1 शमुवेल 16
16
दावीदाचा अभिषेक
1याहवेह शमुवेलला म्हणाले, “मी शौलाला इस्राएलाचा राजा म्हणून नाकारले आहे, तर तू कुठवर त्याच्यासाठी शोक करीत राहणार? तुझे शिंग तेलाने भर आणि चल; मी तुला बेथलेहेमकर इशाय याच्याकडे पाठवित आहे. मी त्याच्या एका पुत्राला राजा म्हणून निवडले आहे.”
2परंतु शमुवेल म्हणाला, “मी कसे जाऊ? जर शौलाने याविषयी ऐकले, तर तो मला जिवे मारेल.”
याहवेह म्हणाले, “तुझ्यासोबत एक कालवड घे आणि सांग, ‘मी याहवेहला यज्ञ करण्यासाठी आलो आहे.’ 3इशायला यज्ञासाठी आमंत्रित कर आणि तू काय करावे ते मी तुला दाखवेन. ज्याला मी सूचित करेन त्याला तू माझ्यासाठी अभिषिक्त कर.”
4याहवेहने सांगितल्याप्रमाणे शमुवेलने केले. जेव्हा शमुवेल बेथलेहेमला पोहोचला, तेव्हा त्या नगराचे वडीलजन थरथर कापत त्यांना भेटले. त्यांनी विचारले, “आपण शांतीने आला आहात काय?”
5शमुवेलने उत्तर दिले, “होय, मी शांतीने आलो आहे; मी याहवेहला यज्ञ करण्यासाठी आलो आहे. आपणास शुद्ध करा आणि माझ्याबरोबर यज्ञाला या.” मग शमुवेलने इशाय व त्याच्या पुत्रांना शुद्ध केले आणि त्यांना यज्ञासाठी आमंत्रण दिले.
6ते आल्यानंतर एलियाबाला पाहून शमुवेलला वाटले, “निश्चितच याहवेहचा अभिषिक्त येथे याहवेहसमोर उभा आहे.”
7परंतु याहवेह शमुवेलला म्हणाले, “त्याचे रूप किंवा त्याची उंची यानुसार जाऊ नकोस, कारण मी त्याला नाकारले आहे. मनुष्य पाहतात त्याप्रमाणे याहवेह पाहत नाहीत. मनुष्य बाहेरील रूप पाहतात, परंतु याहवेह हृदय पारखतात.”
8नंतर इशायाने अबीनादाबाला शमुवेलसमोर चालविले. परंतु शमुवेलने म्हटले, “याहवेहने यालाही निवडले नाही.” 9नंतर इशायाने शम्माहला चालविले, परंतु शमुवेल म्हणाला, “हा सुद्धा याहवेहने निवडलेला नाही.” 10इशायाने त्याचे सात पुत्र शमुवेलसमोर चालविले, परंतु शमुवेल त्याला म्हणाला, “याहवेहने यांना निवडले नाही.” 11तेव्हा त्यांनी इशायला विचारले, “तुझे पुत्र येण्याचे पूर्ण झाले काय?”
इशायाने उत्तर दिले, “अजून एक जो सर्वात लहान आहे, तो रानात मेंढरे राखीत आहे.”
शमुवेल म्हणाले, “त्याला बोलाविणे पाठव; कारण तो येईपर्यंत आम्ही बसणार नाही.”
12तेव्हा इशायाने त्याला बोलावून आणले. तो तांबूस रंगाचा, सुंदर डोळ्यांचा, दिसायला देखणा असा होता.
तेव्हा याहवेह म्हणाले, “ऊठ आणि त्याला अभिषिक्त कर, हाच तो आहे.”
13तेव्हा शमुवेलने तेलाचे शिंग घेतले व त्याच्या भावांदेखत दावीदाचा अभिषेक केला आणि त्या दिवसापासून याहवेहचा आत्मा सामर्थ्याने दावीदावर आला. नंतर शमुवेल रामाह येथे परत गेला.
शौलाच्या सेवेस दावीद
14आता याहवेहचा आत्मा शौलापासून निघून गेला होता आणि याहवेहकडून पाठविलेला एक दुष्ट आत्मा#16:14 किंवा इजा करणारा त्याला बाधा करू लागला.
15शौलाच्या सेवकांनी त्याला म्हटले, “पाहा, परमेश्वराकडून पाठविलेला हा दुष्ट आत्मा तुम्हाला बाधा करीत आहे. 16आमच्या धन्याने त्याच्या या सेवकांना आज्ञा द्यावी की एक उत्कृष्ट वीणावादकाचा शोध करावा, म्हणजे जेव्हा परमेश्वराकडून येणारा दुष्ट आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तो वीणा वाजवेल, आणि तुम्हाला बरे वाटेल.”
17तेव्हा शौल आपल्या सेवकांना म्हणाला, “एक चांगला वीणावादक शोधून त्याला माझ्याकडे आणा.”
18त्यापैकी एका सेवकाने उत्तर दिले, “मी बेथलेहेमकर इशायाचा पुत्र पाहिला आहे, तो वीणा वादनात निपुण आहे. तो शूर व योद्धा आहे, तो उत्तम वक्ता व रूपवान आहे; व याहवेह त्याच्याबरोबर आहेत.”
19तेव्हा शौलाने इशायाकडे निरोप पाठवून म्हटले, “तुझा पुत्र दावीद जो मेंढरे राखीत आहे त्याला माझ्याकडे पाठव.” 20तेव्हा इशायाने आपला पुत्र दावीदाबरोबर भाकरी, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू लादलेले एक गाढव शौलाकडे पाठविले.
21दावीद शौलाकडे आला व त्याच्या सेवेस हजर झाला. शौलाला तो अतिशय आवडला व दावीद त्याचा एक शस्त्रवाहक झाला. 22नंतर शौलाने इशायला संदेश पाठवून सांगितले, “दावीदाला माझ्या सेवेत असू दे. कारण मी त्याच्यावर प्रसन्न आहे.”
23ज्या ज्यावेळी परमेश्वराकडून पाठविलेला दुष्ट आत्मा शौलावर येई, त्यावेळी दावीद आपली वीणा घेऊन वाजवित असे, तेव्हा शौलाला बरे वाटत असे, आणि दुष्ट आत्मा शौलाला सोडून जात असे.
सध्या निवडलेले:
1 शमुवेल 16: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.