YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 10

10
अहाबाच्या घराण्याचा वध
1शोमरोनात अहाबाचे सत्तर पुत्र होते. येहूने येज्रीलच्या अधिकाऱ्यांना, वडिलांना आणि अहाबाच्या पुत्रांच्या पालकांना: जे शोमरोनात होते त्यांना एक पत्र लिहिले, ज्यामध्ये असे लिहिलेले होते, 2“तुमच्यासोबत तुमच्या धन्याचे पुत्र आहेत आणि तुमच्याजवळ रथ आणि घोडे, तटबंदी असलेले शहर आणि हत्यारेही आहेत, जेव्हा हे पत्र तुम्हाला मिळताच, 3आपल्या धन्याच्या पुत्रांपैकी सर्वोत्तम आणि सर्वात योग्य निवडा आणि त्याला त्याच्या पित्याच्या सिंहासनावर बसवा. मग तुमच्या धन्याच्या घरासाठी लढा.”
4परंतु ते घाबरले आणि म्हणाले, “त्याला दोन राजे रोखू शकले नाहीत, तर आम्ही कसे करू शकतो?”
5मग राजवाड्याचा कारभारी, शहराचा कारभारी, वडील व त्या पुत्रांचे पालक यांनी येहूला हा निरोप पाठविला: “आम्ही तुमचे सेवक आहोत व तुम्ही जे काही सांगाल ते आम्ही करू. आम्ही कोणालाही राजा म्हणून नियुक्त करणार नाही; तुम्हाला जे उत्तम वाटते, ते तुम्ही करा.”
6मग येहूने दुसरे पत्र त्यांना लिहिले आणि त्यात असे लिहिलेले होते, “जर तुम्ही माझ्या बाजूचे असाल आणि माझ्या आज्ञा पाळणार असाल, तर उद्या याच वेळेला तुम्ही तुमच्या धन्याच्या पुत्रांची शिरे घेऊन मजकडे येज्रीलमध्ये या.”
आता सत्तर राजपुत्र शहराच्या प्रमुख व्यक्तीबरोबर होते, जे त्यांचे संगोपन करत होते. 7जेव्हा त्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी राजपुत्रांना घेतले आणि सर्व सत्तर पुत्रांना ठार केले. त्यांनी त्यांची शिरे टोपल्यांमध्ये भरून ती येहूला येज्रीलमध्ये पाठवून दिली. 8जेव्हा दूत त्याच्याकडे आला, त्याने येहूला सांगितले, “त्यांनी राजपुत्रांची शिरे आणली आहेत.”
तेव्हा येहूने आदेश दिला, “ती शिरे मुख्य वेशीजवळ, त्यांचे दोन ढीग करून सकाळपर्यंत ठेवावी.”
9दुसर्‍या दिवशी सकाळी येहू बाहेर आला. तो सर्व लोकांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्ही सर्व निर्दोष आहात. मी आपल्या धन्याच्या विरुद्ध षडयंत्र केले आणि त्याला ठार मारले, पण या सर्वांना कोणी मारले? 10तेव्हा हे जाणून घ्या, अहाबाच्या घराण्याविरुद्ध याहवेहने म्हटलेला एकही शब्द व्यर्थ जाणार नाही. याहवेहने ते पूर्ण केले जे त्यांनी त्यांचा सेवक एलीयाहद्वारे प्रकट केले होते.” 11असे येहूने येज्रीलमधील अहाबाच्या घराण्यातील सर्वांना, त्याचे मुख्य लोक, त्याचे सर्व जवळचे मित्र आणि त्याच्या याजकांना ठार मारले आणि कोणालाही जिवंत सोडले नाही.
12यानंतर येहू निघून शोमरोनाला गेला. वाटेत मेंढपाळांच्या बेथ-एकेद नावाच्या स्थानात गेला, 13त्याची भेट यहूदीयाचा राजा अहज्याहच्या काही नातेवाईकांसह झाली आणि येहूने त्यांना विचारले, “तुम्ही कोण आहात?”
ते म्हणाले, “आम्ही अहज्याहचे नातेवाईक आहोत आणि आम्ही राजा आणि राजमातेच्या कुटुंबीयांनी अभिवादन करण्यासाठी खाली आलो आहोत.”
14तेव्हा येहूने आदेश दिला, “त्यांना जिवंत पकडा!” तेव्हा त्यांनी त्यांना जिवंत पकडले आणि बेथ-एकेदच्या विहिरीजवळ—त्या बेचाळीस लोकांचा वध करण्यात आला. त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही.
15तो तिथून निघाला आणि त्याची भेट रेखाबाचा पुत्र यहोनादाबासोबत झाली, जो त्यालाच भेटावयाला येत होता. येहूने त्याला अभिवादन केले आणि म्हणाला, “जसा मी तुझ्या सहमत आहे, तसा तूही माझ्याशी सहमत आहेस काय?”
यहोनादाबाने उत्तर दिले, “होय निश्चित!”
तेव्हा येहू म्हणाला, “तर मग आपला हात मला दे.” आणि त्याने तसेच केले, आणि येहूने त्याला आपल्या रथामध्ये घेण्यास मदत केली. 16येहूने म्हटले, “आता माझ्याबरोबर चल आणि मी याहवेहविषयी किती उत्कट आस्था बाळगतो ते पाहा.” तेव्हा यहोनादाब त्याच्याबरोबर रथात बसून गेला.
17जेव्हा येहू शोमरोनात आला, त्याने अहाबाच्या घराण्यातील उर्वरित लोकांना ठार मारले; याहवेहने एलीयाहला सांगितलेल्या वचनाप्रमाणे येहूने त्यांचा सर्वनाश केला.
येहू बआलच्या सेवकांचा वध करतो
18नंतर येहूने सर्व लोकांना एकत्र केले आणि त्यांना म्हणाला, “अहाबाने बआलची थोडी सेवा केली; येहू त्याच्याहून अधिक सेवा करेल. 19म्हणून बआल दैवताच्या सर्व संदेष्ट्यांना आणि सर्व सेवकांना आणि सर्व याजकांना एकत्र बोलवा. कोणीही अनुपस्थित राहू नये याची खबरदारी घ्या, कारण मी बआलसाठी मोठा यज्ञ करणार आहे. जो कोणी येणार नाही त्याला ठार मारण्यात येईल.” परंतु बआलच्या सर्व भक्तांचा संहार करण्याच्या हेतूनेच येहूने ही योजना आखली होती.
20येहूने म्हटले, “बआलच्या आदरासाठी सभा बोलवा.” अशी त्यांनी त्याची घोषणा केली. 21नंतर येहूने सर्व इस्राएलात संदेश पाठविला आणि बआलचे सर्व सेवक आले; कोणीही मागे राहिला नाही. ते बआलचे मंदिर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत भरेपर्यंत गर्दी करत राहिले. 22आणि येहूने वस्त्र भांडाराच्या प्रमुखाला म्हटले, “बआलच्या सर्व सेवकांसाठी झगे घेऊन ये.” तेव्हा त्याने त्यांच्यासाठी झगे आणले.
23यानंतर येहू आणि रेखाबाचा पुत्र यहोनादाब मंदिरात गेले. येहू बआलच्या सेवकांना म्हणाला, “सभोवती दृष्टी टाका आणि पाहा की याहवेहची सेवा करणारा कोणीही तुमच्याबरोबर नाही—फक्त बआलचे सेवक आहेत.” 24म्हणून ते यज्ञार्पण व होमार्पण करण्यास आत गेले. आता येहूने ऐंशी माणसांना बाहेर ही ताकीद देऊन उभे केले होते: “जी माणसे तुमच्या तावडीत दिलेली आहेत, त्यातून एकही निसटून जायला नको, जर एकही तुमच्या तावडीतून निसटला, तर त्याबद्दल तुम्हाला तुमच्या जिवाची किंमत मोजावी लागेल.”
25येहूने होमार्पण करण्याचे संपविले त्याने ताबडतोब आपल्या पहारेकरी व अधिकाऱ्यांना आदेश दिला: “आता नगरात जा आणि त्यांना मारा; कोणीही निसटून जाऊ नये.” मग त्यांनी त्या सर्वांना तलवारीने मारले. पहारेकरी व अधिकाऱ्यांनी मृतदेह बाहेर फेकले आणि नंतर ते बआलच्या मंदिराच्या गाभार्‍यात गेले. 26बआलच्या मंदिरातून पवित्र स्तंभ बाहेर काढला आणि तो जाळून टाकला. 27त्यांनी बआलचा पवित्र स्तंभ नष्ट केला आणि बआलच्या मंदिराची मोडतोड केली आणि त्याचे सार्वजनिक शौचालय असा लोक आजही उपयोग करतात.
28याप्रमाणे येहूने इस्राएलमधून बआलची उपासना नष्ट केली. 29तरी देखील नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएलला करावयाला लावलेली पातके यापासून येहू फिरला नाही—त्याने बेथेल व दान येथील वासरांच्या सोन्याच्या मूर्तीची उपासना केली.
30याहवेह येहूला म्हणाले, “माझ्या दृष्टीने तू जे योग्य ते केले आहे आणि जे माझ्या मनात अहाबाचा घराण्याविषयी होते ते तू सर्व केले, म्हणून चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्राएलच्या राजासनावर बसतील.” 31परंतु येहू याहवेह इस्राएलांच्या परमेश्वराचे नियम आपल्या पूर्ण अंतःकरणाने पाळण्यात काळजीपूर्वक राहिला नाही. यरोबोअमने इस्राएलला करावयाला लावलेल्या पातकांपासून तो मागे फिरला नाही.
32त्या दिवसात याहवेह इस्राएलची घट करू लागले. हजाएलने इस्राएलाच्या सर्व सीमांवर त्यांचा पराभव केला. 33यार्देनच्या पूर्वेकडील भागापासून संपूर्ण गिलआद (गाद, रऊबेन आणि मनश्शेहचा भाग), आर्णोन खोर्‍याच्या जवळील अरोएरापासून गिलआद व बाशानपर्यंतचे सर्व प्रदेश जिंकले.
34येहूच्या बाकीच्या कारकिर्दीची नोंद इस्राएलाच्या राजाचा इतिहास या ग्रंथात नमूद केली नाही काय?
35येहू मरण पावल्यानंतर त्याला शोमरोन येथे मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर त्याचा पुत्र यहोआहाज राज्य करू लागला. 36येहूने इस्राएलाचा राजा म्हणून शोमरोनात अठ्ठावीस वर्षे राज्य केले.

सध्या निवडलेले:

2 राजे 10: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन