YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 राजे 17

17
एलीयाहद्वारे मोठ्या दुष्काळाची घोषणा
1गिलआद येथील तिश्बे नगरातील उपरी म्हणून राहणाऱ्यापैकी एलीयाह#17:1 एलीयाह मूळ प्रतीमध्ये बहुतेक ठिकाणी हे नाव एलीयाहू असे लिहिलेले आहे तिश्बे अहाबाला म्हणाला, “याहवेह, इस्राएलचे जिवंत परमेश्वर ज्यांची मी सेवा करतो त्यांची शपथ, मी सांगितल्याशिवाय येणार्‍या काही वर्षांमध्ये दहिवर किंवा पाऊस पडणार नाही.”
कावळ्यांद्वारे एलीयाहचे पोषण
2तेव्हा याहवेहचे वचन एलीयाहकडे आले: 3“येथून निघून पूर्वेकडे जा आणि यार्देनेच्या पूर्वेस केरीथ ओहळाकडे लपून राहा. 4त्या ओहळाचे पाणी तू पी आणि तुला अन्न पुरवावे म्हणून मी कावळ्यांना आज्ञा दिली आहे.”
5म्हणून याहवेहने त्याला जे सांगितले त्याप्रमाणे त्याने केले. तो पूर्वेला यार्देनेच्या केरीथ ओहळाकडे जाऊन तिथे राहिला. 6सकाळी आणि संध्याकाळी कावळे त्याच्यासाठी भाकर आणि मांस आणून देत असत आणि तो त्या ओहळाचे पाणी पीत असे.
एलीया आणि सारेफथची विधवा
7काही काळानंतर ओहोळ आटून गेला, कारण देशात पाऊस नव्हता. 8मग याहवेहचे वचन एलीयाहकडे आले: 9“सीदोनजवळच्या सारेफथ नगराकडे जा आणि तिथे राहा. तिथे मी एका विधवेला आज्ञा दिली आहे की तिने तुला अन्नपुरवठा करावा.” 10तेव्हा तो सारेफथला गेला. जेव्हा तो नगराच्या वेशीजवळ आला, तेव्हा काटक्या गोळा करीत असलेली एक विधवा तिथे होती. त्याने तिला बोलावून विचारले, “एका भांड्यात मला पिण्यासाठी पाणी आणशील काय?” 11ती पाणी आणायला जात असताना, त्याने तिला आवाज देऊन म्हटले, “आणि कृपया येताना माझ्यासाठी भाकरीचा एक तुकडा घेऊन ये.”
12ती म्हणाली, “याहवेह तुझ्या जिवंत परमेश्वराची शपथ, माझ्याकडे भाकर नाही; केवळ मूठभर पीठ व कुपीत थोडे जैतुनाचे तेल आहे. मी काही काटक्या गोळा करीत आहे, म्हणजे मी घरी जाऊन माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी भोजन बनवीन व आम्ही ते खाऊ व मरून जाऊ.”
13एलीयाह तिला म्हणाला, “भिऊ नकोस. घरी जा आणि तू म्हटल्याप्रमाणे कर. परंतु तुझ्याजवळ जे आहे त्यातून प्रथम माझ्यासाठी एक लहान भाकर बनव आणि माझ्याकडे आण आणि मग तुझ्यासाठी व तुझ्या मुलासाठी बनव. 14कारण याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘याहवेह देशात पाऊस पाठवेपर्यंत, तुझ्या भांड्यातील पीठ संपणार नाही आणि तुझी तेलाची कुपी कोरडी होणार नाही.’ ”
15ती गेली आणि एलीयाहने तिला सांगितल्याप्रमाणे केले, म्हणून एलीयाह, आणि ती स्त्री व तिचे कुटुंब यांच्यासाठी रोज भोजन मिळत असे. 16एलीयाहद्वारे दिलेल्या याहवेहच्या वचनानुसार भांड्यातील पीठ संपले नाही आणि तेलाची कुपी कोरडी झाली नाही.
17काही काळानंतर जी घर मालकीण स्त्री होती तिचा मुलगा आजारी पडला. त्याचा आजार वाढतच गेला आणि त्याचा श्वास थांबला. 18ती एलीयाहला म्हणाली, “अहो परमेश्वराच्या मनुष्या, तुम्ही माझ्याविरुद्ध आहात काय? माझ्या पापाची मला आठवण करून द्यायला व माझ्या मुलाला मारून टाकण्यास आला आहात काय?”
19एलीयाह म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” त्याने त्याला तिच्या हातून घेतले आणि माडीवरील खोलीत जिथे तो राहत होता तिथे नेऊन आपल्या बिछान्यावर ठेवले. 20मग त्याने याहवेहचा धावा करीत म्हटले, “याहवेह, माझ्या परमेश्वरा, मी या विधवेच्या घरात राहत आहे, तिच्या मुलाला मारून आपण तिच्यावर अरिष्ट आणले काय?” 21मग त्याने तीन वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि याहवेहकडे आरोळी केली, “याहवेह, माझ्या परमेश्वरा, या मुलाचा जीव पुन्हा त्याच्यात येऊ द्यावा!”
22याहवेहने एलीयाहची प्रार्थना ऐकली, आणि त्या मुलाचा जीव त्याच्यात परत आला आणि तो जिवंत झाला. 23मग एलीयाहने मुलाला उचलून त्या खोलीतून खाली आणले. त्याने त्याला त्याच्या आईच्या हाती दिले आणि म्हटले, “पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे!”
24तेव्हा ती स्त्री एलीयाहला म्हणाली, “आता मला ठाऊक झाले की आपण परमेश्वराचे मनुष्य आहात आणि आपल्या मुखातील याहवेहचे वचन सत्य आहे.”

सध्या निवडलेले:

1 राजे 17: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन