YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 23

23
योशीयाह कराराचे नूतनीकरण करतो
1नंतर राजाने यहूदीया आणि यरुशलेममधील सर्व वडीलजनांना एकत्र बोलाविले. 2यहूदीयाचे लोक, यरुशलेम येथील रहिवासी, याजक आणि संदेष्टे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांबरोबर राजा याहवेहच्या मंदिरात गेला. याहवेहच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व शब्द त्याने त्यांना ऐकू जातील असे वाचून दाखविले. 3राजा त्या स्तंभाजवळ उभा राहिला आणि त्याने याहवेहसमोर याहवेहचे अनुसरण करणे आणि त्यांच्या आज्ञा, कायदा आणि नियमांचे पालन करणे आणि या ग्रंथात लिहिलेल्या शब्दांचे त्याच्या संपूर्ण अंतःकरणाने आणि संपूर्ण आत्म्याने पालन करण्याच्या कराराची पुष्टी केली. नंतर सर्व लोकांनी आपणास त्या कराराशी वचनबद्ध केले.
4राजाने मुख्य याजक हिल्कियाह, इतर याजक आणि मंदिराचे द्वारपाल यांना सूचना दिली की याहवेहच्या मंदिरातील, बआल व अशेरा, सूर्य, चंद्र आणि तारे यांची उपासना करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या सर्व वस्तू नष्ट कराव्या. राजाने त्या सर्व वस्तू यरुशलेमा बाहेर किद्रोनच्या खोऱ्यातील एक शेतात जाळून टाकल्या आणि त्यांची राख बेथेलास नेली. 5यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी नेमलेल्या मूर्तिपूजक याजकांना त्याने ठार मारले. कारण त्यांनी यहूदीया आणि यरुशलेमच्या नगरातील टेकड्यांवरील मंदिरात धूप जाळलेला होता. त्यांनी बआल, सूर्य, चंद्र, तारे व ग्रह यांनाही धूप जाळला होता. 6त्याने याहवेहच्या मंदिरातून अमंगळ अशेरामूर्ती काढून टाकली आणि ती यरुशलेमबाहेर किद्रोनच्या खोऱ्याजवळ नेली. तिथे त्याने ती पूर्ण जाळली आणि तिची राख केली आणि ती राख सामान्य लोकांच्या कबरांवर फेकून दिली. 7याहवेहच्या मंदिरासभोवती असलेल्या पुरुषगामींची घरेही त्याने पाडून टाकली. या घरातच स्त्रिया अशेराच्या मूर्तींसाठी लागणारे झगे विणीत असत.
8यहूदीयाच्या इतर शहरांमध्ये राहणार्‍या याजकांना योशीयाह राजाने यरुशलेमास परत आणले. पर्वतांवरील सर्व मंदिरे तसेच गेबापासून बेअर-शेबा पर्यंतची सर्व मंदिरे त्याने पाडून भ्रष्ट केली. यरुशलेम नगरवेशीजवळील डाव्या बाजूला नगराध्यक्ष यहोशुआच्या वाड्याच्या प्रवेशद्वाराशी असलेली मंदिरेही त्याने नष्ट केली. 9जरी उच्च स्थानांच्या मंदिराचे याजक यरुशलेमातील याहवेहच्या वेदीवर सेवा करीत नसत, तरीही ते इतर याजकांच्या बेखमीर भाकरीचे भोजन करावयास बसत असत.
10कोणीही आपला पुत्र अथवा कन्या यांचा मोलख दैवताला अग्नीत होम करू नये म्हणून राजाने बेन हिन्नोम खोर्‍यातील तोफेत#23:10 तोफेत म्हणजे अग्निकुंड अशुद्ध केले. 11त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी सूर्याला समर्पित केलेल्या घोड्यांचे पुतळे पाडून टाकले. ते नाथान-मेलेक या खोजाच्या कोठडीजवळ होते. योशीयाहने सूर्याला समर्पित रथही अग्नीने जाळून टाकले.
12यहूदीयाच्या राजांनी राजवाड्यात आहाज राजाच्या खोलीच्या छतावर उभारलेल्या वेद्याही त्याने पाडून टाकल्या. याहवेहच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात मनश्शेहने बांधलेल्या वेद्या सुद्धा त्याने नष्ट केल्या. त्यांचा चुराडा करून त्यांची धूळ त्याने किद्रोनच्या खोऱ्यात फेकून दिली. 13पुढे शलोमोनाने यरुशलेमच्या पूर्वेकडील आणि विध्वंसगिरीच्या दक्षिणेकडील टेकड्यांवरील मंदिरे काढून टाकली. ही मंदिरे इस्राएलचा राजा शलोमोनाने सीदोन्यांच्या अष्टारोथ, मोआबाच्या कमोश आणि अम्मोन्यांच्या मिलकाम या अमंगळ दैवतांसाठी बांधली होती. 14योशीयाहने मूर्तिस्तंभ पाडले आणि अशेराच्या ओंगळ मूर्ती फोडल्या, नंतर ते ठिकाण मानवांच्या हाडांनी भरून ठेवले.
15बेथेल येथे उभारलेली वेदी, टेकड्यांवरील मंदिरे, नेबाटाचा पुत्र यरोबोअमद्वारे तयार करण्यात आलेली वेदी, ज्याद्वारे इस्राएली लोकांनी पाप केले होते ती आणि टेकड्यांवरील मंदिरे पाडून टाकली. त्याने त्या मंदिराचे धोंडे जमीनदोस्त करून त्याचा भुगा केला आणि अशेराची ओंगळ मूर्ती जाळून भस्म केली. 16योशीयाहने चौफेर नजर फिरविली, तेव्हा त्याला डोंगराच्या बाजूला कित्येक कबरा आढळल्या, त्याने आपल्या सेवकांना आज्ञा केली की त्या कबरांमधील हाडे जमा करून ती बेथेलमधील वेदीवर जाळून ती वेदी भ्रष्ट करावी. जेव्हा यरोबोअम सणाच्या वेळी वेदीजवळ उभा राहिला होता तेव्हा परमेश्वराच्या मनुष्याने याहवेहच्या संदेशानुसार भविष्यवाणी केली होती तसेच हे घडले.
17राजाने विचारले, “पलीकडे जे कबरेचे स्मारक दिसते ते कोणाचे आहे?”
तेव्हा शहरातील लोकांनी त्याला सांगितले, “हे परमेश्वराच्या संदेष्ट्याचे स्मारक आहे, जो यहूदीयातून आला होता आणि बेथेलच्या वेदीची नुकतीच जी पाडापाड केली, त्यासंबंधीचे भाकीत ज्या संदेष्ट्याने केले होते, त्याची ती कबर आहे.”
18तेव्हा राजा म्हणाला, “त्याच्या स्मारकाला धक्का लावू नका. त्याच्या हाडांना सुद्धा धक्का लावू नका.” राजाज्ञेवरून त्यांनी त्याच्या आणि शोमरोनातील संदेष्ट्याच्या अस्थी जाळल्या नाहीत.
19त्याने योशीयाहने बेथेलप्रमाणेच शोमरोनाच्या नगराच्या टेकड्यांवरील सर्व मंदिरे नष्ट केली. इस्राएलाच्या निरनिराळ्या राजांनी ती बांधली होती. यामुळे याहवेहला या गोष्टीचा फार क्रोध आलेला होता. 20योशीयाहने जे याजक वेदीवर उच्चस्थानी होते त्यांना त्या वेद्यांवरच जिवे मारले. नंतर त्या वेद्यांवर लोकांची हाडे जाळून त्याने त्या भ्रष्ट केल्या. मग तो यरुशलेमात परतला.
21राजाने सर्व लोकांना आदेश दिला: “कराराच्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे याहवेह तुमच्या परमेश्वराकरिता वल्हांडण सण साजरा करा.” 22इस्राएलच्या शास्त्यांच्या काळापासून आणि इस्राएलचे राजे आणि यहूदीयातील राजांच्या दिवसात सुद्धा असा वल्हांडण सण साजरा केला नव्हता. 23हा वल्हांडण सण योशीयाह राजाच्या अठराव्या वर्षी यरुशलेममध्ये याहवेहसाठी साजरा करण्यात आला.
24योशीयाहने यहूदीया व यरुशलेममधील प्रेत साधक, भूतविद्या करणारे, कुलदैवते व मूर्ती, आणि सर्वप्रकारच्या घृणास्पद वस्तू काढून टाकल्या. हिल्कियाह याजकाला याहवेहच्या मंदिरात आढळलेल्या नियमांच्या पुस्तकात जे लिहिले होते ते पूर्ण करण्यासाठी त्याने असे केले. 25योशीयाह सारखा कोणीही राजा त्याच्या आधी व त्याच्यानंतर झाला नाही ज्याने याहवेहकडे वळून मोशेचे नियमशास्त्र पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्णशक्तीने पाळले.
26इतके होऊनही यहूदीयाच्या विरुद्ध आलेला याहवेहचा महाक्रोध कमी झाला नव्हता, मनश्शेह राजाने जी दुष्टता केली होती त्यामुळे त्यांचा यहूदाहवरचा राग कमी झाला नाही. 27म्हणून याहवेहने म्हटले, “इस्राएलप्रमाणे मी यहूदीयालाही माझ्या उपस्थितीतून काढून टाकेन आणि मी स्वतः ज्या नगरीला निवडले होते त्या यरुशलेमचा आणि या मंदिराचाही ज्याबद्दल मी म्हटले होते, ‘तिथे माझे नाव राहील’#23:27 1 राजे 8:29  त्यांचा त्याग करेन.”
28योशीयाहच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने जे सर्व केले, ते यहूदीयाच्या राजांचा इतिहासग्रंथामध्ये नमूद केलेले नाही काय?
29योशीयाह राजा असताना, इजिप्तचा राजा फारोह नखो हा अश्शूरच्या राजाला मदत करण्यासाठी फरात#23:29 फरात किंवा ज्याला आजच्या काळात युफ्रेटिस या नावाने ओळखले जाते नदीजवळ गेला. योशीयाह राजा त्याचा सामना करण्यासाठी युद्धास गेला, परंतु नखो राजाने त्याचा सामना केला आणि मगिद्दो येथे त्याला मारून टाकले. 30योशीयाहच्या सेवकांनी त्याचे प्रेत रथात घालून मगिद्दोहून यरुशलेमास आणले आणि त्याला त्याच्या कबरेत पुरण्यात आले. आणि त्या देशातील लोकांनी योशीयाहचा पुत्र यहोआहाजचा अभिषेक करून त्याच्या पित्याच्या जागेवर राजा केले.
यहूदीयाचा राजा यहोआहाज
31वयाच्या तेविसाव्या वर्षी यहोआहाज राजा झाला आणि त्याने तीन महिने यरुशलेमात राज्य केले, त्याच्या आईचे नाव हमूटल असे होते; ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती. 32त्याने आपल्या पूर्वजांच्या प्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. 33त्याने यरुशलेमात राज्य करू नये म्हणून फारोह नखोने त्याला हमाथातील रिब्लाह येथे बेड्या घालून ठेवले. फारोह नखोने यहूदीयावर शंभर तालांत चांदी#23:33 अंदाजे 3.4 मेट्रिक टन आणि एक तालांत सोने#23:33 अंदाजे 34 कि.ग्रॅ. असा कर लादला. 34फारोह नखोने योशीयाहचा पुत्र एल्याकीमला त्याच्या पित्याच्या जागी राजा केले आणि एल्याकीमचे नाव बदलून यहोयाकीम ठेवले. परंतु त्याने यहोआहाजाला इजिप्तमध्ये नेले आणि तिथे तो मरण पावला. 35यहोयाकीमने फारोह नखोने मागितलेले सोने आणि चांदी दिली. असे करण्यासाठी त्याने जमिनीवर कर लावला आणि तेथील लोकांकडून चांदी व सोने वसूल केले.
यहूदीयाचा राजा यहोयाकीम
36वयाच्या पंचविसाव्या वर्षी यहोयाकीम राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबूदाह होते; ती रुमाह येथील पदायाहची कन्या होती. 37त्याच्या पूर्वजांच्या प्रमाणे त्याने याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले.

सध्या निवडलेले:

2 राजे 23: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन