1 राजे 19
19
एलीयाह होरेबला पळून जातो
1एलीयाहने जे काही केले आणि त्याने बआलाच्या सर्व संदेष्ट्यांना तलवारीने कसे मारून टाकले ते अहाबाने ईजबेलला सांगितले. 2तेव्हा ईजबेलने एलीयाहकडे असे म्हणत एक दूत पाठवला, “उद्या या वेळेपर्यंत मी त्यांच्यातील एकाप्रमाणे तुझ्या जिवाचे केले नाही तर देव माझे त्याहूनही अधिक वाईट करो.”
3एलीयाह घाबरून आपला जीव घेऊन पळून गेला. जेव्हा तो यहूदीया प्रांतातील बेअर-शेबा नगरात आला, त्याने आपल्या सेवकाला तिथे सोडले, 4तो स्वतः एक दिवसाचा प्रवास करीत रानात गेला, तो रतामाच्या झुडूपाखाली आला आणि मरून जावे म्हणून तिथे बसून प्रार्थना केली. “हे याहवेह आता पुरे आहे, माझा प्राण घ्या, मी माझ्या पूर्वजांपेक्षा चांगला आहे असे नाही.” 5नंतर तो त्या रतामाच्या झुडूपाखाली पडून झोपी गेला.
अचानक परमेश्वराच्या दूताने येऊन त्याला स्पर्श करीत म्हटले, “ऊठ आणि खा.” 6त्याने सभोवती पाहिले, आणि त्याच्या उशाशी निखार्यावर भाजलेल्या काही भाकरी आणि पाण्याचे एक भांडे ठेवलेले होते. तो भाकर खाऊन पाणी प्याला आणि पुन्हा झोपी गेला.
7याहवेहचा दूत परत दुसर्यांदा त्याच्याकडे आला आणि त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ आणि खा, कारण तुला फार लांबचा प्रवास करावयाचा आहे.” 8तेव्हा त्याने उठून अन्नपाणी घेतले. त्या अन्नाच्या शक्तीवर चाळीस दिवस व चाळीस रात्री प्रवास करीत होरेब, तो परमेश्वराच्या डोंगराकडे पोहोचला. 9तिथे तो गुहेत जाऊन रात्रभर तिथेच राहिला.
एलीयाहला याहवेहचे दर्शन
आणि याहवेहचे वचन त्याच्याकडे आले: “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?”
10एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
11याहवेहने त्याला म्हटले, “बाहेर जा आणि याहवेहच्या उपस्थितीत डोंगरावर उभा राहा, कारण याहवेह तिथून जाणार आहेत.”
तेव्हा मोठ्या व शक्तिशाली वार्याने डोंगर याहवेहसमोर दुभागले आणि खडक फोडले, परंतु याहवेह त्या वार्यात नव्हते. त्या वार्यानंतर भूमिकंप झाला, परंतु याहवेह त्या भूमिकंपात देखील नव्हते. 12भूमिकंपानंतर अग्नी आला, परंतु त्या अग्नीतही याहवेह नव्हते. आणि त्या अग्नीनंतर एक शांत वाणी झाली. 13जेव्हा एलीयाहने ही वाणी ऐकली, त्याने आपल्या झग्याने आपला चेहरा झाकून घेतला आणि बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी जाऊन उभा राहिला.
मग ती वाणी त्याला म्हणाली, “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?”
14एलीयाह म्हणाला, “सर्वसमर्थ याहवेह परमेश्वरासाठी मी फार ईर्ष्यावान आहे. इस्राएली लोकांनी आपला करार नाकारला आहे, आपल्या वेद्या फोडल्या आहेत आणि आपल्या संदेष्ट्यांना तलवारीने मारून टाकले आहे. मी एकटाच उरलो आहे आणि आता ते मलाही मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
15याहवेहने त्याला म्हटले, “तू आलास त्या मार्गाने परत दिमिष्काच्या वाळवंटाकडे जा. आणि तिथे जाशील तेव्हा हजाएलचा अरामचा राजा म्हणून अभिषेक कर. 16आणि निमशीचा पुत्र येहूचा सुद्धा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक कर व आबेल-महोलाह येथील शाफाटचा पुत्र अलीशाचा तुझा वारस म्हणून संदेष्टा होण्यास अभिषेक कर. 17हजाएलच्या तलवारीपासून जो कोणी निसटेल त्याला येहू मारून टाकेल आणि जे येहूच्या तलवारीपासून निसटतील त्यांना अलीशा जिवे मारेल. 18तथापि बआलच्या पुढे गुडघे टेकले नाहीत किंवा आपल्या मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही, असे सात हजार लोक मी इस्राएलात राखून ठेवले आहेत.”
अलीशाला पाचारण
19म्हणून एलीयाह तिथून निघाला आणि त्याला शाफाटचा पुत्र अलीशा दिसला. नांगराला बारा बैल जुंपून तो नांगरणी करीत होता आणि तो स्वतः बाराव्या बैलाच्या जोडीवर होता. एलीयाह त्याच्याकडे गेला व आपला झगा त्याच्यावर टाकला. 20तेव्हा अलीशाने आपले बैल सोडले आणि एलीयाहच्या मागे धावून गेला. तो म्हणाला, “मला माझ्या आईपित्याचे चुंबन घेऊ दे, मग मी आपल्याबरोबर येईन.”
एलीयाहने उत्तर दिले, “परत जा, मी तुला काय केले?”
21तेव्हा अलीशा त्याच्यापासून निघून परतला. त्याने आपल्या बैलाची एक जोडी घेतली आणि ती कापली. त्याने नांगरणीची साधने पेटवून त्यावर मांस शिजविले आणि लोकांना दिले आणि त्यांनी ते खाल्ले. मग तो एलीयाहचा अनुयायी होण्यास निघाला आणि त्याचा सेवक झाला.
सध्या निवडलेले:
1 राजे 19: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.