1 शमुवेल 28
28
1त्या दिवसांमध्ये इस्राएलविरुद्ध युद्ध करावे म्हणून पलिष्ट्यांनी त्यांचे सैन्य एकत्र केले. आखीश दावीदाला म्हणाला, “तू हे खचित समज की, तू आणि तुझी माणसे माझ्याबरोबर सैन्यात येतील.”
2दावीद म्हणाला, “तर आपला दास काय करू शकतो, हे आपण पाहाल.”
आखीशने उत्तर दिले, “फार चांगले, मी तुला आयुष्यभर माझा अंगरक्षक करेन.”
एनदोर येथे शौल आणि चेटकीण#28:3 अर्थात् अशी व्यक्ती जी मृत व्यक्तीच्या आत्म्याला बोलाविते
3शमुवेल तर मरण पावले होते आणि सर्व इस्राएली लोकांनी त्यांच्यासाठी शोक केला होता आणि त्यांना त्यांच्याच रामाह नगरात पुरले होते. शौलाने मृतात्म्यांशी संपर्क साधणारे आणि तंत्रमंत्र करणारे यांना देशातून घालवून दिले होते.
4पलिष्टी एकत्र आले आणि त्यांनी शूनेम येथे छावणी दिली, तर शौलाने सर्व इस्राएली सैन्याला एकत्र करून गिलबोआ येथे छावणी दिली. 5जेव्हा शौलाने पलिष्ट्यांचे सैन्य पाहिले, तेव्हा तो घाबरला; त्याचे हृदय भीतीने भरून गेले. 6शौलाने याहवेहला विचारले, परंतु याहवेहने त्याला स्वप्ने किंवा उरीम किंवा संदेष्टे या कोणत्याही द्वारे उत्तर दिले नाही. 7तेव्हा शौल त्याच्या सेवकांना म्हणाला, “माझ्यासाठी एक स्वामिनी शोधा की, जी मृतात्म्यांशी संपर्क करते, म्हणजे मी जाईन आणि तिला विचारेन.”
ते म्हणाले, “एक स्त्री एनदोर येथे आहे.”
8तेव्हा शौलाने आपला वेश बदलून वेगळे कपडे घातले आणि दोन माणसे घेऊन रात्रीच्या वेळेस त्या स्त्रीकडे गेला. आणि म्हणाला, “माझ्यासाठी एक आत्म्याला विचार आणि मी ज्याचे नाव सांगतो त्याला माझ्यासाठी वर आण.”
9परंतु ती स्त्री त्याला म्हणाली, “तुला नक्कीच माहीत आहे की, शौलाने काय केले आहे. चेटकीण आणि तंत्रमंत्र करणाऱ्यांना त्याने या देशातून घालवून टाकले आहे. मी मरावे म्हणून माझ्या जिवासाठी तू सापळा का टाकतोस?”
10शौलाने तिला याहवेहची शपथ घातली, “जिवंत याहवेहची शपथ, यासाठी तुला शिक्षा होणार नाही.”
11तेव्हा त्या स्त्रीने विचारले, “मी तुझ्यासाठी कोणाला वर आणू?”
तो म्हणाला, “शमुवेलला वर आण.”
12जेव्हा त्या स्त्रीने शमुवेलला पाहिले, तेव्हा ती मोठ्याने ओरडली आणि शौलाला म्हणाली, “तुम्ही मला का फसविले आहे? तुम्ही शौल आहात!”
13शौल राजाने तिला म्हटले, “भिऊ नकोस, तुला काय दिसते?”
ती स्त्री म्हणाली, “जमिनीतून एक भुतासारखी आकृती#28:13 किंवा आत्मे किंवा दैवते वर येताना दिसत आहे.”
14“तो कसा दिसतो?” त्याने विचारले.
“झगा घातलेला एक वृद्ध पुरुष वर येत आहे,” ती म्हणाली.
तेव्हा शौलाने ओळखले की तो शमुवेल होता आणि त्याने स्वतः त्याचे तोंड खाली जमिनीकडे करून दंडवत घातले.
15शमुवेल शौलास म्हणाला, “मला वर आणून तू मला का त्रास दिला आहेस?”
शौलाने उत्तर दिले, “मी फार मोठ्या संकटात आहे, पलिष्टी माझ्याविरुद्ध लढाई करत आहेत आणि परमेश्वराने मला सोडून दिले आहे. परमेश्वर मला संदेष्ट्यांच्या अथवा स्वप्नां द्वारे उत्तर देत नाही. यामुळेच मी काय करावे हे तुम्ही मला सांगावे म्हणून मी तुम्हाला बोलाविले आहे.”
16शमुवेल म्हणाला, “याहवेहने तुला सोडले आहे आणि ते तुझा शत्रू झाले आहे, तर तू माझा सल्ला का घ्यावा? 17याहवेहने माझ्याद्वारे जे भविष्य सांगितले होते, ते त्यांनी केले आहे. याहवेहने तुझ्या हातून राज्य फाडून टाकले आहे आणि ते तुझ्या शेजार्यांपैकी एकाला म्हणजेच दावीदाला दिले आहे. 18कारण तू याहवेहची आज्ञा पाळली नाही किंवा अमालेकी लोकांविरुद्ध याहवेहचा क्रोध उगारला नाही, म्हणून याहवेहने आज हे तुझ्यासाठी केले आहे. 19याहवेह इस्राएली लोकांना आणि तुला पलिष्ट्यांच्या हाती देणार आहे आणि उद्या तू आणि तुझी मुले माझ्याबरोबर असतील. आणि याहवेह इस्राएलच्या सैन्याला पलिष्ट्यांच्या देईल.”
20शौल लगेच तसाच जमिनीवर पडला, शमुवेलने सांगितलेल्या शब्दांमुळे तो फार भयभीत झाला. त्याच्यात काही शक्ती राहिली नाही, कारण त्याने दिवसभर आणि रात्रभर काहीही खाल्ले नव्हते.
21जेव्हा ती स्त्री शौलाकडे आली आणि तिने पाहिले की तो फारच हादरून गेला होता, ती म्हणाली, “पाहा, तुझ्या दासीने तुमचा शब्द मानला आणि माझा जीव मुठीत घेऊन तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले. 22तर आता माझा शब्द माना, मी तुम्हाला थोडे अन्न वाढते ते खा म्हणजे आपल्या वाटेने जाण्यास तुम्हाला शक्ती असावी.”
23तो ते नाकारत म्हणाला, “मी खाणार नाही.”
परंतु त्याच्या माणसांनीही त्या स्त्रीबरोबर त्याला आग्रह केला, तेव्हा त्याने त्यांचे म्हणणे मानले. तो जमिनीवरून उठून पलंगावर बसला.
24त्या स्त्रीच्या घरी एक लठ्ठ वासरू होते, ते तिने लवकर कापले. तिने थोडेसे पीठ घेतले, ते मळले आणि खमीर न घालता भाकरी भाजल्या. 25नंतर तिने शौल आणि त्याची माणसे यांच्यासमोर ते वाढले आणि त्यांनी ते खाल्ले. नंतर त्याच रात्री ते तिथून निघून गेले.
सध्या निवडलेले:
1 शमुवेल 28: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.