YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 शमुवेल 25

25
दावीद, नाबाल आणि अबीगईल
1शमुवेल मरण पावले तेव्हा सर्व इस्राएली लोक एकत्र जमले आणि त्यांच्यासाठी शोक केला; आणि त्यांनी त्यांना रामाह येथील त्यांच्या घरी पुरले. नंतर दावीद खाली पारानच्या#25:1 काही मूळ प्रतींमध्ये माओन वाळवंटात गेला.
2माओन येथे एक श्रीमंत मनुष्य होता, ज्याची कर्मेलमध्ये मालमत्ता होती, त्याच्याकडे एक हजार बोकडे आणि तीन हजार मेंढरे होते आणि तो कर्मेलमध्ये लोकर कातरत होता. 3त्याचे नाव नाबाल आणि त्याच्या पत्नीचे नाव अबीगईल होते. ती बुद्धिमान व सुंदर स्त्री होती, परंतु तिचा पती तो कालेबच्या वंशाचा असून कठोर व दुष्ट वृत्तीचा होता.
4आणि नाबाल मेंढरांची कातरणी करीत आहे असे दावीदाने रानात ऐकले. 5तेव्हा दावीदाने दहा तरुण पुरुष पाठवित म्हटले, “कर्मेल येथे नाबालकडे जा आणि माझ्या नावाने त्याला अभिवादन करा. 6त्याला म्हणा, ‘चिरकाळ जग! तुला, तुझ्या घराण्याला व सर्व जे तुझे आहे त्यांना चांगली स्वस्थता लाभो!
7“ ‘मी ऐकत आहे की, ही मेंढरे कातरण्याची वेळ आहे. जेव्हा तुझे मेंढपाळ आमच्याबरोबर होते, आम्ही त्यांच्याशी वाईट वागलो नाही आणि जितका काळ ते कर्मेल येथे होते त्यांचे काहीही हरवले नाही. 8आपल्या चाकरांना ते विचार आणि ते तुला सांगतील. म्हणून आता माझ्या माणसांवर कृपादृष्टी कर, कारण आम्ही सणाच्या वेळेस आलो आहोत, तर कृपा करून जे काही तुझ्या हाती येईल ते तुझ्या सेवकांना आणि तुझा पुत्र दावीद यांना दे.’ ”
9जेव्हा दावीदाची माणसे तिथे आली, त्यांनी दावीदाच्या नावाने हा निरोप नाबालास दिला व ते वाट पाहत राहिले.
10नाबालने दावीदाच्या सेवकांना उत्तर दिले, “कोण हा दावीद? कोण हा इशायाचा पुत्र? आजकाल पुष्कळ सेवक त्यांच्या मालकांपासून पळून जात आहेत. 11जी भाकर व जे पाणी आणि जे मांस मी माझी मेंढरे कातरणार्‍यांसाठी कापून ठेवले आहे ते, जी माणसे कुठून आली हे मला माहीत नाही अशांना द्यावे काय?”
12तेव्हा दावीदाची माणसे परत त्यांच्या वाटेने गेली. आणि पोहोचल्यावर प्रत्येक शब्दाचा अहवाल दावीदाला दिला. 13तेव्हा दावीद त्याच्या माणसांना म्हणाला, “प्रत्येकाने आपली तलवार कंबरेस बांधा,” आणि त्यांनी तसे केले आणि दावीदानेसुद्धा त्याची तलवार कंबरेस बांधली. सुमारे चारशे पुरुष दावीदाबरोबर गेले आणि दोनशे पुरुष सामानाजवळ राहिले.
14चाकरांपैकी एकाने नाबालाची पत्नी अबीगईल हिला सांगितले, “दावीदाने रानातून आपल्या धन्याला अभिवादन देण्यासाठी निरोप्यांना पाठविले, परंतु त्याने त्यांचा अपमान केला. 15तरीही ही माणसे आमच्याबरोबर चांगलीच होती. ते आमच्याशी वाईट वागले नाहीत आणि संपूर्ण वेळ आम्ही शेतामध्ये त्यांच्याजवळ होतो तेव्हा आमचे काहीही हरवले नाही. 16जेव्हा आम्ही आमची मेंढरे त्यांच्याबरोबर राखीत होतो, तेव्हा रात्रंदिवस ते भिंतीसारखे आमच्या सभोवती होते. 17आता काय करावे याचा तू विचार कर, कारण आमच्या मालकावर आणि त्याच्या संपूर्ण घराण्यावर संकट येत आहे. तो इतका दुष्ट मनुष्य आहे की, त्याच्याबरोबर बोलण्यास कोणी धजत नाही.”
18तेव्हा अबीगईलने घाई केली. तिने दोनशे भाकरी, दोन बुधले द्राक्षारस, पाच मेंढरांचे शिजविलेले मांस, पाच सिआह#25:18 अंदाजे 27 कि.ग्रॅ. भाजलेले धान्य, मनुक्यांच्या शंभर व अंजिराच्या दोनशे ढेपा घेऊन ते सर्व गाढवांवर लादले. 19आणि ती आपल्या सेवकांना म्हणाली, “तुम्ही पुढे जा; मी तुमच्यामागे येते.” परंतु तिने तिचा पती नाबाल याला काहीही सांगितले नाही.
20ती गाढवावर बसून डोंगराच्या ओढ्याकडून जात असताना, तिथे दावीद आणि त्याची माणसे तिच्या बाजूने येत होती व ती त्यांना भेटली. 21दावीद नुकताच म्हणाला होता, “त्याचे काही हरवू नये म्हणून मी रानात या लोकांच्या मालमत्तेवर पहारा ठेवला ते व्यर्थ गेले. त्याने मला चांगल्याची फेड वाईटाने केली आहे. 22उद्या सकाळपर्यंत त्याच्या लोकांपैकी मी एकही पुरुष जिवंत ठेवला तर परमेश्वर दावीदाचे तसेच किंवा त्यापेक्षा अधिक वाईट करो!”
23जेव्हा अबीगईलने दावीदाला पाहिले, तेव्हा ती घाईने गाढवावरून उतरली आणि तिने दावीदासमोर तोंड जमिनीकडे करून अभिवादन केले. 24ती त्याच्या पायावर पडली आणि म्हणाली, “माझ्या धन्या, आपल्या सेवकाच्या अपराधांची क्षमा करा, आणि मला तुमच्याशी बोलू द्या; तुमच्या दासीचे बोलणे ऐकून घ्या. 25माझ्या धन्या, तो दुष्ट मनुष्य नाबाल याच्याकडे लक्ष देऊ नका. तो त्याच्या नावाप्रमाणेच आहे, त्याच्या नावाचा अर्थ मूर्ख आहे आणि त्याच्या ठायी मूर्खपणा आहे. परंतु ज्या पुरुषांना माझ्या धन्याने पाठवले त्यांना मी पाहिले नाही.” 26तर आता, माझ्या धन्या, याहवेह तुमच्या जिवंत परमेश्वराची व तुमची शपथ, याहवेहने तुम्हाला रक्तपातापासून आणि तुमच्या हातांना सूड घेण्यापासून आवरले आहे, तुमचे सर्व शत्रू आणि जे माझ्या धन्याला इजा आणू पाहतात ते नाबालाप्रमाणे होवो. 27आणि ही भेट, जी तुमच्या दासीने माझ्या धन्यासाठी आणली आहे ती तुमच्या बरोबरच्या माणसांना दिली जावो.
28“तुमच्या दासीच्या उद्धटपणाची कृपा करून क्षमा कर. याहवेह तुमचा परमेश्वर खचितच माझ्या धन्याचे राजघराणे कायमचे स्थापित करेल, कारण आपण याहवेहच्या लढाया लढत आहात आणि तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या ठायी दुष्टता आढळणार नाही. 29जरी कोणा मनुष्याने तुमचा जीव घेण्यासाठी तुमचा पाठलाग केला, तरी माझ्या धन्याचा जीव याहवेह तुमचा परमेश्वर यांच्याजवळ जिवंतांच्या गाठोड्यामध्ये सुरक्षित राहेल, परंतु जसे गोफणीच्या झोळीतून फेकावे तसे याहवेह तुमच्या शत्रूंचे प्राण भिरकावून देतील. 30याहवेहने माझ्या धन्यासाठी जे चांगले सांगितले आहे ती प्रत्येक गोष्ट पूर्णतेस नेऊन आपणास इस्राएलवर अधिकारी म्हणून नेमल्यावर, 31तेव्हा माझ्या धन्याने विनाकारण रक्तपात केल्याविषयी किंवा सूड घेतल्याविषयी तुमच्या मनाला टोचणी लागणार नाही किंवा लटपटणारे ओझे असे असणार नाही. आणि जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला यश मिळवून देतील तेव्हा आपल्या दासीची आठवण करा.”
32दावीद अबीगईलला म्हणाला, “ज्यांनी तुला आज माझी भेट घेण्यासाठी पाठवले, ते याहवेह इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत. 33तुझ्या उत्तम निर्णयामुळे व तू मला आज रक्तपातापासून आणि माझ्या हाताने सूड घेण्यापासून दूर ठेवले त्यामुळे तू आशीर्वादित असो. 34नाहीतर जिवंत याहवेह इस्राएलचे परमेश्वर ज्यांनी मला तुझा नाश करण्यापासून आवरले त्यांची शपथ, जर तू त्वरा करून माझी भेट घेण्यास आली नसतीस तर पहाटेपर्यंत नाबालाचा एकही पुरुष जिवंत राहिला नसता.”
35नंतर तिने जे काही त्याच्यासाठी आणले होते ते तिच्या हातून दावीदाने स्वीकारले आणि म्हणाला, “शांतीने घरी जा. मी तुझे म्हणणे ऐकले आहे आणि तुझी विनंती मान्य केली आहे.”
36जेव्हा अबीगईल नाबालाकडे गेली तेव्हा तो घरात होता, त्याने एका राजासारखी मेजवानी आयोजित केली होती. आणि मद्यपान करून तो फार नशेत होता, म्हणून सकाळ होईपर्यंत तिने त्याला काहीही सांगितले नाही. 37नंतर सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर, त्याच्या पत्नीने त्याला घडलेल्या गोष्टी सांगितल्या, ते सर्व नाबालाला सांगितले. तेव्हा त्याच्या हृदयाला धक्का बसला आणि तो दगडासारखा झाला. 38सुमारे दहा दिवसानंतर नाबालाला याहवेहने फटका मारला आणि तो मरण पावला.
39जेव्हा दावीदाला कळले की, नाबाल मरण पावला आहे, तेव्हा तो म्हणाला, “ज्यांनी माझ्या अपमानाचा सूड नाबालावर उगवला आहे आणि ज्यांनी आपल्या सेवकाला वाईट करण्यापासून आवरले आहे त्या याहवेहची स्तुती असो. याहवेहने नाबालाची दुष्टाई त्याच्याच मस्तकावर आणली आहे.”
नंतर अबीगईलने त्याची पत्नी व्हावे म्हणून दावीदाने तिच्याकडे संदेश पाठवला. 40त्याचे सेवक कर्मेल येथे जाऊन अबीगईलला म्हणाले, “दावीदाने आम्हाला तुझ्याकडे पाठविले आहे यासाठी की, तुला त्याची पत्नी होण्यास आम्ही घेऊन जावे.”
41तिने तिचे मस्तक जमिनीपर्यंत लवून म्हणाली, “मी तुमची दासी आहे मी तुमची सेवा करण्यास व माझ्या धन्याच्या सेवकांचे पाय धुण्यास तयार आहे.” 42अबीगईल त्वरित गाढवावर बसली आणि तिच्या पाच दासी व दावीदाच्या निरोप्यांबरोबर गेली आणि त्याची पत्नी झाली. 43दावीदाने येज्रीलची अहीनोअम हिच्याशीही विवाह केला होता आणि त्या दोघी त्याच्या पत्नी होत्या. 44परंतु शौलाने त्याची कन्या मीखल, जी दावीदाची पत्नी होती तिला लईशाचा पुत्र पालती#25:44 किंवा पलतीएल याला दिले होते, जो गल्लीम येथील होता.

सध्या निवडलेले:

1 शमुवेल 25: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन