YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 शमुवेल 18

18
1दावीदाने आपल्याबरोबर असलेल्या लोकांना एकत्र करून त्यांची मोजणी केली आणि त्यांच्या हजारांवर सेनापती आणि शंभरांवर सेनापती नेमले. 2दावीदाने एकतृतीयांश लोक योआबाच्या हाताखाली, एकतृतीयांश सैन्य योआबाचा भाऊ, जेरुइयाहचा पुत्र अबीशाईच्या हाताखाली आणि एकतृतीयांश इत्तय गित्तीच्या हाताखाली असे आपले सैन्य पाठवले. राजाने सैन्यास सांगितले, “मी स्वतः अवश्य तुम्हाबरोबर चालत जाईन.”
3परंतु लोकांनी म्हटले, “तुम्ही बाहेर जाऊ नये; जर आम्हाला पळून जावे लागले, तरी त्यांना आमचे काही वाटणार नाही. जरी आमच्यातील अर्धे लोक मरण पावले, त्याचीही त्यांना काळजी वाटणार नाही; परंतु तुमचे मोल आमच्यातील दहा हजारांप्रमाणे आहे. तुम्ही आम्हाला शहरात राहूनच पाठिंबा दिला तर ते उत्तम होईल.”
4राजाने उत्तर दिले, “तुम्हाला जे योग्य वाटते तेच मी करेन.”
म्हणून राजा वेशीजवळ उभे राहिला आणि त्यांचे सर्व सैनिक शंभराच्या व हजारांच्या टोळीने बाहेर पडले. 5राजाने योआब, अबीशाई व इत्तय यांना आज्ञा दिली, “माझ्यासाठी त्या तरुण अबशालोमशी सौम्यतेने वागा.” राजाने अबशालोमविषयी प्रत्येक सेनापतीला दिलेली ही आज्ञा सर्व सैनिकांनी ऐकली.
6दावीदाचे सैनिक इस्राएलशी युद्ध करण्यास शहराच्या बाहेर पडले आणि एफ्राईमच्या जंगलात युद्धास सुरुवात झाली. 7दावीदाच्या सैन्यापुढे इस्राएली सैन्याचा मोड झाला आणि त्या दिवशी वीस हजार लोक मरण पावले. 8संपूर्ण देशभर युद्ध पसरले, त्या दिवशी तलवारीपेक्षा घनदाट जंगलामुळे अधिक लोकांचा मृत्यू झाला.
9यावेळी अचानक अबशालोमची दावीदाच्या माणसांशी गाठ पडली. तो त्याच्या खेचरावर बसून जात असता, खेचर एका मोठ्या एला झाडाच्या दाट फांद्यांखालून गेले आणि अबशालोमचे केस त्यात अडकले. तो हवेत लटकत राहिला आणि त्याचे खेचर ज्यावर तो बसला होता ते पुढे चालत राहिले.
10जेव्हा दावीदाच्या एका मनुष्याने जे झाले ते पाहिले व त्याने ते योआबाला सांगितले, “अबशालोमला एलाच्या झाडाला लटकत असलेले मी पाहिले.”
11ज्या मनुष्याने त्याला हे सांगितले, त्याला योआब म्हणाला, “काय! तू त्याला पाहिले? तू त्याला तिथेच मारून जमिनीवर का पाडले नाही? मी तुला चांदीची दहा शेकेल#18:11 अंदाजे 115 ग्रॅ. आणि योद्ध्याचा कंबरपट्टा दिला असता.”
12पण त्या मनुष्याने योआबाला उत्तर दिले, “जरी माझ्या हातावर चांदीची हजार शेकेल#18:12 अंदाजे 12 कि.ग्रॅ. वजन करून ठेवली, तरी मी राजपुत्रावर हात टाकणार नाही. कारण राजाने तुला, अबीशाईला व इत्तयला आज्ञा देताना आम्ही असे ऐकले की, ‘माझ्यासाठी तरुण अबशालोमचे रक्षण करा.’ 13आणि असे करून जरी मी माझा जीव धोक्यात घातला असता; तरी राजापासून काही गुप्त राहत नाही; आणि तू सुद्धा माझ्यापासून दूर राहिला असता.”
14योआब म्हणाला, “मी असा तुझ्यासाठी थांबणार नाही.” असे म्हणत त्याने आपल्या हाती तीन भाले घेतले आणि अबशालोम एलाच्या झाडाला अजूनही जिवंत असा लटकलेला असताना त्याने त्याच्या छातीत ते भोसकले. 15त्यानंतर योआबाचे दहा शस्त्रवाहक अबशालोमच्या सभोवती जमले, त्याच्यावर वार केला आणि त्याला मारून टाकले.
16नंतर योआबाने रणशिंग फुंकले, तेव्हा सैनिकांनी इस्राएलचा पाठलाग करण्याचे थांबविले, कारण योआबाने त्यांना थांबविले. 17त्यांनी अबशालोमला घेऊन, जंगलात एका खड्ड्यात फेकून टाकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली, त्या दरम्यान सर्व इस्राएली लोक आपआपल्या घरी पळून गेले.
18अबशालोमने आपल्या कारकिर्दीत राजाच्या खोर्‍यात स्वतःच्या स्मरणार्थ एक स्तंभ उभारला. कारण तो स्वतःशी म्हणाला, “माझे नाव पुढे चालविण्यासाठी मला पुत्र नाही.” म्हणून त्याने त्या स्तंभाला अबशालोमचे स्मारक असे नाव दिले होते. आजही ते त्याच नावाने ओळखले जाते.
दावीद शोक करतो
19तेव्हा सादोकाचा पुत्र अहीमाज म्हणाला, “मी धावत जाऊन राजाला ही बातमी द्यावी, की याहवेहने राजाला त्यांच्या शत्रूच्या हातून सोडवून मुक्ती दिली आहे.”
20पण योआब त्याला म्हणाला, “तू आज ही बातमी घेऊन जाणार नाहीस, तू ही बातमी दुसर्‍या एखाद्या दिवशी घेऊन जा, परंतु आज ती तू नेऊ नये, कारण राजाचा पुत्र मेला आहे.”
21नंतर योआब एका कूशी मनुष्याला म्हणाला, “तू जे पाहिलेस ते जाऊन राजाला सांग.” त्या कूशी मनुष्याने योआबाला लवून मुजरा केला व धावत निघाला.
22सादोकाचा पुत्र अहीमाज योआबाला म्हणाला, “जे होईल ते होवो, मला कूशी मनुष्याच्या मागे धावू दे.”
योआबाने उत्तर दिले, “माझ्या मुला, तुला का जायचे आहे? तुला बक्षीस मिळवून देईल अशी बातमी तुझ्याजवळ नाही.”
23तो म्हणाला, “जे होईल ते होवो, मला धावायचे आहे,”
तेव्हा योआब म्हणाला, “धाव!” तेव्हा अहीमाज मैदानाच्या#18:23 म्हणजेच यार्देनेचे मैदान मार्गाने धावू लागला आणि कूशी माणसाच्या पुढे गेला.
24दावीद शहराच्या आतील व बाहेरील वेशीच्या मध्ये बसलेला असता. पहारेकरी भिंतीवरून वेशीच्या छपरावर चढून गेला, तेव्हा त्याने पाहिले की एक मनुष्य एकटाच धावत येत आहे. 25पहारेकर्‍याने राजाला आवाज देऊन ते सांगितले.
राजाने म्हटले, “जर तो एकटाच आहे म्हणजे त्याच्याकडे चांगली बातमी असणार.” तो मनुष्य धावत जवळ जवळ येत होता.
26तेव्हा पहारेकर्‍याने अजून एक मनुष्य धावत येताना पाहिला आणि त्याने द्वारपालाला आवाज दिला, “पाहा, आणखी एक मनुष्य एकटाच धावत येत आहे.”
राजाने म्हटले, “तो देखील चांगली बातमी आणत असणार.”
27पहारेकरी म्हणाला, “पहिला मनुष्य सादोकाचा पुत्र अहीमाज, याच्यासारखा धावत आहे असे मला वाटते,”
राजाने म्हटले, “तो चांगला मनुष्य आहे. तो चांगलीच बातमी घेऊन येत असणार.”
28तेव्हा अहीमाजने राजाला आवाज देत म्हटले, “सर्वकाही ठीक आहे!” त्याने आपले मुख जमिनीपर्यंत खाली लववून म्हटले, “याहवेह, आपला परमेश्वर धन्यवादित असो! माझ्या धनीराजाविरुद्ध हात उचलणार्‍यांना याहवेहने आपल्या हाती घेतले आहे.”
29राजाने विचारले, “तरुण अबशालोम सुरक्षित आहे काय?”
अहीमाज म्हणाला, “योआब जेव्हा राजाचा सेवक व आपला सेवक म्हणजेच मला पाठवित होता त्यावेळी फार गोंधळ मी पाहिला, परंतु ते काय होते ते मला कळले नाही.”
30राजाने म्हटले, “येथे बाजूला वाट पाहत उभा राहा,” तेव्हा तो बाजूला सरकून उभा राहिला.
31नंतर कूशी मनुष्य येऊन पोहोचला आणि म्हणाला, “माझे राजा, माझे स्वामी, चांगली बातमी ऐका! आपल्याविरुद्ध उठलेल्या लोकांच्या हातातून याहवेहने तुम्हाला सोडवून तुमची सुटका केली आहे.”
32राजाने कूशी मनुष्याला विचारले, “तरुण अबशालोम सुरक्षित आहे का?”
त्या कूशी मनुष्याने उत्तर दिले, “माझ्या धनीराजाला जे सर्व इजा करण्यास आपणाविरुद्ध उठतात त्या आपल्या सर्व शत्रूंचे त्या तरुणाप्रमाणेच होवो.”
33तेव्हा राजा हादरून गेला. तो वरती दरवाज्यावरील खोलीत गेला आणि रडला! “माझ्या मुला, माझ्या मुला अबशालोमा! तुझ्या ऐवजी मी मेलो असतो—अरे माझ्या पुत्रा अबशालोमा, माझ्या पुत्रा!”

सध्या निवडलेले:

2 शमुवेल 18: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन