YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 9

9
इस्राएलाचा राजा म्हणून येहूचा अभिषेक
1इकडे अलीशा संदेष्ट्याने एका तरुण संदेष्ट्याला संदेष्ट्यांच्या समुहातून बोलाविले आणि त्याला म्हटले, “तू आपली कंबर बांध, जैतून तेलाची कुपी बरोबर घे आणि रामोथ गिलआद येथे जा. 2जेव्हा तू तिथे पोहोचशील तेव्हा निमशी यहोशाफाटाचा पुत्र येहूचा शोध घे व त्याला त्याच्या मित्र मंडळीपासून दूर एका खाजगी खोलीत घेऊन जा, 3मग कुपी घे आणि तेल त्याच्या मस्तकांवर ओत आणि जाहीर कर, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझा इस्राएलाचा राजा म्हणून अभिषेक करतो.’ नंतर दार उघड आणि पळ; उशीर करू नकोस!”
4मग तो तरुण संदेष्टा रामोथ-गिलआद येथे गेला. 5जेव्हा तो तिथे पोहोचला, तेव्हा त्याने पाहिले की सेना अधिकारी सोबत बसलेले आहेत. तो म्हणाला, “सेनापती महोदय, माझ्याजवळ तुमच्यासाठी एक संदेश आहे.”
येहूने विचारले, “आमच्यापैकी कोणासाठी?”
त्याने उत्तर दिले, “सेनापती महोदय तुमच्यासाठी.”
6मग येहू उठला आणि तो आत घरात गेला. नंतर संदेष्ट्याने येहूच्या मस्तकांवर तेल ओतले आणि जाहीर केले, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: ‘मी तुझा याहवेहची प्रजा इस्राएलाचा राजा म्हणून अभिषेक करतो. 7तुला आपला स्वामी अहाबाच्या घराण्याचा नाश करावयाचा आहे. ईजबेलने माझ्या संदेष्ट्यांना आणि याहवेहच्या इतर सेवकांना ठार मारलेल्यांचा सूड तुला उगवावयाचा आहे. 8कारण अहाबाच्या संपूर्ण घराण्याचा नाश होईल. मी अहाबाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुष इस्राएल राष्ट्रातून मिटवून टाकीन तो दास असो किंवा स्वतंत्र. 9नेबाटाचा पुत्र यरोबोअम आणि अहीयाहचा पुत्र बाशा यांच्या घराण्यासारखे मी अहाबाच्या घराण्याचे करेन. 10ईजबेलला येज्रीलच्या भूमीत कुत्री फाडून खातील आणि तिला कोणीही मूठमाती देणार नाही.’ ” मग त्या तरुणाने दार उघडले आणि पळाला.
11येहू आपल्या सोबतच्या अधिकार्‍यांकडे परत आला. त्यापैकी एकाने त्याला विचारले, “सर्वकाही ठीक आहे ना? हा वेडा तुझ्याकडे का आला होता?”
येहूने उत्तर दिले, “तो कोण होता व त्याचे बोलणे हे तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे.”
12तेव्हा ते म्हणाले, “हे सत्य नाही, खरे काय आहे ते आम्हाला सांग.”
येहूने म्हटले, “त्याने मला म्हटले: ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझा इस्राएलाचा राजा होण्यासाठी अभिषेक करत आहे.’ ”
13हे ऐकून त्यांनी ताबडतोब त्याच्यासमोर पायर्‍यांवर आपल्या अंगरख्याच्या पायघड्या घातल्या व कर्णा वाजवून ते ओरडून म्हणाले, “येहू राजा झाला आहे.”
योराम व अहज्याह यांचा वध येहू करतो
14निमशीचा पुत्र यहोशाफाटचा पुत्र येहूने योराम राजाविरुद्ध बंड पुकारले. (त्यावेळेस योराम राजा सर्व सैन्यानिशी रामोथ गिलआद येथे अरामचा राजा हजाएलविरुद्ध इस्राएलांच्या बाजूने लढत होता. 15पण यहोराम राजा हा अरामचा राजा हजाएलशी लढताना ज्या जखमा अरामी लोकांनी दिल्या होत्या, त्या जखमा बर्‍या व्हाव्यात म्हणून तो येज्रीलला परतला होता.) येहू म्हणाला, “मी राजा व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल, तर आपण काय केले आहे हे कोणीही या नगरीतून निसटून ही बातमी येज्रीलमध्ये कोणालाही कळवू नये म्हणून खबरदारी घ्या.” 16मग येहू रथात बसला आणि येज्रीलास गेला, कारण योराम तिथे विसावा घेत होता आणि यहूदीयाचा राजा अहज्याह त्याला भेटण्यास खाली गेला होता.
17येज्रीलच्या बुरुजावर असलेला पहारेकरी येहू व त्याची टोळी येताना पाहून ओरडून म्हणाला, “मला एक टोळी येताना दिसत आहे.”
यहोरामाने आदेश दिला, “एका घोडेस्वारास त्यांना भेटण्यास पाठवा, जो त्यांना विचारेल, शांतीने येत आहात ना?”
18तेव्हा एक घोडेस्वार येहूला भेटण्यास गेला आणि म्हणाला, “राजाने असे म्हटले आहे: ‘तुम्ही शांतीने आला आहात का?’ ”
येहूने उत्तर दिले, “तुला शांतीचे काय घेणे देणे? चल, माझ्यामागे हो!”
तेव्हा पहारेकर्‍याने बातमी दिली, “आपला दूत तिथे पोहोचला, तो येणार्‍यांना भेटला, पण तो परत येत नाही.”
19मग राजाने दुसर्‍या घोडेस्वाराला पाठविले. तो त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, राजाने असे म्हटले आहे: तुम्ही शांतीने आला आहात का?
येहूने उत्तर दिले, “तुला शांतीचे काय घेणे देणे? चल, माझ्यामागे हो!”
20पहारेकर्‍याने बातमी दिली, “तो तिथे पोहोचला, पण तो ही परत येताना दिसत नाही. त्याचे घोडे हाकणे तर निमशीचा पुत्र येहूसारखे आहे—तो घाईने हाकीत आहे.”
21यहोरामाने फर्मान दिला, “माझा रथ तयार करा.” मग इस्राएलाचा राजा योराम आणि यहूदीयाचा राजा अहज्याह आपआपल्या रथात बसून येहूला भेटावयास निघाले. ते येहूला येज्रीली नाबोथच्या शेतात भेटले. 22जेव्हा यहोरामाने येहूस पाहिले, तेव्हा त्याने विचारले, “येहू, तुम्ही शांतीने आला आहात का?”
येहूने उत्तर दिले, “कशी राहील शांती, जेव्हा तुमची आई ईजबेलचे व्यभिचार आणि चेटके एवढे अधिक आहेत तोपर्यंत कशी शांती असेल?”
23ते ऐकताच यहोराम मागे फिरला आणि अहज्याहला ओरडून म्हणाला, “अहज्याह, विद्रोह, विद्रोह!”
24येहूने आपला धनुष्य सर्व शक्तिनिशी ओढला आणि यहोरामाच्या दोन्ही बाहूंच्यामध्ये मारला. बाण त्याच्या हृदयात शिरला, आणि तो रथातच कोसळून पडला. 25तेव्हा येहूने आपला साथीदार बिदकर याला म्हटले, “त्याला उचल आणि येज्रीली नाबोथच्या भूमीत फेकून दे, कारण स्मरण कर की मी आणि तू मिळून त्याचा पिता अहाब याच्यामागून रथामधून चाललो असताना याहवेहने ही भविष्यवाणी त्याच्या विरोधात केली होती: 26याहवेह जाहीर करतात, ‘मी काल नाबोथचे रक्त आणि त्याच्या पुत्रांचे रक्त पाहिले आहे आणि याच भूमीवर मी याची परतफेड करेन, असे याहवेह जाहीर करतात. वध केल्याबद्दल मी त्याचा बदला अहाबाला या नाबोथच्याच भूमीवर देईन.’ म्हणून आता याहवेहच्या वचनानुसार, त्याला उचल आणि त्याला त्या भूमीवर फेकून दे.”
27काय झाले ते पाहून, जेव्हा यहूदीयाचा राजा अहज्याह बेथ-हागानकडे जाणार्‍या मार्गाने पळाला. येहू त्याचा पाठलाग करता करता ओरडून म्हणाला, “त्यालाही मारा!” मग त्यांनी त्याला इब्लामजवळच्या गुर येथील चढणीवर रथातच घायाळ केले; तो मगिद्दोपर्यंत पळाला आणि तिथे तो मरण पावला. 28त्याच्या सेवकांनी त्याला रथामधूनच यरुशलेमास नेले व दावीदनगरीत त्याच्या पूर्वजांच्या थडग्यात त्याला मूठमाती दिली. 29(अहाबाचा पुत्र योरामच्या अकराव्या वर्षी अहज्याह यहूदीयाचा राजा झाला होता.)
ईजबेलचा वध
30नंतर येहू येज्रीलास गेला. जेव्हा ईजबेलने हे ऐकले, तेव्हा तिने आपल्या पापण्या रंगविल्या व केशभूषा करून ती खिडकीतून बाहेर पाहत बसली. 31जसा येहू वेशीतून आत आला, तिने विचारले, “अरे आपल्या धन्याचा वध करणाऱ्या जिम्रीच्या मुला, तू शांतीने आला आहेस का?”
32त्याने वर खिडकीकडे पाहिले आणि मोठ्याने म्हणाला, “माझ्या बाजूचे कोण आहेत? कोण?” तेव्हा दोघा तिघा खोजांनी त्याच्याकडे डोकावून पाहिले. 33येहूने म्हटले, “तिला खिडकीतून खाली ढकलून द्या.” तेव्हा त्यांनी तिला खाली ढकलून दिले, आणि तिच्या रक्ताच्या काही चिरकांड्या भिंतीवर आणि घोड्यांवर पडल्या आणि घोड्यांनी तिला पायाखाली तुडविले.
34येहू आत गेला आणि त्याने खाणेपिणे केले. तो म्हणाला, “त्या शापित स्त्रीची काळजी घ्या आणि तिला मूठमाती द्या. कारण ती एका राजकन्या होती.” 35परंतु जेव्हा ते तिला मूठमाती देण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना तिची फक्त कवटी व हात आणि पायच सापडले. 36ते परत गेले आणि येहूला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, “याहवेहचे वचन जे त्यांनी आपला सेवक एलीयाह तिश्बी याच्यामार्फत सांगितले होते ते हेच होते; येज्रीलच्या शेतात कुत्री ईजबेलचे मांस खातील. 37आणि ईजबेलचे शरीर येज्रीलातील शेतात खताप्रमाणे विखुरले जाईल. हे कोणालाही सांगता येणार नाही की, ही ईजबेल आहे.”

सध्या निवडलेले:

2 राजे 9: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन