YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 इतिहास 20

20
यहोशाफाट मोआब आणि अम्मोन यांचा पराभव करतो
1यानंतर, मोआबी आणि अम्मोनी सैन्य काही मऊनी लोकांना बरोबर घेऊन यहोशाफाटविरुद्ध युद्ध करण्यासाठी आले.
2काही लोक आले आणि यहोशाफाटला म्हणाले, “मृत समुद्राच्या पलीकडे असलेल्या अराम#20:2 एदोम येथून एक प्रचंड सैन्य तुमच्याविरुद्ध येत आहे. ते आधीच हससोन-तामार येथे आले आहे” (ते म्हणजे एन-गेदी). 3धोक्याची सूचना मिळाल्याने यहोशाफाटने याहवेहकडे याची चौकशी करण्याचा निश्चय केला आणि त्याने सर्व यहूदीयामध्ये उपवासाची घोषणा केली. 4त्याप्रमाणे यहूदीयाचे लोक याहवेहची मदत घेण्यास एकत्र आले; निश्चितच, यहूदीयाच्या प्रत्येक शहरातील लोक त्यांच्या साहाय्यासाठी आले.
5नंतर यहोशाफाट याहवेहच्या मंदिराजवळ नवीन अंगणासमोर यहूदीया आणि यरुशलेम यांच्या सभेमध्ये उभा राहिला 6आणि म्हणाला:
“याहवेह, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा, तुम्ही स्वर्गातील परमेश्वर नाही का? तुम्ही राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर राज्य करता. सत्ता आणि सामर्थ्य तुमच्या हातात आहे, आणि कोणीही तुमचा सामना करू शकत नाही. 7आमच्या परमेश्वरा, या प्रदेशातील रहिवाशांना तुम्ही तुमच्या इस्राएली लोकांपुढून घालवून दिले आणि तो प्रदेश तुमचे मित्र अब्राहामच्या वंशजांना कायमचा दिला नाही का? 8त्यांनी या प्रदेशात वास्तव्य केले आहे आणि त्यामध्ये तुमच्या नामासाठी पवित्रस्थान बांधले आहे, ते म्हणाले, 9‘जर आमच्यावर संकटे आली, मग ती न्यायाची तलवार असो किंवा मरी असो किंवा दुष्काळ, तर आम्ही तुमच्या उपस्थितीत तुमचे नाव धारण करणाऱ्या या मंदिरापुढे उभे राहू आणि आमच्या संकटात तुमचा धावा करू आणि तुम्ही आमचे ऐकाल आणि आम्हाला वाचवाल.’
10“परंतु आता येथे अम्मोन, मोआब आणि सेईर पर्वताकडील लोक आहेत, जेव्हा ते इजिप्तकडून आले तेव्हा तुम्ही इस्राएली लोकांना त्यांच्या प्रदेशावर आक्रमण करू देत नव्हता; म्हणून ते त्यांच्यापासून दूर गेले आणि त्यांचा नाश केला नाही. 11आता पाहा, तुम्ही आम्हाला वारसा म्हणून दिलेल्या वतनदत्त प्रदेशातून बाहेर काढायला येऊन ते आमची कशी परतफेड करत आहेत. 12आमच्या परमेश्वरा, तुम्ही त्यांचा न्याय करणार नाही का? कारण आमच्यावर हल्ला करणाऱ्या या विशाल सैन्याचा सामना करण्यासाठी आमच्याकडे शक्ती नाही. काय करावे हे आम्हाला कळत नाही, परंतु आमची दृष्टी तुमच्याकडे लागली आहे.”
13यहूदीयाचे सर्व पुरुष, त्यांच्या पत्नी, मुले आणि शिशू यांच्या समवेत याहवेहसमोर उभे राहिले.
14तेव्हा जखर्‍याहचा मुलगा यहजिएल, जो बेनाइयाहचा पुत्र, जो ईयेलचा पुत्र, जो मत्तन्याहचा पुत्र, लेवी आणि आसाफ याचा वंशज त्याच्यावर याहवेहचा आत्मा आला व तो सभेमध्ये उभा राहिला.
15तो म्हणाला, “ऐका, राजा यहोशाफाट आणि जे यहूदीया आणि यरुशलेममध्ये राहतात ते सर्वजण! याहवेह तुम्हाला असे म्हणतात: ‘या विशाल सैन्याला घाबरू नका किंवा निराश होऊ नका. कारण युद्ध तुमचे नव्हे, तर परमेश्वराचे आहे. 16उद्या त्यांच्या विरोधात हल्ला करा. जीजच्या खिंडीने ते वर चढत असतील आणि यरुएलच्या वाळवंटातील खिंडीच्या शेवटी तुम्हाला ते सापडतील. 17तुम्हाला हे युद्ध करावे लागणार नाही. तुम्ही तुमचे स्थान ग्रहण करा; खंबीरपणे उभे राहा. यहूदीया आणि यरुशलेम पहा, याहवेह तुम्हाला सुटकारा देतील. घाबरू नका; निराश होऊ नका. उद्या त्यांचा सामना करण्यासाठी बाहेर पडा, आणि याहवेह तुमच्याबरोबर असतील.’ ”
18यहोशाफाट त्याचे मुख जमिनीकडे करून नतमस्तक झाला आणि यहूदीया आणि यरुशलेमच्या सर्व लोकांनी याहवेहपुढे खाली पडून उपासना केली. 19नंतर कोहाथी आणि कोरही लोकांमधील काही लेवी उभे राहिले आणि त्यांनी उच्चस्वरात याहवेहची, इस्राएलच्या परमेश्वराची स्तुती केली.
20पहाटे ते तकोवाच्या वाळवंटाकडे निघाले. ते बाहेर पडले असताना यहोशाफाट उभा राहिला आणि म्हणाला, “यहूदीया आणि यरुशलेमच्या लोकांनो, माझे ऐका! याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यावर विश्वास ठेवा आणि तुमचे समर्थन केले जाईल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा आणि तुम्ही यशस्वी व्हाल.” 21लोकांबरोबर सल्लामसलत केल्यावर, यहोशाफाटने पुरुषांची नियुक्ती केली, याहवेहची स्तुती गाण्यासाठी आणि त्यांच्या पवित्रतेच्या वैभवाबद्दल त्यांची स्तुती करण्यासाठी जेव्हा ते सैन्याचे प्रमुख म्हणून निघाले तेव्हा ते म्हणाले:
“याहवेहचे आभार माना,
कारण त्यांचे प्रेम अनंतकाळ टिकते.”
22जेव्हा त्यांनी गाणे गाण्यास आणि स्तुती करण्यास सुरुवात केली लागले, तेव्हा याहवेहनी यहूदीयावर आक्रमण करणारे अम्मोनी, मोआब आणि सेईर पर्वताच्या लोकांवर दबा धरून हल्ला केला आणि शत्रूचा पराभव झाला. 23अम्मोनी आणि मोआबी लोक सेईर पर्वतावरील लोकांवर त्यांचा नाश करण्यासाठी आणि त्यांचा समूळ उच्छेद करण्यासाठी उठले. सेईर येथील माणसांची कत्तल करून झाल्यावर त्यांनी एकमेकांचा नाश करण्यास सुरुवात केली.
24जेव्हा यहूदीयाचे लोक जिथून वाळवंटातील दृश्य दिसत होते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी प्रचंड सैन्याकडे पाहिले, तेव्हा त्यांना जमिनीवर फक्त मृतदेह पडलेले दिसले; त्यातून कोणीही सुटला नव्हता. 25तेव्हा यहोशाफाट आणि त्याची माणसे त्यांची लूट घ्यायला निघाले, त्यांना त्याच्यामध्ये बरीच उपकरणे, वस्त्रे आणि मौल्यवान वस्तू सापडल्या—त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त तिथे होते. इतकी लूट होती की, ती गोळा करावयाला तीन दिवस लागले. 26चौथ्या दिवशी ते बेराखाह खोऱ्यात एकत्र जमले, जिथे त्यांनी याहवेहला धन्यवाद दिला. म्हणून आजही त्या ठिकाणाला बेराखाहचे#20:26 बेरेख्याह अर्थात् स्तुती खोरे असे म्हणतात.
27नंतर यहोशाफाटच्या नेतृत्वाखाली, यहूदीया आणि यरुशलेम येथील सर्व पुरुष आनंदाने यरुशलेमकडे परतले, कारण याहवेहनी त्यांना त्यांच्या शत्रूवर आनंद करण्याचे कारण दिले होते. 28त्यांनी यरुशलेममध्ये प्रवेश केला आणि वीणा आणि कर्णे बरोबर घेऊन ते याहवेहच्या मंदिरात गेले.
29इस्राएलच्या शत्रूविरुद्ध याहवेहनी कसे युद्ध केले, हे ऐकून आजूबाजूच्या सर्व राज्यात परमेश्वराचे भय निर्माण झाले. 30आणि यहोशाफाटच्या राज्यात शांतता होती, कारण त्याच्या परमेश्वराने त्याला सर्व बाजूंनी विसावा दिला होता.
यहोशाफाटच्या कारकिर्दीचा शेवट
31तेव्हा यहोशाफाटने यहूदीयावर राज्य केले. यहूदीयाचा राजा झाला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेमात पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजुबाह होते, जी शिल्हीची कन्या होती. 32आपला पिता आसाचे सर्व मार्गात अनुसरण केले आणि त्यापासून तो वळला नाही; याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. 33तरी, डोंगरावरील मंदिरे नष्ट केली नव्हती आणि लोकांनी अजूनही त्यांची अंतःकरणे त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराकडे लावली नव्हती.
34यहोशाफाटच्या राज्याच्या इतर घटना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतच्या घटना हनानीचा पुत्र येहू याच्या इतिहासात लिहिलेल्या आहेत, ज्याची नोंद इस्राएलच्या राजांच्या पुस्तकात आहेत.
35नंतर, यहूदीयाचा राजा यहोशाफाटने इस्राएलचा राजा अहज्याह याच्याशी मैत्री केली, ज्याचे मार्ग दुष्ट होते. 36व्यापारी जहाजांच्या#20:36 किंवा तार्शीशला जाणाऱ्या ताफ्यांची बांधणी करण्यासाठी तो त्याच्याशी सहमत झाला. नंतर ती एजिओन-गेबेर येथे बांधली गेली, 37मारेशाहवासी दोदावाहूचा पुत्र एलिएजर याने यहोशाफाटविरुद्ध भविष्यवाणी केली, “तुम्ही अहज्याहशी युती केल्यामुळे, तुम्ही जे काय केले आहे त्याचा याहवेह नाश करतील.” ही जहाजे उद्ध्वस्त झाली आणि व्यापाराच्या प्रवासाला तार्शीशला घेऊन जाण्यासाठी ती सक्षम नव्हती.

सध्या निवडलेले:

2 इतिहास 20: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन