणि त्याचा अर्थ विश्वास ठेवण्यालायक आहे.”
46मग नबुखद्नेस्सर राजाने दानीएलसमोर साष्टांग दंडवत घालत तो पालथा पडला आणि आज्ञा केली की त्याला अर्पणे व सुगंधी द्रव्ये सादर करावी. 47राजा दानीएलला म्हणाला, “निश्चितच तुझा परमेश्वर देवांचा देव आणि राजांचा प्रभू आणि रहस्ये उघड करणारा आहे, कारण तू या रहस्याचा अर्थ समजावून सांगण्यास योग्य ठरला आहे.”
48मग राजाने दानीएलला उच्चपदास चढविले, त्याला अनेक मौल्यवान देणग्या दिल्या. त्याने संपूर्ण बाबेलप्रांतावर त्याला प्रमुख अधिपती नेमले आणि सर्व ज्ञानी लोकांवर प्रमुख अधिकारी म्हणून त्याची नेमणूक केली. 49मग दानीएलच्या विनंतीवरून राजाने शद्रख, मेशख व अबेदनगो यांना बाबेल प्रांताचा प्रशासक सहायक म्हणून नेमले, परंतु की दानीएल राजाच्या दरबारातच राहिला.

सध्या निवडलेले:

दानीएल 2: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन