2 राजे 22
22
नियमशास्त्राचे पुस्तक सापडते
1वयाच्या आठव्या वर्षी योशीयाह राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये एकतीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यदीदाह होते. ती बसकाथ येथील अदायाहची कन्या होती. 2याहवेहच्या दृष्टीने जे योग्य तेच त्याने केले आणि उजवीकडे किंवा डावीकडे न वळता त्याने त्याचे पूर्वज दावीदच्या मार्गांचे पूर्णपणे पालन केले.
3त्याच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी योशीयाह राजाने मशुल्लामचा पुत्र, अजल्याहचा पुत्र व त्याचा चिटणीस शाफानला याहवेहच्या मंदिरात पाठवले. त्याने म्हटले: 4“मुख्य याजक हिल्कियाहकडे जा व याहवेहच्या मंदिरात आलेले पैसे, जे द्वारपालांनी गोळा केले होते ते याजकांनी तयार ठेवावे. 5त्यांनी ते मंदिरातील कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या पुरुषांकडे सोपवावे. आणि या लोकांनी याहवेहच्या मंदिराची दुरुस्ती करणार्या कामगारांना द्यावे— 6सुतार, बांधकाम करणारे, गवंडी यांना द्यावा आणि मंदिराच्या डागडुजीसाठी लागणारी लाकडे व घडीव दगड विकत घेण्यात यावे. 7परंतु ज्यांच्याजवळ पैसा देण्यात आलेला आहे त्यांचा हिशोब ठेवण्याची गरज नव्हती, कारण ते विश्वासूपणे कार्य करीत आहेत.”
8मुख्य याजक हिल्कियाहने शाफान चिटणीसाला म्हटले, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” त्याने तो शाफानकडे दिला, ज्याने ते वाचले. 9मग शाफान चिटणीस राजाकडे गेला आणि त्याला अहवाल दिला: “तुझ्या सेवकांना जे पैसे याहवेहच्या मंदिरासाठी मिळाले, त्यांनी ते मंदिराचे कामगार व कामाची देखरेख करणार्यांच्या हाती दिले आहेत.” 10मग शाफान चिटणीसाने राजाला माहिती दिली, “हिल्कियाह याजकाने मला एक पुस्तक दिले आहे.” आणि शाफानाने राजाच्या उपस्थितीत त्यामधून वाचवून दाखविले.
11जेव्हा राजाने नियमशास्त्रातील वचने ऐकली, तेव्हा त्याने दुःखाने आपली वस्त्रे फाडली. 12त्याने याजक हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मिखायाहचा पुत्र अकबोर आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला: 13“जा आणि माझ्यासाठी आणि लोकांसाठी आणि सर्व यहूदीयासाठी, त्यांच्याबद्दल या पुस्तकात लिहिलेले जे काही सापडले आहे, त्याबद्दल याहवेहकडे चौकशी करा. याहवेहचा फार मोठा क्रोध आपल्यावर पेटला आहे, कारण आपल्या पूर्वजांनी याहवेहच्या वचनाचे पालन केले नाही; या पुस्तकात जे सर्वकाही लिहिलेले आहे त्याप्रमाणे ते वागले नाहीत.”
14याजक हिल्कियाह, अहीकाम, अकबोर, शाफान आणि असायाह हे हरहसाचा पुत्र, तिकवाहचा पुत्र शल्लूम जो पोशाख भांडाराचा अधिकारी होता, याची पत्नी हुल्दाह जी संदेष्टी होती, तिच्याकडे बोलण्यास गेले. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती.
15ती त्यांना म्हणाली, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ज्या मनुष्याने तुम्हाला माझ्याकडे पाठवले आहे, त्याला सांगा, 16‘याहवेह असे म्हणतात: यहूदीयाच्या राजाने वाचलेल्या ग्रंथात जे सर्व लिहिले आहे त्यानुसार मी या ठिकाणावर आणि येथील लोकांवर संकट आणेन. 17कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि इतर दैवतांना धूप जाळले आहेत आणि त्यांच्या हातांनी तयार केलेल्या सर्व मूर्तींमुळे त्याने माझा राग पेटविला आहे आणि माझा राग या जागेवर ओतला जाईल आणि तो शांत होणार नाही.’ 18ज्याने तुम्हाला याहवेहची चौकशी करण्यासाठी पाठविले आहे त्या यहूदीयाच्या राजाला हे जाऊन सांगा, ‘जे वचन तुम्ही ऐकले त्याबद्दल याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: 19कारण तुझे अंतःकरण प्रतिसाद देणारे आहे आणि जेव्हा या ठिकाणाविषयी आणि येथील लोकांविरुद्ध मी जे काही बोललो ते तू ऐकले; की ते शापित होऊन ओसाड पडतील, तेव्हा तू स्वतःला नम्र केलेस आणि तू माझ्यासमोर नम्र झालास आणि तुझी वस्त्रे फाडली आणि माझ्यासमोर रडलास, म्हणून मी तुझे ऐकले आहे, असे याहवेह जाहीर करतात. 20म्हणून मी तुला तुझ्या पूर्वजांबरोबर मिळवेन आणि तुला शांतीने पुरले जाईल. या ठिकाणावर मी जे संकट आणणार आहे, ते तुझ्या डोळ्यांना दिसणार नाही.’ ”
तेव्हा त्यांनी परत जाऊन तिचे उत्तर राजाला सांगितले.
सध्या निवडलेले:
2 राजे 22: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.