YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 20

20
बेन-हदाद शोमरोनावर हल्ला करतो
1अरामचा राजा बेन-हदादाने आपले सैन्य एकत्र केले. त्याच्याबरोबर बत्तीस राजे आपआपले घोडे व रथ घेऊन त्यांनी शोमरोनला वेढा घालून त्यावर हल्ला केला. 2त्याने इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे शहरात असे सांगत दूत पाठवले, 3“बेन-हदाद असे म्हणतो: ‘तुझे चांदी व सोने माझे आहेत, तुझ्या उत्तम स्त्रिया आणि लेकरे ही सुद्धा माझी आहेत.’ ”
4इस्राएलच्या राजाने उत्तर दिले, “माझ्या स्वामी, आपल्या म्हणण्याप्रमाणे मी व माझे जे काही आहे ते सर्व आपलेच आहे.”
5दूत पुन्हा येऊन म्हणाले, “बेन-हदाद असे म्हणतो: ‘तुझी चांदी व सोने, तुझ्या स्त्रिया व लेकरे यांना माझ्या स्वाधीन करावे म्हणून सांगितले होते. 6परंतु उद्या याच वेळी तुझ्या राजवाड्यात व तुझ्या अधिकार्‍यांच्या घरात शोध करावा म्हणून मी माझे अधिकारी पाठवेन. तुझे जे काही मौल्यवान आहे ते सर्व ते घेऊन जातील.’ ”
7तेव्हा इस्राएलच्या राजाने देशातील वडील लोकांना बोलाविले व म्हटले, “पाहा हा मनुष्य कसा त्रास देऊ इच्छित आहे! त्याने जेव्हा माझ्या स्त्रिया आणि माझी लेकरे, माझी चांदी व सोने मागवून घेतली, मी त्याला नकार दिला नाही.”
8वडील आणि सर्व लोकांनी उत्तर दिले, “आपण त्याचे ऐकू नये किंवा त्याच्या मागण्यांना सहमत होऊ नये.”
9तेव्हा त्याने बेन-हदादच्या दूतांना उत्तर दिले, “माझ्या स्वामीला सांगा, ‘पहिल्याने आपण जी मागणी केली होती त्यानुसार आपला हा सेवक करेल, परंतु ही मागणी मी पूर्ण करू शकत नाही.’ ” त्यांनी परत जाऊन हा संदेश बेन-हदादकडे पोहोचविला.
10तेव्हा बेन-हदादने अहाबास आणखी एक संदेश पाठवला: “जर माझ्या माणसांसाठी शोमरोनात मूठभर माती जरी पुरेशी पडली तरी देव माझे तसे किंवा त्यापेक्षा अधिक वाईट करो.”
11इस्राएलच्या राजाने उत्तर दिले, “त्याला सांगा: ‘युद्धासाठी शस्त्रधारण करणार्‍याने शस्त्र उतरविणार्‍याप्रमाणे फुशारकी मारू नये.’ ”
12बेन-हदाद आणि इतर राजे आपल्या तंबूंमध्ये मद्य पीत असताना त्याने ही बातमी ऐकली आणि त्याने त्याच्या माणसांना आज्ञा दिली: “हल्ल्यासाठी तयारी करा.” म्हणून शहरावर हल्ला करण्यास त्यांनी तयारी केली.
अहाब बेन-हदादचा पराजय करतो
13त्या दरम्यान इस्राएलचा राजा अहाबकडे एक संदेष्टा आला व त्याने असे जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘हे मोठे सैन्य तू पाहतोस काय? आज ते मी तुझ्या हाती देईन, मग तू जाणशील की मी याहवेह आहे.’ ”
14“परंतु हे कोण करेल?” अहाबाने विचारले.
संदेष्ट्याने उत्तर दिले, “याहवेह असे म्हणतात: ‘राज्यपालांच्या हाताखाली काम करणारे कनिष्ठ सैनिक हे करतील.’ ”
अहाबाने विचारले, “आणि युद्धाची सुरुवात कोण करणार?”
संदेष्ट्याने म्हटले, “सुरुवात तू करणार.”
15तेव्हा अहाबाने राज्यपालांच्या हाताखाली असलेल्या दोनशे बत्तीस कनिष्ठ सैन्यांना बोलावून घेतले. मग त्याने सर्व इस्राएली लोकांना जमा केले, ते सर्व सात हजार होते. 16मध्यान्हाच्या वेळी, बेन-हदाद आणि त्याच्याबरोबर हात मिळविलेले बत्तीस राजे त्यांच्या तंबूंमध्ये मद्यधुंद झालेले होते. 17राज्यपालांच्या हाताखाली असलेले कनिष्ठ सैनिक प्रथम बाहेर पडले.
आता बेन-हदादने टेहळणीसाठी पाठविलेल्या सैनिकांनी येऊन सांगितले, “शोमरोनातून माणसे निघाली आहेत.”
18तेव्हा तो म्हणाला, “जर ते शांतीने येत आहेत तर त्यांना जिवंत पकडा; जर ते युद्धासाठी येत आहेत तरीही त्यांना जिवंत पकडा.”
19तेव्हा राज्यपालांच्या हाताखाली असलेले कनिष्ठ सैनिक नगरातून बाहेर पडले आणि त्यांच्यामागे सैन्य निघाले. 20आणि त्या प्रत्येकाने आपआपल्या विरोधकांना मारून टाकले; आणि अरामी लोकांनी पळ काढला आणि इस्राएली लोकांनी त्यांचा पाठलाग केला. पण अरामचा राजा बेन-हदाद आपल्या काही घोडेस्वारांबरोबर घोड्यावर स्वार होऊन निसटून गेला. 21इस्राएलच्या राजाने जाऊन त्यांच्या घोड्यांना व रथांना गाठले आणि अराम्यांचे मोठे नुकसान केले.
22त्यानंतर, संदेष्ट्याने इस्राएलच्या राजाकडे येऊन म्हटले, “आपणास बळकट करा आणि काय करावे हे जपून पाहा, कारण पुढील वसंतऋतूमध्ये अरामचा राजा पुन्हा तुझ्यावर हल्ला करेल.”
23त्या दरम्यान, अरामाच्या राजाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सल्ला दिला, “त्यांची दैवते, डोंगरावरील दैवते आहेत. म्हणून ते आपल्यासमोर अधिक प्रबळ ठरले. परंतु आपण त्यांच्याशी जर मैदानावर लढलो, तर आपण त्यांच्यावर प्रबळ ठरू. 24मात्र असे करा: की राजांना बाजूला काढा व त्यांच्या जागी इतर राज्यपालांची नेमणूक करा. 25तुमचे जे सैन्य नष्ट झाले, त्यासारखे दुसरे सैन्य; घोड्यासाठी घोडा व रथासाठी रथ तयार करा; म्हणजे आपण मैदानावर इस्राएलशी लढू शकू आणि खचितच आपण त्यांच्यापेक्षा अधिक प्रबळ होऊ.” त्यांच्याशी सहमत होऊन त्यानुसार त्याने केले.
26पुढील वसंतॠतूत बेन-हदादने अरामी लोकांना जमा केले आणि ते इस्राएलशी लढण्यास अफेक येथे गेले. 27जेव्हा इस्राएली लोकसुद्धा एकत्र होऊन आपला अन्नसामुग्रींचा पुरवठा करून त्यांचा सामना करण्यास निघाले. इस्राएली लोकांनी शेळ्यांच्या दोन लहान कळपांप्रमाणे त्यांच्यासमोर तळ दिला आणि अरामी लोकांनी सर्व प्रदेशाला व्यापून टाकले होते.
28परमेश्वराचा एक मनुष्य आला आणि त्याने इस्राएलच्या राजाला सांगितले, “याहवेह असे म्हणतात: ‘कारण अरामी लोकांना वाटते की याहवेह डोंगरावरील दैवत आहे, तळवटीचा नाही, म्हणून मी हे मोठे सैन्य तुझ्या हाती देईन आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”
29सात दिवसापर्यंत त्यांनी एकमेकांसमोर तळ दिला आणि सातव्या दिवशी लढाई सुरू झाली. इस्राएली लोकांनी एका दिवसात एक लाख अरामी पायदळी सैन्याला मारून टाकले. 30बाकीचे लोक अफेक शहरात पळून गेले, तिथे सत्तावीस हजार लोकांवर भिंत कोसळून पडली आणि बेन-हदाद शहरात पळून जाऊन एका आतील खोलीत लपून राहिला.
31त्याचे अधिकारी त्याला म्हणाले, “पाहा, आम्ही असे ऐकले आहे की इस्राएली राजे फार दयाळू असतात. तर आपण आपल्या कंबरेस गोणपाट नेसून आणि आपल्या डोक्याला दोरी बांधून इस्राएलच्या राजाकडे जाऊ, कदाचित तो तुझा जीव वाचवेल.”
32तेव्हा आपल्या कंबरेला गोणपाट नेसून व डोक्याला दोरी बांधून, ते इस्राएलच्या राजाकडे गेले व म्हणाले, “आपला सेवक बेन-हदाद म्हणतो: ‘कृपया मला जीवनदान द्यावे.’ ”
राजाने म्हटले, “तो अजूनही जिवंत आहे काय? तो तर माझा भाऊ आहे.”
33त्या माणसांनी हे चांगले चिन्ह असे समजून अहाबाचा शब्द चटकन पकडून ते म्हणाले, “होय, आपला भाऊ बेन-हदाद!”
राजाने म्हटले, “जा आणि त्याला घेऊन या,” जेव्हा बेन-हदाद बाहेर आला, अहाबाने त्याला आपल्या रथात घेतले.
34बेन-हदाद म्हणाला, “माझ्या पित्याने जी शहरे आपल्या पित्याकडून घेतली ती सर्व मी आपणास परत करेन. माझ्या पित्याने जशा शोमरोनात वसविल्या तशाच बाजारपेठा आपण दिमिष्कात वसवा.”
अहाब म्हणाला, “या करारावर मी तुला मोकळे करतो.” म्हणून त्याने त्याच्याशी करार केला व त्याला सोडून दिले.
संदेष्टा अहाबाचा निषेध करतो
35याहवेहच्या शब्दानुसार संदेष्ट्यांच्या एका मंडळीतील एक संदेष्टा आपल्या साथीदाराला म्हणाला, “आपल्या शस्त्राने माझ्यावर वार कर,” परंतु त्याने नकार दिला.
36तेव्हा संदेष्टा म्हणाला, “कारण तू याहवेहचा शब्द मानला नाहीस, तू माझ्यापासून जाताच एक सिंह तुला मारून टाकील.” आणि तो मनुष्य जाताच सिंहाने त्याला गाठले व मारून टाकले.
37मग संदेष्ट्याने आणखी एका मनुष्याला म्हटले, “कृपया माझ्यावर वार कर.” तेव्हा त्या मनुष्याने त्याच्यावर वार करून त्याला जखमी केले. 38नंतर संदेष्टा जाऊन राजाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभा राहिला. त्याने आपल्या पागोट्याने आपले डोळे झाकून घेऊन आपले रूप बदलले होते. 39राजा जवळून जात असता, संदेष्ट्याने त्याला हाक मारीत म्हटले, “आपला सेवक युद्धभूमीवर गेला असता, एक मनुष्य एका कैद्याला माझ्याकडे घेऊन आला व म्हणाला, ‘या माणसावर लक्ष ठेव, तो जर गायब झाला, तर त्याच्या जिवासाठी तुला आपला जीव द्यावा लागेल, नाहीतर त्याचा मोबदला म्हणून तुला चांदीचा एक तालांत#20:39 सुमारे चौतीस कि.ग्रॅ. भरावा लागेल.’ 40आपला सेवक इकडे तिकडे व्यस्त असताना, तो मनुष्य गायब झाला.”
“आपली शिक्षा हीच असणार,” इस्राएलचा राजा म्हणाला. “तू आपल्याच मुखाने ती सांगितली आहे.”
41तेव्हा संदेष्ट्याने चटकन आपल्या डोळ्यांवरील पागोटाची पट्टी काढली, आणि तो संदेष्ट्यांपैकी एक आहे असे इस्राएलच्या राजाने ओळखले. 42संदेष्टा राजाला म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘ज्या मनुष्याने मरावे असे मी योजले होते, त्याला तू मोकळे सोडले आहे. त्यामुळे त्याच्या जिवाबद्दल तुझा जीव, त्याच्या लोकांसाठी तुझे लोक जातील.’ ” 43तेव्हा इस्राएलचा राजा खिन्न व रागाने भरून शोमरोनातील आपल्या राजवाड्याकडे गेला.

सध्या निवडलेले:

1 राजे 20: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन