2 राजे 11
11
अथल्याह आणि योआश
1जेव्हा अहज्याहची आई अथल्याह हिने पाहिले की तिचा पुत्र मरण पावला आहे, तेव्हा ती राजघराण्याचा नाश करण्यास निघाली. 2परंतु यहोराम राजाची कन्या आणि अहज्याहची बहीण यहोशेबाने अहज्याहचा पुत्र योआशला घेतले आणि ज्या राजपुत्रांची कत्तल करण्यात येणार होती त्यामधून त्याला चोरले. त्याला आणि त्याच्या दाईला विश्रांतिगृहात अथल्याहपासून लपवून ठेवले; म्हणून त्याचा वध झाला नाही. 3अथल्याहने देशावर राज्य केले त्या सहा वर्षापर्यंत तो व त्याच्या दाईस याहवेहच्या मंदिरात लपवून ठेवण्यात आले होते.
4सातव्या वर्षी यहोयादाने शंभर तुकड्यांचे सरदार, गारदी आणि पहारेकरी यांना बोलावून घेतले आणि त्यांना आपल्यासोबत याहवेहच्या मंदिरात नेले. याहवहेच्या मंदिरात त्यांच्याशी करार आणि शपथ घेऊन त्यांना राजाचा पुत्र दाखविला. 5त्यांना आदेश देत तो म्हणाला, “तुम्ही असे करावे: शब्बाथ दिवशी तुमच्यापैकी जे पहार्यावर असतील त्यातील—एकतृतीयांश राजमहालावर पहारा देतील. 6आणि एकतृतीयांश सूर वेशीवर आणि एकतृतीयांश पहारेकर्यांच्या मागच्या वेशीवर, जे वेळोवेळी मंदिराची रक्षा करीत होते— 7आणि तुमच्या दोन तुकड्या ज्या शब्बाथ दिवसात कार्यासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत, त्यांनी राजाकरिता याहवेहच्या मंदिराचे रक्षक म्हणून उभे राहावे. 8तुम्ही सर्व आपआपली शस्त्रे हातात घेऊन राजाभोवती उभे राहावे. जो कोणी तुमच्या रांगेच्याजवळ येण्याचा प्रयत्न करेल त्याला जिवे मारावे. राजा जिथे जाईल तिथे तुम्ही त्याच्याजवळ राहावे.”
9यहोयादा याजकाच्या आज्ञेप्रमाणे शताधिपतींनी केले. प्रत्येकाने आपआपली माणसे घेतली—जे शब्बाथाच्या दिवशी सेवेला येणार होते आणि जे सेवा संपवून जात होते—ते सर्व यहोयादा याजकाजवळ आले. 10याहवेहच्या मंदिरामधील दावीद राजाचे जे भाले व ढाली होत्या, त्या अधिकाऱ्यांच्या हाती दिल्या. 11प्रत्येकाच्या हातात शस्त्र घेऊन पहारेकरी राजाभोवती; मंदिराच्या दक्षिणेकडून उत्तरेच्या बाजूपर्यंत; वेदीजवळ व मंदिराजवळ उभे राहिले.
12मग यहोयादाने राजाच्या पुत्राला बाहेर आणले, त्याच्या शिरावर राजमुकुट ठेवला; त्याच्या हातामध्ये कराराची प्रत दिली आणि त्याला राजा म्हणून घोषित केले. मग त्यांनी त्याला अभिषेक केला आणि लोकांनी टाळ्या वाजविल्या व मोठ्याने जयघोष करून ते म्हणाले, “राजा चिरायू होवो!”
13जेव्हा अथल्याहने पहारेकर्यांचा आणि लोकांचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली. 14तिने बघितले की रीतीनुसार राजा खांबाजवळ उभा आहे. अधिकारी आणि कर्णेवादक हे राजाजवळ उभे होते आणि राष्ट्रातील सर्व लोक आनंद करीत कर्णे वाजवित होते. तेव्हा अथल्याहने आपली वस्त्रे फाडली आणि ओरडून म्हणाली, “फितुरी रे, फितुरी!”
15यहोयादा याजकाने नेमणूक केलेल्या शताधिपतीच्या सेनाधिकार्यांना आदेश दिला: “सैन्याच्या रांगेतून तिला बाहेर काढा आणि जो कोणी तिच्यामागे जाईल त्याला तलवारीने मारा.” याजकाने म्हटले होते, “तिला याहवेहच्या मंदिरात जिवे मारले जाऊ नये.” 16म्हणून ती घोडे जिथून राजवाड्याच्या मैदानात प्रवेश करतात तिथे पोहोचताच त्यांनी तिला ताब्यात घेतले आणि तिथे तिला जिवे मारण्यात आले.
17मग यहोयादाने याहवेह आणि राजा आणि प्रजा यांच्यात एक करार केला की ते याहवेहची प्रजा असणार. त्याने राजा आणि प्रजा यांच्यामध्येही एक करारही केला. 18देशातील सर्व लोक बआलच्या मंदिराकडे गेले आणि त्यांनी ते तोडून टाकले. त्यांनी वेद्या आणि मूर्ती फोडून त्याचे तुकडे केले आणि बआलचा पुजारी मत्तानचा वेदींसमोर वध केला.
मग यहोयादा याजकाने याहवेहच्या मंदिरावर पहारेकरी नेमले. 19त्याने त्याच्याबरोबर शताधिपती, गारदी, पहारेकरी आणि देशातील सर्व लोकांना घेतले आणि एकत्र जाऊन याहवेहच्या मंदिरातून राजाला खाली आणले आणि पहारेकर्यांच्या द्वारातून प्रवेश करीत राजवाड्यात गेले. मग राजाने राजासनावर आपले स्थान घेतले. 20राष्ट्रातील प्रत्येकजण आनंद करीत होता आणि शहर शांत झाले, कारण राजवाड्यात अथल्याहचा तलवारीने वध करण्यात आला होता.
21वयाच्या सातव्या वर्षी यहोआश राज्य करू लागला.
सध्या निवडलेले:
2 राजे 11: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.