YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 इतिहास 10

10
शौल स्वतःचा प्राणत्याग करतो
1पलिष्ट्यांनी इस्राएलविरुद्ध युद्ध केले; इस्राएली लोक त्यांच्यापुढून पळून गेले, आणि गिलबोआ डोंगरावर पुष्कळजण मारले गेले. 2पलिष्ट्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचा आवेशाने पाठलाग केला आणि त्याचे पुत्र योनाथान, अबीनादाब आणि मलकी-शुआ यांना ठार मारले. 3शौलाच्या सर्व बाजूंनी युद्ध भयंकर वाढत गेले आणि जेव्हा धनुर्धऱ्यांनी त्याला गाठले व त्याला जखमी केले.
4तेव्हा शौल त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला आरपार भोसक, नाहीतर हे बेसुंती लोक येऊन माझी विटंबना करतील.”
परंतु त्याचा शस्त्रवाहक घाबरून गेला होता आणि तो तसे करेना; तेव्हा शौलाने त्याची स्वतःची तलवार घेतली आणि तिच्यावर तो पडला. 5जेव्हा शस्त्रवाहकाने पाहिले की शौल मरण पावला आहे, तेव्हा तो सुद्धा आपल्या तलवारीवर पडला आणि मरण पावला. 6अशाप्रकारे शौल आणि त्याचे तीन पुत्र मरण पावले, त्याचे सर्व कुटुंब एकत्रच मृत्यू पावले.
7जेव्हा खोर्‍यात असलेल्या इस्राएली लोकांनी पाहिले की सैन्याने पळ काढला आहे आणि शौल आणि त्याचे पुत्र मरण पावले आहेत, तेव्हा त्यांनी त्यांची नगरे सोडली आणि तिथून पलायन केले. पलिष्ट्यांनी येऊन तिथे वस्ती केली.
8दुसर्‍या दिवशी जेव्हा पलिष्टी लोक मेलेल्या लोकांच्या वस्तू लुटण्यासाठी आले, तेव्हा त्यांना गिलबोआ डोंगरावर शौल आणि त्याचे पुत्र मृत होऊन पडलेले दिसले. 9त्यांनी शौलास लुबाडून, त्याचे शिर व त्याचे शस्त्र काढून घेतले आणि पलिष्ट्यांच्या संपूर्ण देशामध्ये आणि त्यांच्या मूर्तींमध्ये आणि आणि त्यांच्या लोकांमध्ये जाहीर करण्यास संदेशवाहक पाठवले. 10त्यांनी त्याची शस्त्रे त्यांच्या दैवतांच्या मंदिरात ठेवली आणि त्याचे शिर दागोनाच्या मंदिरात टांगले.
11पलिष्टी लोकांनी शौलाचे काय केले हे जेव्हा याबेश-गिलआदच्या रहिवाशांनी ऐकले, 12तेव्हा त्यांचे सर्व शूर पुरुष रणांगणावर गेले व त्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचे मृतदेह याबेश येथे परत आणले. त्यांच्या अस्थी याबेश येथील एला झाडाखाली पुरल्या आणि सात दिवस उपास केला.
13याहवेहशी अविश्वासू राहिल्यामुळे शौलाला मृत्यू आला; कारण त्याने याहवेहची आज्ञा न पाळता, एका भूतविद्याप्रवीण स्त्रीचा सल्ला घेतला, 14आणि याहवेहचे मार्गदर्शन नाकारले, यामुळे याहवेहने त्याचा वध केला आणि त्याचे राज्य इशायाचा पुत्र दावीदास सोपविले.

सध्या निवडलेले:

1 इतिहास 10: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन