YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 शमुवेल 15

15
परमेश्वर शौलाला राजा म्हणून नाकारतात
1शमुवेल शौलास म्हणाला, “इस्राएल लोकांवर राजा म्हणून तुझा अभिषेक करण्यास याहवेहने मलाच पाठवले होते; तर आता याहवेहचा संदेश ऐक. 2सर्वशक्तिमान याहवेह असे म्हणतात: ‘इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले त्यावेळी अमालेकी लोकांनी त्यांना रस्त्यात कसे अडविले, त्यासाठी मी त्यांना शिक्षा करणार. 3तर आता तू जा, अमालेक्यांवर हल्ला कर आणि त्यांचे जे काही आहे त्या सर्वांचा सर्वस्वी नाश कर. त्यांची गय करू नको; त्यांचे पुरुष व स्त्रिया, लेकरे व तान्ही बाळे, गुरे व मेंढरे, उंट व गाढवे हे सर्व मारून टाक.’ ”
4तेव्हा शौलाने आपले सैन्य बोलाविले व तेलाईम येथे त्यांची मोजणी केली; ते दोन लक्ष पायदळ व यहूदीयातील दहा हजार सैनिक होते. 5शौल अमालेक्यांच्या शहरात जाऊन तिथे खोर्‍यात दबा धरून राहिला. 6मग शौल केनी लोकांना म्हणाला, “तुम्ही निघून जा, अमालेक्यांना सोडून जा, यासाठी की त्यांच्याबरोबर मी तुमचा नाश करू नये; कारण इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर आले त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी दयेने वागला.” तेव्हा केनी लोक अमालेक्यांमधून निघून गेले.
7तेव्हा शौलाने हवीलापासून इजिप्तच्या पूर्वेकडील सीमेवरील शूरपर्यंत अमालेक्यांना मारले. 8त्याने अमालेक्यांचा राजा अगाग याला जिवंत पकडले, आणि त्याच्या लोकांचा तलवारीने सर्वनाश केला. 9परंतु शौलाने व त्याच्या सैन्याने अगाग राजाला जिवंत ठेवले, तसेच उत्तम मेंढरे, गुरे, पुष्ट वासरे#15:9 किंवा संपूर्ण वाढ झालेले व कोकरे; व सर्वकाही जे चांगले होते त्यांचा नाश करावा असे त्यांना वाटले नाही, म्हणून त्यांनी ते राखून ठेवले. मात्र जे टाकाऊ व कुचकामी होते त्यांचा त्यांनी नाश केला.
10तेव्हा याहवेहचे वचन शमुवेलकडे आले: 11“मी शौलास राजा केले याबद्दल मला पश्चाताप होत आहे, कारण तो माझ्यापासून फिरला आहे आणि त्याने माझ्या आज्ञांचे पालन केले नाही.” शमुवेल फार संतापला आणि रात्रभर याहवेहकडे रडला.
12सकाळी, अगदी पहाटे उठून शमुवेल शौलाला भेटायला निघाला, पण त्याला कोणी सांगितले, “शौल कर्मेलास गेला आहे. तिथे त्याने आपल्या स्वतःच्या आदरार्थ एक स्तंभ उभारला आहे आणि तिथून पुढे तो खाली गिलगालास गेला आहे.”
13जेव्हा शमुवेलने शौलाला गाठले, शौल म्हणाला, “याहवेह तुम्हाला आशीर्वादित करो! मी याहवेहच्या सूचना पार पाडल्या आहेत.”
14परंतु शमुवेलने म्हटले, “तर मग मेंढरांचे बेंबावणे व बैलांचे हंबरणे मी ऐकतो ते काय आहे?”
15शौलाने उत्तर दिले, “सैन्याच्या लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली आहेत; त्यांनी उत्तम मेंढरे व गुरे याहवेह तुमचा परमेश्वर यांच्या यज्ञासाठी राखून ठेवले आहेत, परंतु बाकीच्या सर्वांचा आम्ही पूर्णपणे नाश केला आहे.”
16तेव्हा शमुवेल शौलास म्हणाले, “पुरे! काल रात्री याहवेहने मला काय सांगितले ते मी तुला सांगतो.”
“सांगा,” शौल म्हणाला.
17शमुवेल म्हणाले, “एकेकाळी तू आपल्याच दृष्टीने लहान होतास, तरी इस्राएलच्या गोत्रांचा पुढारी तू झाला नाहीस काय? याहवेहने तुला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला. 18आणि याहवेहने तुला एका कामगिरीवर पाठवित म्हटले, ‘जा आणि त्या दुष्ट अमालेक्यांचा पूर्णपणे नाश कर, ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याविरुद्ध युद्ध कर.’ 19तू याहवेहच्या आज्ञेचे पालन का केले नाहीस? लुटीवर झडप घालून तू याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस?”
20शौल शमुवेलला म्हणाला, “पण मी याहवेहचे आज्ञापालन केले, याहवेहने मला दिलेल्या कामगिरीवर मी गेलो, अमालेक्यांचा मी पूर्णपणे नाश केला आणि अगाग त्यांचा राजा याला मी घेऊन आलो. 21सैनिकांनी त्या लुटीतील मेंढरे व गुरे घेतली व त्यातील जे उत्तम ते गिलगालात याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यासाठी यज्ञ करावे म्हणून राखून ठेवली आहेत.”
22परंतु शमुवेलने उत्तर दिले:
“त्यांच्या आज्ञा पाळल्याने याहवेहला जितका होतो
तितका आनंद होमार्पणे व यज्ञांनी होईल काय?
यज्ञापेक्षा आज्ञापालन चांगले,
आणि एडक्याच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.
23कारण बंडखोरी ही शकुनविद्येच्या पापासारखी आहे,
आणि हट्टीपणा मूर्तिपूजेसारखा वाईट आहे.
तू याहवेहचे वचन धिक्कारले यामुळे,
त्यांनी तुला राजा म्हणून धिक्कारले आहे.”
24शौल शमुवेलास म्हणाला, “मी पाप केले आहे, मी याहवेहच्या आज्ञेचा व तुमच्या सूचनांचा भंग केला आहे; मला लोकांचे भय वाटले, म्हणून मी त्यांचे म्हणणे ऐकले. 25आता मी तुम्हाला विनंती करतो, माझ्या पापाची क्षमा करा आणि मी याहवेहची उपासना करावी म्हणून परत माझ्याबरोबर या.”
26परंतु शमुवेल शौलाला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही. तू याहवेहच्या वचनाचा धिक्कार केला आहे आणि याहवेहनेही तुला इस्राएलचा राजा म्हणून धिक्कारले आहे.”
27आणि शमुवेल जाण्यास वळला, तेव्हा शौलाने त्यांच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला. 28तेव्हा शमुवेल त्याला म्हणाला, “याहवेहने आज इस्राएलचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन ते तुझ्यापेक्षा उत्तम असलेल्या तुझ्या एका शेजार्‍याला दिले आहे. 29जे परमेश्वर इस्राएलचे वैभव आहेत, ते असत्य बोलत नाहीत किंवा आपले मन बदलत नाही; कारण आपले मन बदलण्यास ते मानव नाहीत.”
30शौलाने उत्तर दिले, “मी पाप केले आहे, तरीही माझ्या लोकांच्या वडीलजनांसमोर व इस्राएलसमोर माझा मान राखा; माझ्याबरोबर परत या, म्हणजे मी याहवेह तुमच्या परमेश्वराची उपासना करेन.” 31तेव्हा शमुवेल शौलाबरोबर परत गेले आणि शौलाने याहवेहची उपासना केली.
32नंतर शमुवेल म्हणाला, “अमालेक्यांचा राजा अगाग याला माझ्याकडे घेऊन या.”
अगाग साखळ्यांनी बांधलेला असा शमुवेलकडे आला आणि त्याला वाटले, “मरणाचे संकट खात्रीने टळले आहे.”
33परंतु शमुवेलने म्हटले,
“जसे तुझ्या तलवारीने अनेक स्त्रियांना अपत्यहीन केले,
तसेच तुझी आई स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल.”
आणि शमुवेलने याहवेहसमोर गिलगालात अगागाला मारून टाकले.
34नंतर शमुवेल रामाह येथे गेला आणि शौल आपल्या घरी शौलाच्या गिबियाहकडे परतला. 35शमुवेल आपल्या मरण्याच्या दिवसापर्यंत शौलाला भेटायला गेला नाही, परंतु शमुवेलने त्याच्यासाठी शोक केला. आणि आपण शौलाला इस्राएलवर राजा केले म्हणून याहवेहला पश्चाताप झाला.

सध्या निवडलेले:

1 शमुवेल 15: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन