1 शमुवेल 26
26
दावीद शौलाला पुन्हा वाचवितो
1जिफी लोक गिबियाह येथे शौलाकडे गेले आणि म्हणाले, “जेशीमोनच्या समोर असलेल्या हकीलाहच्या डोंगरावर दावीद लपून राहत नाही काय?”
2तेव्हा शौल त्याच्या निवडलेल्या तीन हजार इस्राएली सैनिकांना बरोबर घेऊन दावीदाचा शोध घेण्यासाठी जीफच्या वाळवंटाकडे निघाला. 3शौलाने जेशीमोन समोर हकीलाहच्या डोंगरावर जाण्याच्या रस्त्याच्या बाजूला छावणी घातली आणि दावीद रानातच राहिला. परंतु शौल आपल्यामागे आला आहे हे समजून, 4दावीदाने आपले दोन सैनिक पाठवून शौल खरोखरच तिथे आला काय याची माहिती काढून घेतली.
5नंतर दावीद बाहेर पडला आणि ज्या ठिकाणी शौलाने छावणी टाकली होती तिथे गेला. त्याने पाहिले शौल, नेराचा पुत्र अबनेर, सैन्याचा सेनापती झोपले होते. शौल छावणीच्या आतील बाजूस झोपला होता, त्याच्याभोवती सैन्याचा पहारा होता.
6तेव्हा दावीदाने हिथी अहीमेलेख आणि जेरुइयाहचा पुत्र अबीशाई, योआबाचा भाऊ यांना विचारले, “छावणीच्या आत शौलाकडे माझ्याबरोबर कोण जाईल?”
अबीशाई म्हणाला, “मी तुझ्याबरोबर जाईन.”
7तेव्हा दावीद आणि अबीशाई रात्रीच्या वेळेस सैन्याकडे गेले आणि शौल तिथे छावणीच्या आतमध्ये झोपलेला होता, त्याच्या उशाशी त्याचा भाला जमिनीमध्ये रोवलेला होता. अबनेर आणि सैनिक त्याच्याभोवती झोपलेले होते.
8अबीशाई दावीदाला म्हणाला, “परमेश्वराने तुझ्या शत्रूला आज तुझ्या हाती दिले आहे. तर आता मला भाल्याने त्याच्यावर एकच वार करून त्याला जमिनीत खुपसून टाकू द्या; दुसर्यांदा वार करावा लागणार नाही.”
9परंतु दावीद अबीशाईला म्हणाला, “त्याचा वध करू नको! याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकून कोण निर्दोष राहू शकेल?” 10दावीद म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह स्वतः त्याला मारतील, किंवा त्याची वेळ येईल आणि त्याचा मृत्यू होईल, किंवा तो युद्धात जाईल आणि त्याचा नाश होईल. 11परंतु मी याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकावा असे याहवेह माझ्या हातून घडवून न आणो. तर आता त्याच्या उशाशी असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घे, मग आपण जाऊ या.”
12तेव्हा दावीदाने शौलाच्या उशाशी असलेला भाला आणि पाण्याचा चंबू घेतला आणि ते निघून गेले. कोणीही ते पाहिले नाही किंवा कोणाला ते कळले नाही, किंवा कोणी उठले नाही. ते सर्व झोपी गेले होते, कारण याहवेहकडून त्यांना गाढ निद्रा लागली होती.
13नंतर दावीद पलीकडे गेला आणि डोंगराच्या उंच टोकावर अंतरावर उभा राहिला; त्यांच्यामध्ये बरेच अंतर होते. 14दावीदाने सैन्याला आणि नेरचा पुत्र अबनेर यांना मोठ्याने विचारले, “अबनेर, तू मला उत्तर देणार नाहीस काय?”
अबनेरने उत्तर दिले, “तू कोण आहेस, राजाला कोण हाक मारत आहे?”
15दावीद अबनेरास म्हणाला, “तू एक पुरुष आहेस, नाही का? आणि इस्राएलमध्ये तुझ्यासारखा कोण आहे? तू तुझा धनी, म्हणजेच राजाचे रक्षण का केले नाहीस? कोणीतरी तुझ्या धनी राजाचा वध करण्यास आला होता. 16तू जे केलेस ते चांगले नाही. जिवंत याहवेहची शपथ, तू आणि तुझी माणसे मेलीच पाहिजेत, कारण तू तुझ्या मालकाचे, याहवेहच्या अभिषिक्ताचे रक्षण केले नाहीस. तुझ्या सभोवती पाहा. राजाचा भाला आणि पाण्याचा चंबू जे त्यांच्या उशाशी होते ते कुठे आहेत?”
17शौलाने दावीदाचा आवाज ओळखला आणि म्हणाला, “दावीदा माझ्या मुला, हा तुझाच आवाज आहे काय?”
दावीदाने उत्तर दिले, “होय, माझ्या धन्या, माझ्या राजा, हा माझाच आवाज आहे.” 18आणि तो पुढे म्हणाला, “माझा धनी आपल्या सेवकाचा पाठलाग का करीत आहे? मी काय केले आहे आणि कोणत्या बाबतीत दोषी आहे? 19तर आता माझ्या धन्याने, राजाने आपल्या सेवकाचे म्हणणे ऐकावे. जर याहवेहने तुम्हाला माझ्याविरुद्ध चेताविले आहे, तर आपण अर्पण स्वीकारावे. परंतु जर लोकांनी हे केले आहे, तर ते याहवेहसमोर शापित केले जावोत! कारण मला आज याहवेहच्या वतनाचा वाटा मिळू नये म्हणून त्यांनी मला बाहेर घालवून म्हटले, ‘जा, इतर दैवतांची सेवा कर.’ 20आता याहवेहच्या समक्षतेपासून दूर माझे रक्त भूमीवर पडू नये. जसे कोणी डोंगरामध्ये तीतराची शिकार करावी, तसा इस्राएलचा राजा पिसवा शोधायला बाहेर आला आहे.”
21तेव्हा शौल म्हणाला, “मी पाप केले आहे. दावीदा, माझ्या पुत्रा, परत ये. कारण आज तू माझ्या जिवास मौल्यवान समजलेस, मी पुन्हा तुला इजा करणार नाही. खरोखरच मी मूर्खासारखा वागलो आणि फार चुकीचे वागलो.”
22दावीदाने उत्तर दिले, “हा पाहा, राजाचा भाला, तुमच्या तरुण पुरुषांपैकी एकाने इकडे येऊन तो घेऊन जा. 23याहवेह प्रत्येकाला आपआपल्या नीतिमत्तेची व विश्वासूपणाचे प्रतिफळ देवो. याहवेहने आज तुम्हाला माझ्या हाती दिले होते, परंतु मी याहवेहच्या अभिषिक्तावर हात टाकणार नाही. 24जसा आज तुमचा जीव मला मोलाचा वाटला, तसेच याहवेहला माझाही जीव मोलाचा वाटो आणि ते सर्व संकटांपासून मला वाचवो.”
25तेव्हा शौल दावीदास म्हणाला, “दावीदा, माझ्या मुला, तू आशीर्वादित होशील; तू महान गोष्टी करशील आणि खात्रीने विजयी होशील.”
तेव्हा दावीद त्याच्या मार्गाने निघून गेला आणि शौल घरी परतला.
सध्या निवडलेले:
1 शमुवेल 26: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.