YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 8:40-48

लूक 8:40-48 MACLBSI

नंतर येशू परत आला, तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले. ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पाहा, याईर नावाचा एक मनुष्य आला. तो तेथील सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. कारण त्याची सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी शेवटच्या घटका मोजत होती. येशू तेथून जात असता लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करत होता. तेथे बारा वर्षे रक्‍तस्राव होत असलेली व कोणालाही बरी करता न आलेली अशी एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या किनारीला शिवली आणि लगेच तिचा रक्‍तस्राव थांबला. येशूने विचारले, “मला स्पर्श कोणी केला?” सर्व जण “मी नाही”, असे म्हणत असता पेत्र म्हणाला, “गुरुजी, लोकसमुदाय तुम्हांला गर्दी करून घेरत आहे.” येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला कारण माझ्यातून शक्‍ती निघाली, हे मला समजले आहे.” आपली कृती निदर्शनास आली आहे, हे पाहून ती स्त्री थरथर कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणाकरिता येशूला स्पर्श केला व कसे तत्काळ बरे झालो, हे सर्व तिने लोकांपुढे निवेदन केले. तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा.”

लूक 8 वाचा

ऐका लूक 8