YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 21

21
1त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला. 2यहोरामचे भाऊ अजर्‍याह, यहीएल, जखर्‍याह, अजर्‍याह, मिखाएल आणि शफात्याह हे सर्व इस्राएलचा राजा यहोशाफाटचे पुत्र होते. 3त्यांच्या वडिलांनी त्यांना सोन्या-चांदीच्या अनेक भेटवस्तू आणि सोने, मौल्यवान वस्तू, तसेच यहूदीयामधील तटबंदीची शहरे दिली होती, परंतु त्याने यहोरामला राज्य दिले कारण तो त्याचा प्रथमपुत्र होता.
यहोराम यहूदीयाचा राजा
4जेव्हा यहोरामने त्याच्या वडिलांच्या राज्यावर स्वतःला ठामपणे प्रस्थापित केले, तेव्हा त्याने इस्राएलच्या काही अधिकाऱ्यांसह त्याच्या सर्व भावांना तलवारीने मारले. 5जेव्हा यहोराम राजा झाला, तेव्हा त्याचे वय बत्तीस वर्ष होते, त्याने यरुशलेमवर आठ वर्षे राज्य केले. 6अहाबाच्या घराण्याने जसे केले होते त्याचप्रमाणे त्याने इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले, कारण त्याने अहाबाच्या मुलीबरोबर विवाह केला होता. याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. 7तथापि आपला सेवक दावीदासाठी याहवेहने दावीदाच्या घराण्याचा नाश केला नाही. कारण त्यांनी त्याच्या वंशजाचा दिवा कायम ठेवण्याचे अभिवचन दिले होते.
8यहोरामाच्या काळात, एदोमाने यहूदीयाविरुद्ध बंड पुकारले आणि त्यांनी स्वतःसाठी एक राजा निवडला. 9मग यहोराम आपले अधिकारी व सर्व रथ घेऊन साईर येथे गेला. रात्रीच्या वेळी त्याने उठून ज्या एदोमी लोकांनी त्याला आणि त्याच्या रथाच्या नायकांना घेरले होते, परंतु रात्रीच्या वेळी उठून त्याने वेढा मोडून टाकला. 10आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे.
त्याचवेळेस लिब्नाहने बंड केले, कारण यहोरामने त्याच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहचा त्याग केला होता. 11त्याने यहूदीयाच्या टेकड्यांवर उच्च स्थानेही बांधली आणि यरुशलेमच्या लोकांना व्यभिचार करावयाला लावले होते आणि यहूदीयाला चुकीच्या मार्गाने नेले होते.
12यहोरामला एलीयाह संदेष्ट्याकडून एक पत्र मिळाले, त्यामध्ये लिहिले होते:
“तुमचे पिता दावीदाचे परमेश्वर याहवेह असे म्हणतात: तुम्ही तुमचे पिता यहोशाफाट किंवा यहूदीयाचा राजा आसा यांच्या मार्गांचे अनुसरण केले नाही. 13परंतु तुम्ही इस्राएलच्या राजांच्या मार्गांचे अनुसरण केले आणि अहाबाच्या घराण्याने जसे केले त्याप्रमाणे तुम्ही यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांना व्यभिचार करावयाला लावले आहे. तुम्ही स्वतःच्या भावांची, स्वतःच्या कुटुंबातील लोकांची, तुमच्यापेक्षा चांगले असलेल्या पुरुषांचीही हत्या केली आहे. 14तर आता याहवेह तुमच्या लोकांवर, तुमच्या मुलांवर, तुमच्या स्त्रियांवर आणि तुमच्या सर्व गोष्टींवर जोरदार प्रहार करणार आहेत. 15तुमची आतडी बाहेर पडेपर्यंत तुम्ही आतड्यांसंबंधीच्या दीर्घकाळच्या आजाराने खूप त्रस्त व्हाल.”
16याहवेहनी यहोरामच्या विरुद्ध पलिष्टी लोकांचे आणि कूशी लोकांच्या जवळ राहणार्‍या अरब लोकांचे शत्रुत्व जागृत केले. 17त्यांनी यहूदीयावर हल्ला केला, त्यावर आक्रमण केले आणि राजाच्या राजवाड्यात सापडलेली सर्व मालमत्ता, त्याची मुले आणि स्त्रियांना घेऊन गेले. सर्वात धाकटा यहोआहाज याच्याशिवाय एकही पुत्र त्याच्याकडे राहिला नव्हता.
18हे सर्व झाल्यानंतर याहवेहनी यहोरामला आतड्यांच्या असाध्य आजाराने त्रस्त केले. 19याकाळाच्या दरम्यान, दुसऱ्या वर्षाच्या शेवटी या रोगामुळे त्याची आतडी बाहेर आली आणि तो अत्यंत वेदनांनी मरण पावला. त्याच्या लोकांनी त्याच्या सन्मानार्थ अंत्यसंस्कार केले नाहीत, जसे त्याच्या पूर्वजांसाठी केले होते.
20यहोराम राजा झाला तेव्हा तो बत्तीस वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. तो मरण पावला याचे कोणालाही दुःख वाटले नाही आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरला गेला, परंतु राजांच्या कबरेत पुरले नाही.

सध्या निवडलेले:

2 इतिहास 21: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन