YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 18

18
एलीयाह आणि ओबद्याह
1काही काळानंतर, म्हणजे तिसऱ्या वर्षी याहवेहचे वचन एलीयाहकडे आले: “जा आणि अहाबाच्या समोर हजर हो, आणि मी देशावर पाऊस पाठवेन.” 2म्हणून एलीयाह अहाबासमोर हजर झाला.
याकाळात शोमरोनामध्ये अतिशय तीव्र दुष्काळ पडला होता, 3आणि अहाबाने आपल्या राजवाड्याचा कारभारी ओबद्याहला बोलाविले. (ओबद्याह याहवेहचे फार भय बाळगणारा होता. 4जेव्हा ईजबेल याहवेहच्या संदेष्ट्यांना मारून टाकत होती, तेव्हा ओबद्याहने शंभर संदेष्ट्यांना प्रत्येकी पन्नास असे दोन गुहांमध्ये लपविले होते, आणि त्यांना अन्नपाणी पुरविले.) 5अहाबाने ओबद्याहला म्हटले, “देशातील सर्व झरे व ओढे शोध, घोडे व खेचरे जिवंत राहावे म्हणून कदाचित आपल्याला थोडे गवत मिळेल म्हणजे आपल्याला त्यांना मारून टाकावे लागणार नाही.” 6मग ज्या प्रदेशात फिरायचे आहे त्या भागाचे त्यांनी दोन भाग केले, अहाब एका दिशेने जाणार व ओबद्याह दुसर्‍या बाजूने.
7ओबद्याह वाटेने चालत असता, त्याला एलीयाह भेटला. ओबद्याहने त्याला ओळखले व जमिनीकडे लवून त्याला दंडवत घालत म्हटले, “माझे स्वामी, एलीयाह ते आपणच आहात काय?”
8एलीयाह म्हणाला, “होय, जा, तुझ्या धन्याला सांग एलीयाह येथे आहे.”
9तेव्हा ओबद्याहने विचारले, “माझ्याकडून अशी कोणती चूक झाली आहे, की तुम्ही आपल्या सेवकाला मारून टाकावे म्हणून अहाबाच्या स्वाधीन करीत आहात? 10याहवेह, आपल्या जिवंत परमेश्वराची शपथ, आपला शोध करण्यासाठी माझ्या धन्याने लोक पाठवले नाही असा एकही देश किंवा राज्य नाही. आणि त्या देशात किंवा राज्यात एलीयाह नाही असे कोणी सांगितले, तर एलीयाह त्यांना सापडला नाही असे त्यांना शपथ घेऊन सांगावे लागत असे. 11परंतु आता आपण मला सांगता त्याला जाऊन सांग, ‘एलीयाह येथे आहे.’ 12मी तुम्हाला सोडून गेल्यावर याहवेहचा आत्मा तुम्हाला कुठे घेऊन जाईल हे मला ठाऊक नाही. पण जर मी जाऊन अहाबाला सांगितले आणि त्याला तुम्ही सापडला नाही, तर तो मला मारून टाकील. मी तर आपला सेवक, माझ्या बालपणापासून याहवेहची उपासना करीत आलो आहे. 13ईजबेल राणी प्रभूच्या संदेष्ट्यांना मारत होती तेव्हा मी काय केले हे तुम्ही ऐकले नाही काय? एका गुहेत पन्नास असे शंभर याहवेहच्या संदेष्ट्यांना मी दोन गुहांमध्ये लपविले आणि त्यांना अन्नपाणी पुरविले. 14आणि आता तुम्ही मला म्हणता, जाऊन माझ्या धन्याला मी सांगावे, ‘एलीयाह येथे आहे,’ तो मला मारून टाकील!”
15एलीयाह म्हणाला, “ज्या सर्वसमर्थ याहवेहची मी सेवा करतो त्या जिवंत परमेश्वराची शपथ, आज मी खचितच अहाबासमोर हजर होईन.”
एलीयाह कर्मेल पर्वतावर जातो
16तेव्हा ओबद्याह अहाबाला भेटायला गेला आणि त्याला सांगितले आणि अहाब एलीयाहला भेटायला गेला. 17एलीयाहला पाहताच अहाब म्हणाला, “इस्राएलची छळणूक करणारा तो तूच आहेस काय?”
18एलीयाहने उत्तर दिले, “इस्राएलला छळणारा मी नाही, तर तू व तुझ्या पित्याचे घराणे आहे. तुम्ही याहवेहच्या आज्ञा पाळण्याचे सोडून बआलाचे अनुसरण केले आहे. 19आता सर्व इस्राएली लोकांना माझ्यासमोर कर्मेल डोंगरावर बोलावून घे. आणि जे ईजबेलच्या मेजावर भोजन करतात असे बआलाचे चारशे पन्नास संदेष्टे व अशेराचे चारशे संदेष्टे, त्यांनाही बोलावून घे.”
20म्हणून अहाबाने सर्व इस्राएली लोकांना बोलाविणे पाठवले आणि संदेष्ट्यांना कर्मेल डोंगरावर जमविले. 21एलीयाह लोकांच्या समोर जाऊन म्हणाला, “दोन मतांमध्ये तुम्ही कुठवर डगमगत राहणार? जर याहवेह हेच परमेश्वर आहे तर त्यांचे अनुसरण करा; परंतु जर बआल परमेश्वर आहे तर त्याला अनुसरा.”
परंतु लोक काही बोलले नाही.
22मग एलीयाह त्यांना म्हणाला, “याहवेहचा संदेष्टा म्हणून मी एकटाच उरलो आहे, परंतु बआलाचे तर चारशे पन्नास संदेष्टे आहेत. 23आमच्यासाठी दोन बैल आणा. त्यातील एक बआलच्या संदेष्ट्यांनी त्यांच्यासाठी निवडावा आणि त्याचे तुकडे कापून ते लाकडांवर ठेवावे परंतु त्याला अग्नी लावू नये. मी दुसरा बैल तयार करेन आणि लाकडांवर ठेवेन आणि ते पेटविणार नाही. 24मग तुम्ही तुमच्या देवाचा धावा करा, आणि मी माझ्या याहवेहचा धावा करेन. मग जो देव अग्नीद्वारे उत्तर देईल; तोच खरा परमेश्वर.”
मग लोक म्हणाले, “तू जे बोलतो ते बरोबर आहे.”
25एलीयाह बआलच्या संदेष्ट्यांना म्हणाला, “प्रथम तुम्ही बैल निवडून घ्या आणि तो तयार करा, कारण तुम्ही संख्येने अधिक आहात. तुमच्या देवाचा धावा करा, परंतु अग्नी लावू नये.” 26म्हणून त्यांना दिलेला बैल घेऊन त्यांनी तयार केला.
मग त्यांनी सकाळपासून मध्यान्हापर्यंत बआलच्या नावाचा धावा केला. आणि ओरडत म्हणाले, “हे बआला, आम्हाला उत्तर दे!” परंतु काही प्रत्युत्तर आले नाही; कोणीही उत्तर दिले नाही. आणि जी वेदी त्यांनी केली होती त्याभोवती ते नाचत होते.
27मध्यान्हाच्या वेळी एलीयाह त्यांची थट्टा करीत म्हणू लागला, “अधिक मोठ्याने ओरडा, खचित तो देव आहे! कदाचित तो विचारात गढून गेला असेल किंवा व्यस्त किंवा प्रवास करीत असेल किंवा झोपला असेल आणि त्याला जागे केले पाहिजे.” 28म्हणून ते मोठ्याने ओरडू लागले आणि त्यांच्या प्रथेप्रमाणे तलवारी व भाल्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत स्वतःला घाव करू लागले. 29दुपार सरून गेली आणि संध्याकाळच्या यज्ञाच्या वेळेपर्यंत ते अजूनही वेड्यासारखे भविष्यवाणी करीत होते. परंतु काहीही प्रत्युत्तर आले नाही, कोणी काही बोलले नाही, कोणी लक्ष दिले नाही.
30तेव्हा एलीयाह सर्व लोकांना म्हणाला, “माझ्याजवळ या.” ते त्याच्याकडे आले आणि त्याने याहवेहची जी वेदी मोडून गेली होती ती दुरुस्त केली. 31“तुझे नाव इस्राएल असणार” असे याहवेहने ज्या याकोबाला म्हटले होते त्याच्या वंशजांच्या बारा गोत्रांइतके एलीयाहने बारा धोंडे घेतले. 32त्या धोंड्यांनी त्याने याहवेहच्या नावाने वेदी बांधली आणि वेदीभोवती दोन सिआह#18:32 सुमारे 11 कि.ग्रॅ. बीज मावेल इतकी मोठी खळगी खणली. 33त्याने लाकडे रचली, बैल कापून त्याचे तुकडे केले आणि त्या लाकडांवर रचले. मग तो त्यांना म्हणाला, “चार मोठ्या घागरी पाण्याने भरा आणि ते यज्ञावर व लाकडांवर ओता.”
34तो म्हणाला, “पुन्हा असेच करा.” आणि त्यांनी पुन्हा केले.
त्याने आदेश दिला, “तिसर्‍यांदा असेच करा,” आणि त्यांनी तिसर्‍यांदाही होमार्पणावर पाणी टाकले. 35पाणी वेदीवरून खाली वाहू लागले आणि खळगी सुद्धा पाण्याने भरली.
36यज्ञाच्या वेळी, एलीयाह संदेष्टा पुढे आला आणि त्याने प्रार्थना केली: “हे याहवेह, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलच्या परमेश्वरा, आज हे जाहीर होवो की इस्राएलमध्ये केवळ तुम्हीच परमेश्वर आहात आणि मी तुमचा सेवक असून या सर्व गोष्टी मी आपल्या आज्ञेनुसार केल्या आहेत. 37मला उत्तर द्या, हे याहवेह, मला उत्तर द्या, म्हणजे या लोकांना समजेल, याहवेह, तुम्हीच परमेश्वर आहे आणि आपणच त्यांची मने परत वळवित आहात.”
38तेव्हा याहवेहचा अग्नी आला आणि होमार्पण, लाकडे, धोंडे आणि माती भस्म करून टाकली आणि खळग्यातील पाणी चाटून टाकले.
39जेव्हा सर्व लोकांनी हे पाहिले, तेव्हा ते पालथे पडून रडू लागले, “याहवेह हेच परमेश्वर आहे! याहवेह हेच परमेश्वर आहे!”
40मग एलीयाहने त्यांना आज्ञा दिली, “बआलच्या संदेष्ट्यांना पकडा, कोणालाही जाऊ देऊ नका!” तेव्हा त्यांनी पकडले आणि एलीयाहने त्यांना खाली किशोन ओहळाकडे नेऊन त्यांचा वध केला.
41आणि एलीयाहने अहाबास म्हटले, “जा, खा व पी, कारण मला मुसळधार पावसाचा आवाज येत आहे.” 42म्हणून अहाब खाण्यापिण्यास गेला, परंतु एलीयाह कर्मेल डोंगराच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले.
43तो आपल्या सेवकास म्हणाला, “जा आणि समुद्राकडे दृष्टी लाव.” तेव्हा तो गेला आणि त्याने पाहिले.
तो म्हणाला, “काही दिसत नाही.”
सात वेळा एलीयाह म्हणाला, “परत जा.”
44सातव्या वेळेस सेवकाने सांगितले, “मनुष्याच्या हाताएवढा लहानसा ढग समुद्रातून वर येत आहे.”
एलीयाह म्हणाला, “जा आणि अहाबाला सांग, ‘पावसाने तुला थांबविण्याआधी, रथ जुंपून खाली जा.’ ”
45थोड्याच वेळात, आकाश काळ्या ढगांनी भरले, वारा वाहू लागला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आणि अहाब रथात बसून येज्रील येथे निघाला. 46याहवेहचे सामर्थ्य एलीयाहवर आले आणि तो आपली कंबर बांधून अहाबापुढे येज्रीलपर्यंत धावत गेला.

सध्या निवडलेले:

1 राजे 18: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन