2 राजे 2
2
एलीयाहचे स्वर्गारोहण
1जेव्हा याहवेहने एलीयाहला वावटळीद्वारे स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला. तेव्हा एलीयाह आणि अलीशा गिलगालहून निघाले होते. 2एलीयाहने अलीशाला म्हटले, “इथे थांब; याहवेहने मला बेथेलला पाठवले आहे.”
परंतु अलीशा म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ आणि तुमच्या जीविताची शपथ मी आपणास सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे खाली बेथेलला गेले.
3तिथे बेथेलातील संदेष्ट्यांचा एक समूह अलीशाकडे आला आणि विचारले, “आज याहवेह तुझ्या स्वामीला तुझ्यापासून घेऊन जाणार आहेत हे तुला ठाऊक आहे काय?”
अलीशाने उत्तर दिले, “हो मला माहीत आहे, म्हणून शांत राहा.”
4नंतर एलीयाह त्याला म्हणाला, “अलीशा तू येथेच राहा; कारण याहवेह मला यरीहोस पाठवित आहे.”
आणि त्याने म्हटले, “मी याहवेहची आणि आपल्या जीविताची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला सोडणार नाही.” तेव्हा ते दोघेही यरीहोला गेले.
5तिथे यरीहोच्या संदेष्ट्यांचा एक समूह अलीशास म्हणाला, “आज तुझ्या स्वामीला याहवेह तुझ्यापासून घेऊन जाणार आहेत हे तुला ठाऊक आहे काय?”
त्याने उत्तर दिले, “हो मला माहीत आहे, म्हणून शांत राहा.”
6मग एलीयाह अलीशास म्हणाला, “तू येथेच राहा; कारण याहवेह मला यार्देनला पाठवित आहेत.”
आणि त्याने उत्तर दिले, “मी याहवेहची आणि आपल्या जीविताची शपथ घेऊन सांगतो कीस मी तुम्हाला सोडणार नाही.” मग ते दोघेही पुढे चालले.
7संदेष्ट्यांच्या सभेतील पन्नास लोकांचा समूह त्यांच्याजवळ आला आणि दूर थांबला व जिथे एलीयाह आणि अलीशा यार्देनजवळ थांबले होते, त्या दिशेने तोंड करून उभा राहिला. 8तिथे एलीयाहने आपल्या झग्याची घडी केली आणि ती पाण्यावर मारली. तेव्हा पाणी उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि ते दोघे कोरड्या भूमीवरून चालत पैलतीराला गेले.
9ते पार गेल्यावर एलीयाह अलीशाला म्हणाला, “मला तुझ्यापासून घेतले जाण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करावे ते मला सांग?”
“अलीशाने उत्तर दिले, तुमच्यामध्ये असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा मला मिळावा.”
10एलीयाह म्हणाला, “तू एक कठीण गोष्ट मागितली आहेस; तरी देखील जेव्हा तू मला तुझ्यापासून दूर जात असताना पाहिलेस, तर ते तुझे होईल; अन्यथा ते होणार नाही.”
11ते एकत्र असे बोलत चालत असताना, अचानक अग्नीचे रथ आणि अग्नीचे घोडे प्रगट झाले आणि त्या दोघांना एकमेकांपासून वेगळे केले आणि वावटळीद्वारे एलीयाह स्वर्गात वर घेतला गेला. 12अलीशाने हे पाहिले आणि आरोळी मारली, “हे माझ्या पित्या! माझ्या पित्या! अहो इस्राएलांच्या रथांनो आणि इस्राएलांच्या सारथ्यांनो!” आणि अलीशा त्यांना पुन्हा पाहू शकला नाही. तेव्हा अलीशाने आपला झगा फाडला आणि त्याचे दोन तुकडे केले.
13तेव्हा अलीशाने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा उचलला आणि तो यार्देन काठी परत गेला आणि उभा राहिला. 14त्याने एलीयाहच्या अंगावरून पडलेला झगा घेतला आणि पाण्यावर मारला. “एलीयाहचा याहवेह परमेश्वर कुठे आहेत?” जेव्हा त्याने झग्याने पाण्यावर मारले तेव्हा पाणी हे उजवीकडे आणि डावीकडे दुभंगले आणि अलीशा पैलतीरावर गेला.
15यरीहोतील संदेष्ट्यांचा एक समूह, जो हे पाहत होता म्हणाला, “एलीयाहचा आत्मा अलीशावर उतरला आहे.” ते त्याला भेटण्यास गेले आणि भूमीपर्यंत लवून त्याला नमन केले. 16ते त्याला म्हणाले, “पाहा, तुमच्या सेवकांकडे पन्नास बळकट पुरुष आहेत. त्यांना जाऊ द्या आणि तुमच्या स्वामीचा शोध घेऊ द्या. याहवेहच्या आत्म्याने त्यांना एखाद्या पर्वतशिखरावर, नाहीतर एखाद्या दरीत नेऊन टाकले असेल.”
अलीशा म्हणाला, “नको, त्यांना पाठवू नका.”
17परंतु त्यांनी त्याला लाज वाटेपर्यंत आग्रह केला. तेव्हा तो म्हणाला, “त्यांना पाठवा.” आणि त्यांनी पन्नास पुरुषांना पाठविले, ज्यांनी त्याचा तीन दिवस शोध घेतला, परंतु ते त्याला शोधू शकले नाही. 18जेव्हा ते अलीशाकडे परत आले, तेव्हा अलीशा यरीहोतच होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्ही जाऊ नका असे मी तुम्हाला सांगितले नव्हते काय?”
अलीशा पाणी शुद्ध करतो
19शहरातील लोक अलीशाला म्हणाले, “आमच्या प्रभू, जसे तुम्ही पाहत आहात, नगर उत्तम वसलेले आहे, परंतु पाणी वाईट आहे आणि भूमी नापीक आहे.”
20तो म्हणाला, “मला एका नव्या वाटीत मीठ भरून आणून द्या.” त्याप्रमाणे त्यांनी ते त्याच्याकडे आणून दिले.
21मग तो पाण्याच्या झर्याजवळ गेला आणि ते मीठ पाण्यात टाकून म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘मी या पाण्याला बरे केले आहे. येथून पुढे या पाण्यामुळे मृत्यू येणार नाही किंवा भूमी नापीक राहणार नाही.’ ” 22आणि अलीशाने म्हटल्याप्रमाणे ते पाणी शुद्ध झाले आणि आजवरही तसेच आहे.
अलीशाची टिंगल
23नंतर अलीशा वर बेथेलला गेला. तो रस्त्याने जात असताना, त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्याकडे पाहून नगरातील काही मुले त्याची टिंगल करून त्याला “अरे टकल्या, चालता हो! अरे टकल्या, चालता हो!” असे म्हणून चिडवू लागली. 24तेव्हा तो वळला आणि त्याने याहवेहच्या नावाने त्या मुलांना शाप दिला. त्याबरोबर जंगलातून दोन अस्वली बाहेर आल्या आणि त्यांनी त्या मुलांपैकी बेचाळीस मुलांना फाडून टाकले. 25तो तिथून निघून कर्मेल डोंगराकडे गेला आणि तिथून शोमरोनास माघारी गेला.
सध्या निवडलेले:
2 राजे 2: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.