1 राजे 22
22
मिखायाह अहाबाविरुध्द भविष्य सांगतो
1पुढील तीन वर्षात अराम व इस्राएलमध्ये युद्ध झाले नाही. 2पण तिसर्या वर्षी यहूदीयाचा राजा यहोशाफाट इस्राएलच्या राजाला भेटण्यास गेला. 3इस्राएलचा राजा आपल्या अधिकार्यांना म्हणाला, “रामोथ गिलआद आपलेच आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय आणि तरीही अरामाच्या राजाकडून ते परत घेण्यास आपण काहीही का करत नाही?”
4तेव्हा त्याने यहोशाफाटला विचारले, “तुम्ही माझ्याबरोबर रामोथ गिलआदविरुद्ध युद्ध करण्यासाठी जाल का?”
यहोशाफाटने इस्राएलच्या राजाला उत्तर दिले, “तुम्ही जसे आहात तसाच मी आहे आणि माझे लोक तुमचे लोक आहेत, जसे माझे घोडे तसेच ते तुमचेही घोडे आहेत.” 5परंतु यहोशाफाट इस्राएलच्या राजाला असे सुद्धा म्हणाला, “प्रथम याहवेहचा सल्ला घ्या.”
6तेव्हा इस्राएलच्या राजाने सुमारे चारशे संदेष्ट्यांना एकत्र बोलाविले आणि त्यांना विचारले, “मी रामोथ-गिलआदच्या विरुद्ध युद्धास जावे की नाही?”
ते म्हणाले, “जा, कारण प्रभू ते राजाच्या हाती देतील.”
7परंतु यहोशाफाटने विचारले, “आपण विचारावे असा याहवेहचा एकही संदेष्टा येथे नाही काय?”
8इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “ज्याच्याद्वारे आपण याहवेहचा सल्ला घेऊ शकतो असा एक संदेष्टा अजूनही आहे, परंतु तो माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही, नेहमीच वाईट संदेश देतो, म्हणून मला त्याचा तिरस्कार वाटतो. तो इम्लाहचा पुत्र मिखायाह आहे.”
यहोशाफाटने उत्तर दिले, “राजाने असे बोलू नये.”
9तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका अधिकार्याला बोलाविले व म्हटले, “लवकर जाऊन इम्लाहचा पुत्र मिखायाह याला घेऊन ये.”
10इस्राएलचा राजा आणि यहूदीयाचा राजा यहोशाफाट आपली राजवस्त्रे परिधान करून शोमरोनाच्या प्रवेशद्वाराजवळील खळ्याजवळ त्यांच्या सिंहासनांवर बसले होते आणि संदेष्टे त्यांच्यासमोर संदेश देत होते. 11तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह याने लोखंडाची शिंगे तयार केली होती आणि त्याने जाहीर केले, “याहवेह असे म्हणतात: ‘या शिंगांनी तू अरामी लोकांवर असा वार करशील की त्यांचा नाश होईल.’ ”
12इतर सर्व संदेष्टे सुद्धा तीच भविष्यवाणी करीत होते, ते म्हणाले, “रामोथ-गिलआदवर हल्ला करून विजयी हो, कारण याहवेह ते राजाच्या हाती देणार आहे.”
13जो दूत मिखायाहला बोलविण्यास गेला होता तो त्याला म्हणाला, “पाहा, सर्व संदेष्टे राजाच्या यशासंबंधी भविष्य सांगत आहेत, तुझे शब्द सुद्धा त्यांच्याशी सहमत होऊ दे आणि राजाच्या बाजूने चांगले बोल.”
14पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.”
15तो जेव्हा आला, तेव्हा राजाने त्याला विचारले, “मिखायाह, आम्ही रामोथ गिलआदविरुद्ध युद्धास जावे किंवा नाही?”
त्याने उत्तर दिले, “हल्ला करून विजयी व्हा, कारण याहवेह ते राजाच्या हाती देईल.”
16राजाने त्याला म्हटले, “मी तुला किती वेळा शपथ देऊन सांगावे की याहवेहच्या नावाने तू मला केवळ जे सत्य तेच सांगावे?”
17तेव्हा मिखायाहने उत्तर दिले, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे पर्वतांवर पांगलेले आहेत असे मला दिसले आणि याहवेह म्हणाले, ‘या लोकांना धनी नाही. प्रत्येकाला शांतीने आपआपल्या घरी जाऊ दे.’ ”
18इस्राएलच्या राजाने यहोशाफाटला म्हटले, “हा माझ्याविषयी कधीही चांगला संदेश देत नाही तर वाईटच संदेश देतो असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
19मिखायाह पुढे म्हणाला, “तर आता याहवेहचे वचन ऐका: याहवेह आपल्या सिंहासनावर बसलेले आणि स्वर्गातील सर्व समुदाय त्यांच्या सभोवती डावीकडे व उजवीकडे उभा असलेला मला दिसला. 20आणि याहवेहने म्हटले, ‘अहाबाने जाऊन रामोथ-गिलआदावर हल्ला करून तिथे मरून पडावे म्हणून त्याला कोण मोह घालेल?’
“तेव्हा एकाने एक तर दुसर्याने दुसरी मसलत दिली. 21तेव्हा एक आत्मा पुढे आला आणि याहवेहपुढे उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोहात पाडेन.’
22“याहवेहने विचारले, ‘तू हे कसे करशील?’
“तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा होईन.’
“याहवेहने म्हटले, ‘तू त्याला मोहात पाडण्यास यशस्वी होशील. जा आणि तसे कर.’
23“तर आता पाहा, याहवेहने तुझ्या या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा घातला आहे. आणि तुझ्यावर अरिष्ट यावे असे याहवेह बोलले आहेत.”
24तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह उठला व मिखायाहच्या गालावर चापट मारत विचारले, “याहवेहचा आत्मा माझ्यामधून निघून तुझ्याशी बोलायला कोणत्या मार्गाने गेला?”
25मिखायाहने उत्तर दिले, “ज्या दिवशी तू घराच्या आतील खोलीत जाऊन लपशील तेव्हा तुला ते समजेल.”
26तेव्हा इस्राएलच्या राजाने आज्ञा दिली, “मिखायाहला घ्या आणि शहराचा अधिकारी आमोन व राजपुत्र योआश यांच्याकडे त्याला परत पाठवा 27आणि त्यांना सांगा, ‘राजा असे म्हणतात: या मनुष्याला तुरुंगात टाका आणि मी सुखरुप परत येईपर्यंत त्याला केवळ भाकर आणि पाणी द्या.’ ”
28तेव्हा मिखायाह म्हणाला, “तू जर सुखरुप परत आलास तर याहवेह माझ्याद्वारे बोललेच नाही असे समजावे.” तो पुढे म्हणाला, “लोकांनो, तुम्ही सर्वजण हे लक्षात ठेवा!”
रामोथ-गिलआदमध्ये अहाबाचा मृत्यू
29यानंतर इस्राएलचा राजा व यहूदीयाचा राजा यहोशाफाट हे रामोथ गिलआद येथे गेले. 30इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “मी वेश बदलून युद्धात प्रवेश करेन, परंतु तुम्ही तुमची राजवस्त्रे घाला.” म्हणून इस्राएलच्या राजा वेश बदलून युद्धात गेला.
31आता अरामाच्या राजाने आपल्या बत्तीस रथांच्या सरदारांना आज्ञा दिली होती, “इस्राएलच्या राजाशिवाय कोणत्याही लहान थोरांशी लढू नका.” 32रथांच्या सरदारांनी जेव्हा यहोशाफाटला पाहिले, तेव्हा त्यांना वाटले, “हा खचितच इस्राएलचा राजा आहे.” म्हणून ते त्याच्यावर हल्ला करण्यास वळले, पण जेव्हा यहोशाफाट मोठ्याने रडला, 33आणि रथांच्या सरदारांनी पाहिले की तो इस्राएलचा राजा नाही तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे थांबविले.
34पण कोणीतरी सहजच आपला बाण सोडला आणि तो जाऊन इस्राएलच्या राजाच्या चिलखतामधून गेला. राजाने आपल्या रथस्वाराला सांगितले, “रथ मागे फिरव आणि मला युद्धातून बाहेर काढ कारण मी घायाळ झालो आहे.” 35तो संपूर्ण दिवस युद्ध वाढत गेले आणि अराम्यांचा सामना करीत राजा रथातच राहिला. त्याच्या जखमेतून रक्त वाहत रथाच्या तळाशी साचले आणि त्या संध्याकाळी तो मरण पावला. 36सूर्य मावळत असताना, सैन्यात एकच घोषणा झाली: “प्रत्येकाने आपआपल्या नगरात जावे, प्रत्येकाने आपआपल्या देशात जावे!”
37राजा मरण पावला आणि त्याला शोमरोनात आणले व तिथे त्याला पुरण्यात आले. 38शोमरोनाच्या तळ्याकडे (जिथे वेश्या आंघोळ करीत असत),#22:38 किंवा जिथे शस्त्रे धुतली जात असे आणि याहवेहच्या वचनानुसार कुत्र्यांनी त्याचे रक्त चाटून घेतले.
39अहाबाच्या राज्याच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले, हस्तिदंताने मढविलेला जो राजवाडा त्याने बांधला, व ज्या शहरांचे तट त्याने बांधले ते सर्व इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या गेले नाही काय? 40अहाब आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याचा पुत्र अहज्याह त्याचा वारस म्हणून राजा झाला.
यहूदाचा राजा यहोशाफाट
41इस्राएलचा राजा अहाबाच्या चौथ्या वर्षी आसाचा पुत्र यहोशाफाट यहूदीयाचा राजा झाला. 42यहोशाफाट राजा झाला तेव्हा तो पस्तीस वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेमात पंचवीस वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अजुबाह होते, जी शिल्हीची कन्या होती. 43त्याने आपला पिता आसाचे सर्व मार्गात अनुसरण केले आणि त्यापासून तो वळला नाही; याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते त्याने केले. तरी त्याने डोंगरावरील उच्चस्थळे नष्ट केली नव्हती आणि लोक तिथे जाऊन यज्ञ करीत व धूप जाळीत असत. 44यहोशाफाट व इस्राएलचा राजा यांच्यात शांती होती.
45यहोशाफाटच्या राज्याच्या इतर घटना, त्याने हस्तगत केलेल्या गोष्टी, त्याचे लष्करी कार्य या सर्वांचे वर्णन यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात केलेले नाही काय? 46त्याचा पिता आसाच्या कारकिर्दीच्या नंतरही चालू असलेली मंदिरातील पुरुषगामी यातून त्याने देशाला मुक्त केले. 47त्यानंतर एदोमात राजा नव्हता; प्रांताधिकारी तेथील कारभार चालवित होता.
48ओफीर शहरातून सोने आणता यावे म्हणून यहोशाफाटने व्यापारी जहाजे#22:48 इतर मूळ प्रतींनुसार तार्शीशची गलबते बांधली होती. पण ती एजिओन-गेबेर येथे फुटली, त्यामुळे ती समुद्राची वाटचाल करू शकली नाहीत. 49तेव्हा अहाबाचा पुत्र अहज्याह यहोशाफाटला म्हणाला, “माझ्या माणसांना आपल्या माणसांबरोबर जाऊ द्या.” पण यहोशाफाटने त्यास नकार दिला.
50त्यानंतर यहोशाफाट आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याबरोबर त्याचा पिता दावीदाच्या शहरात पुरले. आणि त्याचा पुत्र यहोराम त्याचा वारस म्हणून राजा झाला.
इस्राएलचा राजा अहज्याह
51यहूदीयाचा राजा यहोशाफाटच्या राज्याच्या सतराव्या वर्षी अहाबाचा पुत्र अहज्याह हा शोमरोनात इस्राएलचा राजा झाला आणि त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले. 52याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण त्याने ज्यांनी इस्राएलास पाप करावयाला भाग पाडले असा आपला पिता, आई व नेबाटाचा पुत्र यरोबोअम त्यांचे अनुसरण केले. 53त्याने बआलची सेवा व उपासना केली आणि आपल्या पित्याप्रमाणे याहवेह इस्राएलच्या परमेश्वराचा क्रोध भडकविला.
सध्या निवडलेले:
1 राजे 22: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.