YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 21

21
नाबोथचा द्राक्षमळा
1काही काळानंतर, येज्रीली नाबोथच्या द्राक्षमळ्यासंबंधी एक घटना घडली, हा द्राक्षमळा अहाब राजाच्या शोमरोनातील येज्रील राजवाड्याजवळ होता. 2अहाब नाबोथला म्हणाला, “तुझ्या द्राक्षमळ्यात मला भाजीपाल्याची बाग करू दे, कारण तो माझ्या राजवाड्याजवळ आहे. त्याचा मोबदला म्हणून मी तुला त्याहून चांगला द्राक्षमळा देईन किंवा तुझी इच्छा असली तर त्याचे योग्य मोल मी तुला देईन.”
3परंतु नाबोथने अहाबाला उत्तर दिले, “माझ्या पूर्वजांचे वतन मी तुला द्यावे असे याहवेह माझ्या हातून कधी न घडवो.”
4त्यामुळे अहाब खिन्न व रागाने भरून आपल्या घरी गेला कारण येज्रीली नाबोथने त्याला म्हटले, “माझ्या पूर्वजांचे वतन मी तुला देणार नाही.” अहाब रुसून व अन्न खाण्यास नाकारीत आपल्या बिछान्यावर पडून राहिला.
5तेव्हा त्याची पत्नी ईजबेल आत आली व त्याला विचारले, “तुम्ही इतके खिन्न का आहात? तुम्ही अन्न का खात नाही?”
6तो तिला म्हणाला, “कारण येज्रीली नाबोथला मी म्हणालो, ‘तुझा द्राक्षमळा मला विकत दे; नाहीतर तुझी इच्छा असली तर, त्याबदल्यात त्याच किमतीत मी तुला दुसर्‍या ठिकाणी द्राक्षमळा देईन.’ परंतु तो म्हणाला, ‘मी तुला माझा द्राक्षमळा देणार नाही.’ ”
7त्याची पत्नी ईजबेल म्हणाली, “इस्राएलचा राजा असताना तुमचे वर्तन असे असावे काय? उठा आणि भोजन करा! आपले मन आनंदित करा. येज्रीली नाबोथचा द्राक्षमळा मी तुम्हाला मिळवून देईन.”
8मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली, त्यावर त्याचा शिक्का मारला आणि नाबोथच्या शहरात त्याच्याबरोबर राहत असलेले वडीलजन व प्रतिष्ठित लोकांकडे ती पाठवली. 9त्या पत्रांमध्ये तिने लिहिले:
“शहरात उपास जाहीर करा आणि नाबोथला सर्वात महत्त्वाच्या स्थळी बसवा. 10परंतु त्याच्यासमोर दोन अधम व्यक्तींना बसवावे आणि ज्या परमेश्वराने आशीर्वाद दिला त्यांना व राजाला शाप दिल्याचा आरोप त्याच्यावर आणावा. मग त्याला बाहेर नेऊन तो मरेपर्यंत धोंडमार करा.”
11तेव्हा नाबोथच्या शहरात राहत असलेल्या वडीलजन व प्रतिष्ठित लोकांनी ईजबेलने लिहिलेल्या पत्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे केले. 12त्यांनी उपास जाहीर केला व लोकांमधील अगदी महत्त्वाच्या स्थळी नाबोथला बसविले. 13मग दोन अधम व्यक्ती त्याच्यासमोर येऊन बसले आणि लोकांसमक्ष नाबोथविरुद्ध आरोप आणले. ते म्हणाले, “नाबोथने परमेश्वराला व राजाला शाप दिला आहे.” म्हणून त्यांनी त्याला शहराच्या बाहेर नेले आणि तो मरेपर्यंत त्याला धोंडमार केली. 14नंतर त्यांनी ईजबेलला निरोप पाठवून म्हटले: “नाबोथला धोंडमार करून जिवे मारले आहे.”
15येज्रीली नाबोथला धोंडमार करून मारले आहे हे ईजबेलने ऐकताच, ती अहाबाला म्हणाली, “उठा आणि ज्या येज्रीली नाबोथने तुम्हाला आपला द्राक्षमळा पैसे घेऊन देण्यास नाकारले त्याचा द्राक्षमळा ताब्यात घ्या. तो आता जिवंत नाही, तो मेला आहे.” 16येज्रीली नाबोथ मेला आहे असे जेव्हा अहाबाने ऐकले, तेव्हा तो उठला व नाबोथचा द्राक्षमळा ताब्यात घेण्यास निघाला.
17त्यानंतर तिश्बीचा एलीयाहकडे याहवेहचे वचन आले: 18“खाली जाऊन इस्राएलचा राजा अहाब, जो शोमरोनमध्ये राज्य करतो त्याला भेट, आता तो नाबोथच्या द्राक्षमळ्यात आहे, तो आपल्या ताब्यात घ्यावा म्हणून तो तिथे गेला आहे. 19त्याला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: तू एका मनुष्याचा खून करून त्याची मालमत्ता ताब्यात घेतली नाही काय?’ तेव्हा त्याला सांग, ‘याहवेह असे म्हणतात: ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथचे रक्त चाटले, त्याच ठिकाणी कुत्रे तुझे रक्त; होय, तुझेच रक्त चाटतील!’ ”
20अहाब एलीयाहला म्हणाला, “हे माझ्या वैर्‍या, शेवटी तू मला शोधलेच!”
तो म्हणाला, “मी तुला शोधलेच, कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास तू स्वतःस विकून टाकले आहेस. 21याहवेह म्हणतात, ‘मी तुझ्यावर अरिष्ट आणणार आहे. मी तुझी संतती नष्ट करून टाकीन व इस्राएलात अहाबाच्या कुटुंबातून प्रत्येक शेवटचा पुरुष; तो गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, तो मी उपटून टाकीन. 22मी तुझ्या कुटुंबाचे नेबाटाचा पुत्र यरोबोअम व अहीयाहचा पुत्र बाशा यांच्याप्रमाणे करेन, कारण तू माझा क्रोध भडकविला आहेस आणि इस्राएलास पाप करण्यास भाग पाडले आहे.’
23“आणि ईजबेलविषयी याहवेह म्हणतात: ‘येज्रीलच्या भिंतीजवळ#21:23 काही मूळ प्रतींनुसार तिच्या भूमीवर ईजबेलला कुत्रे खातील.’
24“अहाबाच्या संबंधातील लोक जे शहरात मरतील त्यांना कुत्रे खातील, आणि वेशीच्या बाहेर जे मरतील त्यांना आकाशातील पक्षी खातील.”
25(अहाबासारखा कोणी कधीही झाला नाही, ज्याने आपली पत्नी ईजबेल हिच्या सांगण्यानुसार, याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास स्वतःला विकून टाकले. 26याहवेहने इस्राएली लोकांच्या पुढून घालवून दिलेल्या अमोरी लोकांप्रमाणे त्याने मूर्तींच्या मागे लागून अमंगळ कृत्ये केली.)
27अहाबाने जेव्हा हे शब्द ऐकले, त्याने आपली वस्त्रे फाडली व गोणपाट नेसून उपास केला. तो गोणपाटात राहून दीनपणे जगू लागला.
28नंतर एलीयाह तिश्बीकडे याहवेहचे वचन आले: 29“अहाब माझ्यासमोर कसा नम्र झाला आहे हे तुला दिसते का? कारण त्याने स्वतःला नम्र केले आहे, म्हणून हे अरिष्ट मी तो जिवंत असताना आणणार नाही, परंतु ते मी त्याच्या घराण्यावर त्याच्या पुत्राच्या काळात आणेन.”

सध्या निवडलेले:

1 राजे 21: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन