2 राजे 20
20
1त्या दिवसांमध्ये हिज्कीयाह राजा आजारी पडला आणि मरणपंथाला लागला. आमोजाचा पुत्र यशायाह संदेष्टा त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: तुझ्या घराची आवराआवर कर, कारण तू मरणार आहेस; तू बरा होणार नाहीस.”
2हे ऐकताच हिज्कीयाहने आपले तोंड भिंतीकडे वळविले आणि याहवेहकडे प्रार्थना केली, 3“हे याहवेह, मी तुमच्यापुढे कसा विश्वासूपणाने आणि पूर्ण मनोभावे समर्पित होऊन चाललो व नेहमी तुमच्या दृष्टीने योग्य तेच केले, याचे स्मरण करा.” आणि हिज्कीयाह अतिदुःखाने रडू लागला.
4यशायाह नगरीच्या राजवाड्याच्या आवाराबाहेर जाण्यापूर्वीच याहवेहचे वचन त्याच्याकडे आले: 5“परत जा आणि माझ्या लोकांचा अधिपती हिज्कीयाहला सांग, ‘तुझे पूर्वज दावीदाचे परमेश्वर, याहवेह असे म्हणतात: मी तुझी प्रार्थना ऐकली आणि तुझे अश्रू पाहिले आहेत; आजपासून तिसर्या दिवशी तू याहवेहच्या मंदिरात जाशील. मी तुझ्या आयुष्यात पंधरा वर्षांची भर घालेन. 6आणि मी तुला आणि या शहराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवेन. माझ्या नावाच्या गौरवासाठी व माझा सेवक दावीदासाठी मी या शहराचे रक्षण करेन.’ ”
7तेव्हा यशायाहने म्हटले, “अंजिराचा लेप तयार करा.” त्यांनी तसे केले आणि त्याच्या गळवावर लावला आणि तो बरा झाला.
8हिज्कीयाहने यशायाहास विचारले, “याहवेह मला बरे करतील व मी आजपासून तीन दिवसांनी याहवेहच्या मंदिरात जाईन याचे चिन्ह काय असेल?”
9यशायाहने उत्तर दिले, “याहवेहचे हे चिन्ह तुझ्यासाठी आहे, जे अभिवचन याहवेहने दिले आहे त्याप्रमाणे ते करतील: तू सांग, सावली दहा पावले पुढे जावी कि दहा पावले मागे जावी?”
10हिज्कीयाह म्हणाला, “सावली पुढेच जात असते ही साधारण गोष्ट आहे, तेव्हा ती मागे जावी असे करा!”
11मग यशायाह संदेष्ट्याने याहवेहला हाक मारली, आणि याहवेहने आहाजाच्या सूर्य घड्याळावर सावली दहा पावले मागे सरकविली.
बाबिलोनचे राजदूत
12त्यावेळी बाबेलचा राजा बलदानचा पुत्र मरोदख-बलादाना#20:12 इतर हस्तलिखितांमध्ये बरोदाख-बलादान ने हिज्कीयाहला पत्रे आणि भेटवस्तू पाठविल्या, कारण त्याने त्याच्या आजाराबद्दल ऐकले होते. 13हिज्कीयाहने राजदूतांचे स्वागत केले आणि त्याच्या भांडारांमध्ये काय आहे ते सर्व दाखविले—चांदी, सोने, मसाले, आणि उत्तम जैतुनाचे तेल—त्याचे संपूर्ण शस्त्रागार आणि त्याच्या खजिन्यामध्ये असलेली सर्व संपत्ती. त्याच्या राजवाड्यात किंवा त्याच्या संपूर्ण राज्यात हिज्कीयाहने त्यांना दाखविले नाही असे काहीही नव्हते.
14तेव्हा यशायाह संदेष्टा राजा हिज्कीयाहकडे गेला आणि त्याने विचारले, “ती माणसे काय म्हणाली आणि ती कुठून आली होती?”
हिज्कीयाहने उत्तर दिले, “दूरवरील देशातून, ते बाबेलहून आले आहेत.”
15संदेष्ट्याने विचारले, “त्यांनी तुझ्या राजवाड्यात काय पाहिले?”
हिज्कीयाह म्हणाला, “त्यांनी माझ्या राजवाड्यातील सर्वकाही पाहिले. माझ्या खजिन्यांमध्ये असे काहीही राहिले नाही, जे मी त्यांना दाखविले नाही.”
16तेव्हा यशायाह हिज्कीयाहला म्हणाला, “याहवेहचे वचन ऐका: 17अशी वेळ निश्चितच येईल जेव्हा तुमच्या राजवाड्यामधील सर्वकाही आणि तुमच्या पूर्वजांनी आजपर्यंत जे काही साठवून ठेवले आहे ते सर्व बाबेलला नेले जाईल. काहीही सोडले जाणार नाही, असे याहवेह म्हणतात. 18आणि तुमच्या वंशजांपैकी काही, तुमच्या मांसाचे आणि तुमच्या रक्ताचे जे तुमच्यापासून जन्माला येतील, ते नेले जातील आणि ते बाबेलच्या राजाच्या राजवाड्यात खोजे करण्यात येतील.”
19हिज्कीयाहने यशायाहास उत्तर दिले, “तुम्ही बोललेले याहवेह यांचे वचन चांगले आहे,” कारण त्याने असा विचार केला, “माझ्या आयुष्यभरात शांती आणि सुरक्षितता नसणार काय?”
20हिज्कीयाहच्या कारकिर्दीतील इतर सर्व घटना, त्याच्या सर्व पराक्रमाबद्दल आणि त्याने तळी व पाट खणून शहरात पाणी कसे आणले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात नमूद केल्या नाहीत काय? 21हिज्कीयाह आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र मनश्शेह राजा झाला.
सध्या निवडलेले:
2 राजे 20: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapi.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fmr.png&w=128&q=75)
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.