लूक 8
8
येशूची सेवा करणाऱ्या स्त्रिया
1येशू प्रबोधन करीत व देवाच्या राज्याचे शुभवर्तमान जाहीर करीत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता. त्याच्याबरोबर बारा प्रेषित 2आणि दुष्ट आत्मे व विकार ह्यांपासून मुक्त केलेल्या कित्येक स्त्रिया, म्हणजेच जिच्यातून सात भुते काढण्यात आली होती ती मग्दालिया म्हटलेली मरिया 3आणि हेरोदचा कारभारी च्युजा ह्याची पत्नी योहान्ना, तसेच सुसान्ना व इतर पुष्कळ स्त्रिया होत्या. त्या आपल्या साधनसंपत्तीने त्यांची सेवा करीत असत.
पेरणी करणाऱ्याचा दाखला
4एकदा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला असता व नगरोनगरीचे लोक त्याच्याजवळ आले असता येशू दाखला देऊन म्हणाला,
5“पेरणारा बी पेरायला निघाला. तो पेरीत असताना काही बी वाटेवर पडले. ते तुडवले गेले व आकाशातील पक्ष्यांनी खाऊन टाकले. 6काही खडकाळ जमिनीवर पडले. ओलावा नसल्यामुळे ते उगवताच वाळून गेले. 7काही काटेरी झुडुपांमध्ये पडले. काटेरी झुडुपांच्या वाढीमुळे त्यांची वाढ खुंटली. 8काही चांगल्या जमिनीत पडले. ते उगवून शंभरपट पीक आले.” त्यांना हे सांगून झाल्यावर त्याने आवाहन केले, “ज्याला ऐकायला कान आहेत, त्याने ऐकावे.”
9त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “ह्या दाखल्याचा अर्थ काय?” 10तो म्हणाला, “देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याची देणगी तुम्हांला दिली आहे. परंतु इतरांबरोबर मी दाखले देऊन बोललो ते अशासाठी की, ते पहात असता त्यांना दिसू नये व ऐकत असता त्यांना समजू नये.
दाखल्याची उकल
11हा दाखला असा आहे:बी हे देवाचे वचन आहे. 12वाटेवर पडलेले बी म्हणजे जे ऐकतात परंतु सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणांतून वचन काढून घेतो आणि त्यांना विश्वास ठेवण्यापासून व तारणप्राप्ती करून घेण्यापासून वंचित करतो. 13खडकाळ जमिनीवर पडलेले बी म्हणजे जे ऐकतात व आनंदाने वचन ग्रहण करतात, पण त्यांना मूळ नसते. ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात पण कसोटीच्या वेळी बहकून जातात. 14काटेरी झुडुपांमध्ये पडलेले बी म्हणजे जे ऐकतात पण संसाराच्या चिंता, धनदौलत व ऐहिक सुख ह्यांत आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते व त्यांच्या जीवनात परिपक्व फळ दिसत नाही. 15चांगल्या मातीत पडलेले बी म्हणजे जे वचन ऐकून ते सालस व शुद्ध अंतःकरणात धरून ठेवतात आणि फळ देईपर्यंत धीर धरतात.
दिव्यावरून धडा
16दिवा लावून तो कोणी भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो.
17उघडकीस येणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व प्रकट होणार नाही असे काही गुप्त नाही.
18म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा. ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, तरीही त्याला वाटते की, त्याच्याजवळ आहे, तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.”
प्रभू येशूचे नातलग
19येशूची आई व त्याचे बंधू त्याच्याकडे आले, परंतु गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना. 20त्याला सांगण्यात आले, “तुझी आई व तुझे बंधू तुला भेटण्याच्या इच्छेने बाहेर उभे आहेत.”
21त्याने त्या सर्वांना उत्तर दिले, “हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे बंधू आहेत.”
वादळवाऱ्यावर प्रभुत्व
22एकदा तो आपल्या शिष्यांसह मचव्यात गेला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ असे त्यांना म्हणाला, 23ते मचवा हाकारून पुढे जात असता येशू झोपी गेला. सरोवरात मोठे वादळ सुटून मचव्यात पाणी भरू लागले त्यामुळे ते धोक्यात होते. 24ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “गुरुवर्य, गुरुवर्य, आम्ही बुडत आहोत” तेव्हा त्याने उठून वारा व उसळलेल्या लाटा ह्यांना शांत होण्याचा हुकूम सोडला. त्यावेळी वारा व उसळलेल्या लाटा शांत होऊन सर्व निवांत झाले. 25त्याने त्यांना म्हटले, “तुमचा विश्वास कोठे आहे?” ते भयभीत व विस्मित होऊन एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण वारा व लाटा ह्यांनादेखील हा हुकूम सोडतो व ते त्याचे ऐकतात.”
गरसा प्रदेशातील भूतग्रस्त
26येशू आणि त्याचे शिष्य गालील सरोवरापलीकडील गरसा प्रदेशात येऊन पोहचले. 27तो जमिनीवर उतरल्यावर नगरातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भुतांनी पछाडले होते. बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो दफन भूमीत राहत असे. 28येशूला पाहून तो ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला विनंती करतो मला छळू नकोस.” 29कारण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याचा हुकूम सोडला होता. त्या भुताने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते. साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेला असता तो ती बंधने तोडत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे.
30येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “सैन्य”, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भुते शिरली होती. 31ती त्याला विनंती करीत होती, “आम्हांला अथांग विवरात जाण्याचा हुकूम देऊ नकोस.”
32तेथे डुकरांचा मोठा कळप डोंगरावर चरत होता, “त्यात आम्हांला जाऊ दे”, अशी त्यांनी त्याला विनंती केली. त्याने त्यांना जाऊ दिले. 33भुते त्या माणसातून निघून डुकरांत शिरली आणि तो कळप सुसाट वेगाने धावत पळत कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला.
34झालेला हा प्रकार पाहून कळप चारणारी माणसे पळाली आणि त्यानी गावात व शेतामळ्यात जाऊन हे वृत्त लोकांना सांगितले. 35जे झाले ते पाहायला लोक निघाले आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भुते निघाली होती, तो येशूच्या पायांजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर आलेला असा त्यांना आढळला. त्यांना भीती वाटली. 36ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला, हे त्यांना सांगितले. 37तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतांतील सर्व लोकांनी येशूला तेथून निघून जाण्याची विनंती केली कारण ते फार घाबरले होते. तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला. 38ज्या माणसातून भुते निघाली होती, तो त्याला विनंती करीत होता, “मला आपल्याजवळ राहू द्या.” परंतु त्याने त्याला निरोप देऊन सांगितले, 39“आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती महान कृत्ये केली ते जाहीर कर.” त्यानंतर येशूने त्याच्यासाठी जे काही केले होते, ते तो नगरभर सांगत गेला.
याईरची कन्या व रक्तस्रावी स्त्री
40नंतर येशू परत आला, तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले. ते सर्व त्याची वाट पाहत होते. 41तेव्हा पाहा, याईर नावाचा एक मनुष्य आला. तो तेथील सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. 42कारण त्याची सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी शेवटच्या घटका मोजत होती. येशू तेथून जात असता लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करत होता. 43तेथे बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली व कोणालाही बरी करता न आलेली अशी एक स्त्री 44त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या किनारीला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. 45येशूने विचारले, “मला स्पर्श कोणी केला?” सर्व जण “मी नाही”, असे म्हणत असता पेत्र म्हणाला, “गुरुजी, लोकसमुदाय तुम्हांला गर्दी करून घेरत आहे.”
46येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला कारण माझ्यातून शक्ती निघाली, हे मला समजले आहे.” 47आपली कृती निदर्शनास आली आहे, हे पाहून ती स्त्री थरथर कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणाकरिता येशूला स्पर्श केला व कसे तत्काळ बरे झालो, हे सर्व तिने लोकांपुढे निवेदन केले. 48तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा.”
49तो बोलत आहे इतक्यात अधिकाऱ्याच्या घरून निरोप घेऊन आलेला माणूस याईरला म्हणाला, “तुमची मुलगी निधन पावली आहे, आता गुरुजींना तसदी देऊ नका.”
50ते ऐकून येशू म्हणाला, “भिऊ नका, विश्वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल.”
51त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप ह्यांच्याशिवाय आपल्याबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही. 52तिच्यासाठी सर्व जण रडत व शोक करत होते. पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती निधन पावली नाही, झोपेत आहे.”
53तरीही ती मरण पावली आहे, हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. 54त्याने तिच्या हाताला धरून मोठ्याने म्हटले, “मुली, ऊठ!” 55तेव्हा ती जिवंत झाली व तत्काळ उठली. त्यानंतर तिला खायला द्यावे असे त्याने सांगितले. 56तिचे आईवडील आश्चर्यचकित झाले, पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.
सध्या निवडलेले:
लूक 8: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.