YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 राजे 21

21
यहूदीयाचा राजा मनश्शेह
1वयाच्या बाराव्या वर्षी मनश्शेह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात पंचावन्न वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हेफसीबाह होते. 2त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले, याहवेहने इस्राएली लोकांतून काढून टाकलेल्या राष्ट्रांच्या अमंगळ प्रथांचे अनुसरण त्याने केले. 3त्याचे वडील हिज्कीयाहने नष्ट केलेली उच्च स्थाने त्याने पुन्हा बांधली; इस्राएलचा राजा अहाबने केल्याप्रमाणे त्यानेही बआल दैवतांसाठी वेद्या आणि अशेराचे स्तंभ तयार केले. त्याने सर्व तारांगणांना लवून नमन केले आणि त्यांची उपासना केली. 4त्याने याहवेहच्या मंदिरात वेद्या बांधल्या, ज्याबद्धल याहवेहने म्हटले होते, “मी यरुशलेमात माझे नाव ठेवेन.” 5याहवेहच्या मंदिराच्या दोन अंगणात त्याने सर्व तारांगणासाठी वेद्या बांधल्या. 6त्याने आपल्याच पुत्राचे अग्नीत अर्पण केले, जादूटोणा केला, शुभशकुन शोधले आणि भूतविद्यांचा सल्ला घेतला. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट तसे पुष्कळ काही करून याहवेहचा राग पेटविला.
7त्याने घडविलेली कोरीव अशेराची स्तंभे घेतली व मंदिरात ठेवली. या मंदिराविषयी याहवेह, दावीद व त्याचा पुत्र शलोमोनला म्हणाले होते, “इस्राएलांच्या सर्व गोत्रांतून मी निवडलेल्या यरुशलेम शहरात व या मंदिरात माझे नाव मी सर्वकाळासाठी ठेवेन. 8जर ते केवळ माझा सेवक मोशेने दिलेले सर्व नियम, विधी आणि आज्ञांचे काळजीपूर्वक पालन करतील तर जी भूमी मी त्यांच्या पूर्वजांस दिली आहे त्यातून इस्राएली लोकांचे पाय भटकू देणार नाही.” 9परंतु लोकांनी ऐकले नाही. मनश्शेहने त्यांना मार्गभ्रष्ट केले म्हणून त्यांनी ज्यांचा इस्राएली लोकांसमोर याहवेहने नाश केला होता अशा राष्ट्रांपेक्षा अधिक दुष्टपणा केला.
10त्यावेळी याहवेहने आपले सेवक संदेष्ट्यांद्वारे म्हटले होते: 11“यहूदीयाचा राजा मनश्शेह यानेही अमंगळ कृत्ये केली आहेत. एवढेच नाही, त्याने त्याच्या आधीच्या अमोरी लोकांपेक्षाही अधिक दुष्ट कर्मे केली आहेत आणि त्याने यहूदी लोकांना आपल्या मूर्तींसाठी तेच पाप करण्यास लावले. 12म्हणून याहवेह इस्राएलांचे परमेश्वर म्हणतात: पाहा, मी यरुशलेम व यहूदीया यांच्यावर असे भयंकर संकट आणेन की, त्याबद्दल जे लोक ऐकतील, त्यांचे कान भणभणतील. 13मी यरुशलेमावर शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबाच्या घराण्याला लावलेला ओळंबा ताणीन. जसा कोणी भांडे पुसून पालथे करून ठेवतो तसेच मी यरुशलेमाचे करेन. 14मी माझ्या वतनातील उर्वरित लोकांना नाकारीन आणि त्यांना शत्रूंच्या हाती देईन. त्यांचे सर्व शत्रू त्यांना लुटतील आणि ते त्यांचे भक्ष्य असे होतील; 15त्यांचे पूर्वज इजिप्तमधून बाहेर आले तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी माझ्या दृष्टीने जे वाईट आहे ते केले आहे आणि माझा क्रोध भडकविला आहे.”
16शिवाय, मनश्शेहने इतके निष्पाप रक्त सांडले की यरुशलेम पूर्ण रक्ताने भरून गेले—त्याने यहूदाहला जे पाप करावयाला लावले होते त्या शिवाय त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले.
17मनश्शेहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले आणि त्याने जे पाप केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिल्या नाहीत काय? 18मनश्शेह आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला त्याच्या राजवाड्याच्या बागेत, उज्जाच्या बागेत पुरण्यात आले आणि त्याच्या ठिकाणी त्याच्या पुत्र आमोन राज्य करू लागला.
आमोन यहूदीयाचा राजा
19वयाच्या बावीसाव्या वर्षी आमोन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात दोन वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव मेशुल्लेमेथ असे होते, ती यटबाह हारूसची कन्या होती. 20त्याने आपला पिता मनश्शेहप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते केले. 21त्याचा पिता ज्या मार्गात चालला त्याचे त्याने पूर्णतः पालन केले, ज्या मूर्तीची उपासना त्याचा पिता करीत असे, त्याच मूर्तीची त्यानेही उपासना केली आणि त्यांना नमन केले. 22त्याने याहवेह आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराला सोडले आणि त्यांच्या मार्गात चालला नाही.
23आमोनच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याविरुद्ध कट रचला आणि राजाची त्याच्या राजवाड्यात हत्या केली. 24तेव्हा त्या देशातील लोकांनी आमोन राजाविरुद्ध ज्यांनी कट रचला होता, त्या सर्वांना ठार मारले आणि त्यांनी त्याचा पुत्र योशीयाहला त्याच्या जागेवर राजा केले.
25आमोनाच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने जे सर्व केले, हे यहूदीयाच्या राजांचा इतिहासग्रंथात नमूद केलेले नाही काय? 26उज्जाच्या बागेत त्याला त्याच्याच कबरेत मूठमाती देण्यात आली. आणि त्याच्या ठिकाणी त्याचा पुत्र योशीयाह राजा झाला.

सध्या निवडलेले:

2 राजे 21: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन