YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 शमुवेल 14

14
1एके दिवशी शौलाचा पुत्र योनाथान आपल्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण पलिष्ट्यांच्या चौकीच्या पलीकडील बाजूला जाऊ.” परंतु त्याने त्याच्या वडिलांना हे सांगितले नाही.
2शौल गिबियाहच्या बाहेरील हद्दीवर मिग्रोन येथे डाळिंबांच्या झाडाखाली राहत होता. त्याच्याबरोबर सहाशे लोक होते. 3त्यापैकी एक एफोद घातलेला अहीयाह होता. तो शिलोहमध्ये जो याहवेहचा याजक होता त्या एलीचा पुत्र फिनहास, याचा पुत्र ईखाबोद, याचा भाऊ अहीतूब याचा पुत्र होता. योनाथान गेला आहे, हे कोणालाही माहीत नव्हते.
4ज्या घाटांनी योनाथानने पलिष्ट्यांच्या चौकीवर जाण्याची योजना केली होती त्याच्या दोन्ही बाजूंनी शिखरे होती; एका शिखराचे नाव बोसेस व दुसर्‍याचे नाव सेनेह होते. 5एक शिखर उत्तरेकडे मिकमाशासमोर आणि दुसरे दक्षिणेकडे गेबासमोर होते.
6योनाथान त्याच्या तरुण शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, आपण त्या बेसुंती लोकांच्या चौकीकडे जाऊ या. कदाचित याहवेह आपल्या बाजूने कार्य करतील, कारण याहवेहने आमचे तारण करू नये म्हणून त्यांना कोण अडखळविणार? मग ते पुष्कळांद्वारे असो किंवा थोडक्यांद्वारे.”
7त्याचा शस्त्रवाहक म्हणाला, “तुझ्या मनामध्ये जे आहे ते कर, पुढे जा; मी माझ्या पूर्ण मनाने व जिवाने तुझ्याबरोबर आहे.”
8योनाथान म्हणाला, “चल, आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांच्या दृष्टीस पडू. 9जर ते आपल्याला म्हणतील, ‘आम्ही तुमच्याकडे येईपर्यंत तिथेच थांबा,’ तर आपण जिथे आहोत तिथेच थांबू आणि त्यांच्यापर्यंत जाणार नाही. 10परंतु जर ते म्हणाले, ‘आमच्याकडे वर या,’ तर आपण चढून जाऊ, कारण याहवेहने त्यांना आपल्या हाती दिले आहे याचे ते चिन्ह असेल.”
11जेव्हा ते दोघेजण पलिष्ट्यांच्या चौकीवर त्यांच्या दृष्टीस पडले. तेव्हा पलिष्टी लोक म्हणाले, “पाहा, इब्री लोक ज्या बिळांमध्ये लपले होते त्यातून आता बाहेर येत आहेत.” 12चौकीवरील लोक योनाथान व त्याच्या शस्त्रवाहकाला ओरडून म्हणाले, “इकडे आमच्याकडे वर या, म्हणजे आम्ही तुम्हाला धडा शिकवू.”
तेव्हा योनाथान शस्त्रवाहकाला म्हणाला, “चल, माझ्यामागे वर ये; कारण याहवेहने त्यांना इस्राएलच्या हाती दिले आहे.”
13योनाथान आपल्या हातापायांचा वापर करीत वर चढला, त्याच्यामागे त्याचा शस्त्रवाहक चढत गेला. पलिष्टी लोक योनाथानसमोर पडले व त्याचा शस्त्रवाहक त्याच्यामागे पलिष्ट्यांना मारत त्यांच्यामागे गेला. 14त्या पहिल्या हल्ल्यात योनाथान व त्याच्या शस्त्रवाहकाने सुमारे अर्ध्या एकर जमिनीवर वीस माणसे मारली.
इस्राएली पलिष्ट्यांची दाणादाण करतात
15छावणीत व शेतात, चौकीवर व छापा टाकणारे अशा संपूर्ण सैन्यामध्ये भय निर्माण झाले; आणि भूमी हादरली, ते परमेश्वराकडून पाठविलेले भयंकर भय होते.
16इकडे बिन्यामीनच्या गिबियाहतील शौलाच्या पहारेकर्‍यांनी पाहिले की सैन्य विखरून सर्व दिशेने धावत जात आहे. 17तेव्हा शौलाने आपल्याबरोबर असलेल्या लोकांना म्हटले, “आपल्या लोकांची हजेरी घ्या आणि आम्हाला कोण सोडून गेला आहे ते पाहा.” त्यांनी हजेरी घेतली तेव्हा योनाथान व त्याचा शस्त्रवाहक तिथे नव्हते.
18शौल अहीयाहला म्हणाला, “परमेश्वराचा एफोद#14:18 एफोद काही मूळ प्रतींमध्ये कोश इकडे आण,” (कारण त्यावेळी तो इस्राएली लोकांसोबत होता.) 19शौल याजकांबरोबर बोलत असताना, पलिष्ट्यांच्या छावणीतील गोंधळ अधिकच वाढत गेला. तेव्हा शौल याजकाला म्हणाला, “थांब!#14:19 किंवा आपला हात बाजूला काढून घे.
20तेव्हा शौल व त्याचे लोक एकत्र जमा होऊन युद्धास निघाले. त्यांना पलिष्टी लोक मोठ्या गोंधळात, त्यांच्याच तलवारीने एकमेकास मारत असलेले दिसले. 21जे इब्री लोक आधी पलिष्ट्यांबरोबर होते व त्यांच्याबरोबर त्यांच्या छावणीत गेले होते, ते आता जे इस्राएली लोक शौल व योनाथान बरोबर होते त्यांच्याकडे गेले. 22एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात जे इस्राएली लोक लपून राहिले होते त्यांनी जेव्हा ऐकले की पलिष्ट्यांनी पळ काढला आहे त्यांनीही त्याच ईर्षेने युद्धात भाग घेतला. 23अशाप्रकारे त्या दिवशी याहवेहने इस्राएलची सुटका केली आणि युद्ध बेथ-आवेनच्या पलीकडे गेले.
योनानाथ मध खातो
24त्या दिवशी इस्राएल कष्टात होते, कारण शौलाने लोकांना असे म्हणत शपथबद्ध केले होते, “दिवस मावळण्यापूर्वी व मी माझ्या शत्रूंवर सूड घेईपर्यंत, जो कोणी भोजन करेल तो शापित होईल!” त्यामुळे सैन्यातील कोणीही अन्न चाखले नाही.
25सर्व सैन्य जेव्हा रानात गेले, त्यावेळी जमिनीवर मध पडलेले होते. 26जेव्हा ते आत जंगलात गेले, तेव्हा त्यांनी मध वाहत असलेले पाहिले; परंतु कोणीही आपला हात तोंडाला लावला नाही, कारण त्यांना शपथेचे भय होते. 27परंतु आपल्या पित्याने लोकांना शपथबद्ध केले आहे याविषयी योनाथानला माहीत नव्हते, म्हणून त्याने त्याच्या हातात असलेल्या काठीचे टोक मधाच्या पोळ्यात घातले व ते खाल्ले आणि त्याचे डोळे टवटवीत झाले. 28नंतर त्याला एका सैनिकाने सांगितले, “तुझ्या पित्याने सैन्याला सक्त शपथेने बद्ध केले की ‘आज जो कोणी भोजन करेल तो शापित होईल!’ म्हणूनच लोक खूप थकून गेले आहेत.”
29योनाथान म्हणाला, “माझ्या पित्याने देशावर कष्ट आणले आहे. हे थोडे मध चाखून माझे डोळे पाहा किती टवटवीत झाले आहेत. 30आपल्या शत्रूकडून मिळालेल्या लुटीतील लोकांनी काही खाल्ले तर किती बरे असते. पलिष्ट्यांचा संहार केल्याचा आनंद यापेक्षा मोठा असता काय?”
31त्या दिवशी मिकमाशपासून अय्यालोन पर्यंत पलिष्ट्यांना त्यांनी मारले होते, त्यामुळे ते अतिशय थकले होते. 32तेव्हा ते लुटीवर तुटून पडले, त्यांनी मेंढरे, गुरे व वासरे घेऊन त्यांना जमिनीवर कापले आणि ते रक्तासहित खाल्ले. 33मग कोणी शौलाला सांगितले, “पाहा, रक्तासहित मांस खाऊन लोक याहवेहविरुद्ध पाप करीत आहेत.”
“तुम्ही विश्वासघात केला आहे,” तो म्हणाला, “एक मोठा दगड इकडे लवकर लोटत आणा.” 34तेव्हा शौल म्हणाला, “लोकांमध्ये जा आणि त्यांना सांग, ‘तुमच्यातील प्रत्येकाने तुमचे गुरे व मेंढरे माझ्याकडे आणा आणि त्यांना या ठिकाणी कापून खा. रक्तासहित मांस खाऊन याहवेहविरुद्ध पाप करू नका.’ ”
तेव्हा सर्वांनी आपआपले बैल आणून त्या रात्री तिथे ते कापले. 35नंतर शौलाने याहवेहसाठी एक वेदी बांधली. शौलाने बांधलेली ही पहिलीच वेदी होती.
36शौल म्हणाला, “चला, आपण रात्री खाली जाऊन पलिष्ट्यांचा पहाटेपर्यंत पाठलाग करू आणि त्यांच्यातील एकालाही जिवंत सोडू नये.”
लोक म्हणाले, “तुला जे उत्तम वाटेल ते कर.”
परंतु याजकाने म्हटले, “याबाबत आपण परमेश्वराला विचारू.”
37तेव्हा शौलाने परमेश्वराला विचारले, “मी खाली जाऊन पलिष्ट्यांचा पाठलाग करावा काय? त्यांना तुम्ही इस्राएलच्या हाती देणार काय?” परंतु परमेश्वराने त्या दिवशी त्याला उत्तर दिले नाही.
38तेव्हा शौल म्हणाला, “जे सेनानायक आहात ते तुम्ही माझ्याकडे या आणि आज कोणते पाप घडले हे आपण शोधू. 39इस्राएलचा उद्धार करणारा याहवेह यांची शपथ, पापाचा दोष जरी माझा पुत्र योनाथान याच्यावर असला, तरी त्याने मरावे.” परंतु कोणीही काही बोलले नाही.
40तेव्हा शौल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “तुम्ही एका बाजूला उभे राहा; मी व माझा पुत्र योनाथान या बाजूला उभे राहतो.”
लोक म्हणाले, “तुला जे उत्तम वाटेल ते कर.”
41शौलाने याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, “तुम्ही आपल्या सेवकाला आज उत्तर का दिले नाही? जर मी किंवा माझा पुत्र योनाथान दोषी आहे तर उरीमद्वारे ते दाखवावे, परंतु जर इस्राएलचे लोक दोषी आहेत, तर थुम्मीमद्वारे ते दाखवावे.” योनाथान व शौलाची चिठ्ठी निघाली आणि लोक त्यातून सुटले. 42शौल म्हणाला, “आता माझ्या व माझा पुत्र योनाथानवर चिठ्ठ्या टाका,” तेव्हा योनाथानची चिठ्ठी निघाली.
43शौलाने योनाथानला विचारले, “तू काय केलेस ते मला सांग.”
योनाथानने उत्तर दिले, “माझ्या काठीच्या टोकावर घेऊन मी थोडा मध खाल्ला; परंतु आता मला मरणे भाग आहे.”
44शौल म्हणाला, “योनाथान, जर मी तुला मृत्युदंड दिला नाही, तर परमेश्वर माझ्याशी कठोरपणे वागो.”
45परंतु सैनिकांनी शौलाला म्हटले, “ज्याने इस्राएली लोकांस हा मोठा उद्धार आणला आहे, तो योनाथान मरावा काय? कदापि नाही! जिवंत याहवेहची शपथ, त्याच्या डोक्यावरील एक केसही खाली पडणार नाही, कारण त्याने आज जे केले ते परमेश्वराच्या साहाय्याने केले आहे.” याप्रकारे लोकांनी योनाथानला सोडविले आणि त्याला मृत्युदंड दिला नाही.
46यानंतर शौलाने पलिष्ट्यांचा पाठलाग करणे थांबविले आणि ते आपापल्या ठिकाणी परतले.
47इस्राएलवर आपले राज्य स्थापित केल्यावर, चहूकडील असलेले त्यांचे शत्रू: मोआब, अम्मोनी, एदोम, सोबाहचे राजे व पलिष्टी यांच्याशी शौल लढला. जिथे कुठे तो जाई, तिथे तो विजयी होई#14:47 काही मूळ प्रतींमध्ये शिक्षा दिली.. 48तो शौर्याने लढला आणि त्याने अमालेक्यांचा पराभव केला आणि ज्यांनी इस्राएलला लुटले होते त्यांच्या हातूनही त्यांची सुटका केली.
शौलाचे घराणे
49शौलाचे पुत्र योनाथान, अबीनादाब इश्वी व मलकी-शुआ हे होते. त्याच्या थोरल्या मुलीचे नाव मेरब व धाकटीचे नाव मीखल होते. 50त्याच्या पत्नीचे नाव अहीनोअम होते, ती अहीमाजची कन्या होती. शौलाचा सेनापती, नेरचा पुत्र अबनेर होता आणि नेर शौलाचा काका होता. 51शौलाचा पिता कीश व अबनेरचा पिता नेर अबीएलचे पुत्र होते.
52शौलाच्या सर्व कारकिर्दीत इस्राएल व पलिष्ट्यांमध्ये घनघोर युद्ध होते, आणि जेव्हा शौलाला एखादा पराक्रमी किंवा शूर पुरुष आढळला तर तो त्याला आपल्या सेवेत सामील करीत असे.

सध्या निवडलेले:

1 शमुवेल 14: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन