1 शमुवेल 27
27
दावीद पलिष्ट्यांमध्ये जातो
1परंतु दावीदाने आपल्या मनात म्हटले, “कधी तरी मी शौलाच्या हातून मरणारच आहे. पलिष्ट्यांच्या देशात पळून जाणे उत्तम आहे. मग शौल इस्राएलमध्ये माझा शोध करण्याचे सोडून देईल आणि मी त्याच्या हातातून निसटून जाईन.”
2तेव्हा दावीद आणि त्याच्याबरोबरची सहाशे माणसे गथ नगराचा राजा माओकचा पुत्र आखीशकडे गेले. 3दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर गथ येथे राहू लागले. प्रत्येकाबरोबर त्यांचे कुटुंब होते आणि दावीदाच्या दोन पत्नी; येज्रीली अहीनोअम आणि कर्मेली नाबालाची विधवा अबीगईल होत्या. 4जेव्हा शौलाला कळले की, दावीद गथकडे पळून गेला आहे, त्यानंतर त्याने त्याचा शोध केला नाही.
5नंतर दावीद आखीश राजास म्हणाला, “जर आपल्या दृष्टीत मी कृपा पावत असलो तर, मला देशातील एका गावात जागा द्या म्हणजे मी तिथे राहीन. आपल्या सेवकाने या राजकीय शहरात तुमच्याबरोबर का राहावे?”
6म्हणून आखीशने त्या दिवशी त्याला सिकलाग हे शहर दिले. आणि तेव्हापासून ते यहूदीयाच्या राजांचे आहे. 7दावीद पलिष्ट्यांच्या हद्दीमध्ये एक वर्ष चार महिने राहिला.
8नंतर दावीद आणि त्याच्या माणसांनी गशूरी, गिरजी आणि अमालेकी या लोकांवर छापा टाकला. (पुरातन काळापासून हे लोक शूर शहरापासून इजिप्तपर्यंत वाढत गेलेल्या प्रदेशात राहत होते.) 9जेव्हा दावीद कोणत्याही प्रांतावर हल्ला करीत असे तो एकही पुरुष किंवा स्त्री जिवंत सोडत नसे, परंतु तेथील मेंढरे, गुरे, गाढवे व उंट आणि वस्त्रे यांची लूट घेत असे. नंतर तो आखीशकडे परत आला.
10जेव्हा आखीशने विचारले, “आज तुम्ही कोणत्या प्रांतावर स्वारी केली?” दावीद त्याला उत्तर देत असे, “यहूदीयाच्या नेगेव विरुद्ध” किंवा “यरहमेल्यांच्या नेगेव विरुद्ध” किंवा “केनीयांच्या नेगेव विरुद्ध.” 11त्याने गथ येथे आणण्यासाठी एकही पुरुष किंवा स्त्री जिवंत ठेवले नव्हते, कारण त्याला वाटले, “ते आमच्याबद्दल सांगतील आणि म्हणतील, ‘दावीदाने असे केले आहे.’ ” आणि जोपर्यंत तो पलिष्ट्यांच्या सीमेत राहिला तोपर्यंत तो असेच करीत असे. 12आखीशने दावीदावर भरवसा ठेवला आणि स्वतःशीच म्हणाला, “तो आपल्या इस्राएली लोकांच्या दृष्टीत इतका घृणास्पद झाला आहे की, तो आयुष्यभर माझा सेवक म्हणून राहील.”
सध्या निवडलेले:
1 शमुवेल 27: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.