YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 शमुवेल 17

17
1अहीथोफेल अबशालोमला म्हणाला, “आज रात्री दावीदाचा पाठलाग करण्यासाठी मला बारा हजार माणसे निवडून घेऊ दे. 2जेव्हा तो थकलेला आणि दुर्बल असेल तेव्हा मी त्याच्यावर हल्ला करेन. मी त्याला भीतीचा धक्का देईन आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व लोक पळून जातील. मी केवळ राजावरच वार करेन 3आणि सर्व लोकांना तुझ्याकडे परत आणेन. ज्या मनुष्याचे मरण तू इच्छितो, तो मेला म्हणजे सर्व लोक सुरक्षित परत येतील; कोणालाही हानी होणार नाही.” 4अबशालोमला आणि इस्राएलच्या सर्व वडिलांना ही योजना चांगली वाटली.
5परंतु अबशालोम म्हणाला, “हूशाई अर्कीलासुद्धा बोलावून घ्या, म्हणजे त्याचे म्हणणे काय आहे ते आम्ही पाहू.” 6जेव्हा हूशाई त्याच्याकडे आला, तेव्हा अबशालोम म्हणाला, “अहीथोफेलने हा सल्ला दिला आहे. तो जे म्हणतो ते आपण करावे काय? नाहीतर तुझा सल्ला आम्हाला दे.”
7हूशाईने अबशालोमला उत्तर दिले, “अहीथोफेलने जो सल्ला दिला आहे, तो यावेळेसाठी बरा नाही. 8हूशाईने पुढे म्हटले, तुझे वडील आणि त्याची माणसे यांना तू चांगले ओळखतोस; ते योद्धे आहेत, रानटी अस्वलाची पिल्ले कोणी नेली तेव्हा ती कशी चवताळते त्यासारखे ते आहेत, तुझे वडील अनुभवी योद्धा आहेत; आणि तो सैन्याबरोबर रात्र घालविणार नाही. 9यावेळेस सुद्धा ते गुहेत किंवा कुठे दुसर्‍या ठिकाणी लपले असतील. जर त्यांनी तुझ्या सैन्यावर प्रथम हल्ला केला, तर कोणीही त्याबद्दल ऐकून म्हणेल, ‘अबशालोमच्या मागे जाणार्‍यांचीच हत्या होत आहे.’ 10तेव्हा सर्वात धैर्यशाली शिपाई, ज्याचे हृदय एखाद्या सिंहासारखे आहे तो भीतीने गळून जाईल, कारण सर्व इस्राएली लोकांना माहीत आहे की, तुझा पिता योद्धा आहे आणि त्याच्याबरोबर असणारे सर्व शूर आहेत.
11“म्हणून मी तुला सल्ला देतो: दानपासून बेअर-शेबापर्यंत असलेल्या सर्व असंख्य इस्राएली लोकांना समुद्रकिनाऱ्यावरील वाळूप्रमाणे तुझ्याकडे गोळा कर, आणि तू स्वतः युद्धाचे नेतृत्व कर. 12मग तो सापडेल तिथे आपण त्याच्यावर हल्ला करू, आणि जसे जमिनीवर दव येऊन पडते तसे आपण त्याच्यावर पडू. मग तो किंवा त्याच्या माणसांपैकी कोणीही जिवंत सोडला जाणार नाहीत. 13जर तो शहरात निघून गेला, तर सर्व इस्राएली लोक त्या शहराकडे दोऱ्या आणतील आणि तिथे एकही खडा राहणार नाही तोपर्यंत आम्ही ते खाली दरीत ओढून नेऊ.”
14तेव्हा अबशालोम आणि सर्व इस्राएली लोक म्हणाले, “हूशाई अर्कीचा सल्ला अहीथोफेलच्या सल्ल्यापेक्षा अधिक बरा आहे.” कारण अबशालोमवर अरिष्ट आणावे म्हणून अहीथोफेलचा चांगला सल्ला विफल करण्याची याहवेहने योजना केली होती.
15हूशाईने सादोक आणि अबीयाथार याजकांना सांगितले, “अहीथोफेलने अबशालोम आणि इस्राएलच्या वडीलजनास अमुक करण्याचा सल्ला दिला होता, परंतु मी त्यांना असे करण्याचा सल्ला दिला आहे. 16आता लवकर निरोप पाठवा आणि दावीदाला सांगा, ‘आजची रात्र रानाच्या उतारावर घालवू नको; तर लवकर पलीकडे जा, नाहीतर राजा आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व लोक नष्ट केले जातील.’ ”
17आपण शहरात जाताना कोणी पाहून धोका देऊ नये, म्हणून योनाथान आणि अहीमाज एन-रोगेल येथे राहत होते. त्यांनी ही सूचना दावीद राजाला द्यावी म्हणून त्यांच्याकडे एक दासी पाठवली गेली. 18परंतु एका तरुण मनुष्याने त्यांना पाहिले आणि त्याने जाऊन अबशालोमला सांगितले. तेव्हा दोघेजण त्वरित बहूरीम येथे एका माणसाच्या घरी गेले. त्याच्या घराच्या अंगणात एक विहीर होती, तिच्यात ते उतरले. 19त्याच्या पत्नीने विहिरीच्या तोंडावर एक झाकण टाकले व त्यावर धान्य पसरले. त्याबद्दल कोणालाही काहीही कळले नाही.
20अबशालोमाच्या माणसांनी जेव्हा त्या बाईच्या घरी येऊन विचारपूस केली, “अहीमाज व योनाथान कुठे आहेत?”
तिने उत्तर दिले, “ते ओढ्यापलीकडे गेले आहेत.”#17:20 किंवा मेंढवाड्याजवळून पाण्याकडे गेले. त्या माणसांनी शोध केला, पण त्यांना ते सापडले नाही. म्हणून ते यरुशलेमास परत गेले.
21ते तिथून निघून गेल्यानंतर, दोघेजण विहिरीतून बाहेर आले आणि दावीद राजाला जाऊन सांगितले, ते त्याला म्हणाले, “लवकर निघा आणि नदी पार करा; अहीथोफेलने तुमच्याविरुद्ध अमुक सल्ला दिला आहे.” 22तेव्हा दावीद आणि त्याच्या बरोबरच्या सर्व लोकांनी यार्देन नदी पार केली. दिवस उजाडेपर्यंत यार्देन पार केली नाही असा कोणीही मागे राहिला नाही.
23इकडे अबशालोमने आपल्या सल्ल्यानुसार केले नाही असे अहीथोफेलने पाहिले, तेव्हा त्याने आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि आपल्या जन्मगावी, आपल्या घराकडे निघून गेला. त्याने आपले घर नीटनेटके करून फाशी घेतली. तो मरण पावला आणि त्याला त्याच्या पित्याच्या कबरेत पुरले.
अबशालोमचा मृत्यू
24नंतर दावीद महनाईम येथे गेला आणि अबशालोम सर्व इस्राएली सैन्यासह यार्देन पार करून गेला. 25अबशालोमने योआबाच्या जागी अमासाची सेनापती म्हणून नेमणूक केली. अमासा हा इथ्रा#17:25 येथेरचे वेगळे रूप इश्माएली#17:25 इतर मूळ प्रतींनुसार इस्राएली याचा पुत्र असून, नाहाशाची कन्या, जेरुइयाहची बहीण योआबाची आई अबीगईल हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. 26अबशालोम व इस्राएली सैन्याने गिलआद देशात तळ दिला.
27दावीद जेव्हा महनाईम येथे पोहोचला, तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बाह येथील नाहाशाचा पुत्र शोबाई आणि लो-देबार येथील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील गिलआदी बारजिल्लई यांनी 28दावीद आणि त्याच्या लोकांसाठी बिछाने आणि पात्रे, मातीची भांडी आणली. त्यांना खाण्यासाठी गहू व जव, पीठ आणि भाजलेली धान्ये, शेंगा व डाळी, 29मध व दही, मेंढरे आणि गाईच्या दुधाचा खवा, हे सुद्धा आणले. कारण ते म्हणाले, “रानात दावीद आणि त्याचे लोक थकलेले, भुकेले व तहानलेले झाले असतील.”

सध्या निवडलेले:

2 शमुवेल 17: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन