2 शमुवेल 16
16
दावीद आणि सीबा
1जेव्हा दावीद डोंगराच्या माथ्यावर काही अंतरावर गेला, तिथे मेफीबोशेथचा कारभारी सीबा त्याला भेटण्यासाठी तिथे वाट पाहत होता. त्याच्याकडे खोगीर घातलेली गाढवे व त्यांच्यावर दोनशे भाकरी, मनुक्यांच्या शंभर ढेपा, अंजिराच्या शंभर ढेपा आणि द्राक्षारसाचा एक बुधला होता.
2राजाने सीबाला विचारले, “हे तू का आणले आहेस?”
सीबाने उत्तर दिले, “गाढवे राजघराण्यातील लोकांना बसण्यासाठी, भाकरी आणि फळे लोकांना खाण्यासाठी आणि हा द्राक्षारस रानातून जाताना जे कोणी थकून जातात त्यांना ताजेतवाने करण्यासाठी.”
3तेव्हा राजाने विचारले, “तुझ्या धन्याचा नातू कुठे आहे?”
सीबा त्याला म्हणाला, “तो यरुशलेमात राहत आहे, कारण त्याला असे वाटते, ‘इस्राएलचे लोक मला माझ्या आजोबांचे राज्य आज परत मिळवून देतील.’ ”
4तेव्हा राजा सीबाला म्हणाला, “मेफीबोशेथच्या मालकीचे जे सर्व आहे ते आता तुझे आहे.”
सीबा म्हणाला, “मी विनम्र अभिवादन करतो, माझ्या स्वामीची माझ्यावर कृपादृष्टी असो.”
शिमी दावीदाला शाप देतो
5दावीद राजा बहूरीमजवळ पोहोचताच, एक मनुष्य बाहेर आला, जो शौलाच्या घराण्यातील एका कुळातील होता. त्याचे नाव शिमी होते, तो गेराचा पुत्र होता, तो बाहेर येताच शाप देऊ लागला. 6त्याने दावीद व राजाच्या सर्व अधिकार्यांवर धोंडमार केली, सर्व सैन्यदल व विशेष अंगरक्षक दावीदाच्या उजव्या व डाव्या बाजूंना होते. 7शाप देत शिमी म्हणाला, “निघून जा, अरे तू खुनी, हलकट मनुष्या, चालता हो! 8ज्याच्या जागी तू राज्य केलेस त्या शौलाच्या घराण्याचा जो रक्तपात तू केला त्याचा मोबदला याहवेह तुला देत आहेत. आता याहवेहने ते राज्य तुझा पुत्र अबशालोम याच्या हाती दिले आहे. तू खुनी आहेस म्हणून तू नाशास येऊन ठेपला आहेस!”
9तेव्हा जेरुइयाहचा पुत्र अबीशाई राजाला म्हणाला, “या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामीला का शाप द्यावा? मला त्याच्याकडे जाऊन त्याचा शिरच्छेद करू द्या.”
10परंतु राजा म्हणाला, “अहो जेरुइयाहच्या पुत्रांनो, तुम्हाला याचे काय? याहवेहनेच जर त्याला सांगितले असले, ‘दावीदाला शाप दे,’ तर ‘तू असे का करतोस,’ असे त्याला कोणी विचारावे?”
11तेव्हा दावीद अबीशाई व त्याच्या सर्व अधिकार्यांना म्हणाला, “माझा पुत्र, माझे स्वतःचे रक्त-मांस मला मारून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, तर हा बिन्यामीन किती अधिक करेल! त्याला जाऊ द्या; व शाप देऊ द्या, कारण याहवेहने त्याला तसे करण्यास सांगितले आहे. 12मला होत असलेल्या त्रासाकडे कदाचित याहवेह पाहतील आणि या शापाऐवजी मी गमावलेला त्यांच्या कराराचा आशीर्वाद मला मिळवून देतील.”
13दावीद आणि त्याची माणसे त्यांच्या वाटेने पुढे जात राहिले आणि शिमी त्यांच्या समोरच्या टेकडीकडून, दावीदाला शाप देत, त्याच्यावर दगडफेक करीत व त्याच्यावर धूळ उधळत चालत होता. 14राजा व त्याच्या बरोबरचे सर्व लोक थकलेले असे त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले आणि तिकडे त्याने विसावा घेतला.
हूशाई आणि अहीथोफेल यांचा सल्ला
15त्या दरम्यान अबशालोम व इस्राएलचे सर्व लोक यरुशलेमास आले आणि अहीथोफेल त्याच्याबरोबर होता. 16तेव्हा दावीदाचा मित्र हूशाई अर्की अबशालोमकडे गेला व त्याला म्हणाला, “राजा चिरायू होवो! राजा चिरायू होवो!”
17अबशालोमने हूशाईला विचारले, “तुझ्या मित्रावर तू अशीच प्रीती दाखवितोस काय? तो जर तुझा मित्र आहे, तर तू त्याच्याबरोबर का गेला नाहीस?”
18हूशाई अबशालोमला म्हणाला, “नाही, याहवेहने आणि या लोकांनी, आणि सर्व इस्राएलच्या लोकांनी ज्याला निवडले आहे; मी त्याचा आहे आणि मी त्याच्याबरोबर राहणार. 19आणि मी कोणाची सेवा करावी? जशी मी आपल्या पित्याची सेवा केली तशीच मी त्यांच्या पुत्राची करू नये काय? म्हणून मी तुमची सेवा करणार.”
20अबशालोम अहीथोफेलला म्हणाला, “आम्हाला तुझा सल्ला दे, आम्ही काय करावे?”
21अहीथोफेलने अबशालोमास सल्ला दिला, “तुझ्या पित्याच्या उपपत्नी, ज्यांना तो राजवाड्याच्या देखरेखीसाठी सोडून गेला त्यांच्यापाशी जाऊन नीज. तेव्हा सर्व इस्राएलास समजेल की तू तुझ्या पित्याची किती घृणा करतो आणि तुझ्याबरोबर काम करीत असलेल्या प्रत्येकाचा हात बळकट होईल.” 22तेव्हा त्यांनी अबशालोमसाठी छतावर एक तंबू उभारला आणि तो सर्व इस्राएलच्या लोकांच्या नजरेपुढे त्याच्या पित्याच्या उपपत्नींपाशी जाऊन निजला.
23त्या दिवसांमध्ये अहीथोफेलने दिलेला कोणताही सल्ला जणू काय परमेश्वराकडे विचारल्याप्रमाणे होता. व त्याप्रमाणेच दावीद व अबशालोम त्याचा सल्ला मानीत असत.
सध्या निवडलेले:
2 शमुवेल 16: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.