लूक 8:40-48
लूक 8:40-48 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले; कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणीएक मनुष्य आला; तो सभास्थानाचा अधिकारी होता; त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. कारण त्याला सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करत होता. तेव्हा बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली (जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती) व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. पण येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?” तेव्हा सर्व जण ‘मी नाही’ असे म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, “गुरूजी, लोकसमुदाय तुम्हांला दाटी करून चेंगरत आहेत! अन् तुम्ही म्हणता कोणी मला स्पर्श केला?” पण येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे.” मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणाकरता त्याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले. तेव्हा तो तिला म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा.”
लूक 8:40-48 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नंतर येशू परत आल्यावर समुदायाने त्यास आनंदाने अंगीकारले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणी मनुष्य आला; तो तर सभास्थानाचा अधिकारी होता; आणि त्याने येशूच्या पाया पडून, तू माझ्या घरी यावे, अशी त्यास विनंती केली. कारण त्यास सुमारे बारा वर्षाची एकुलती एक मुलगी होती व ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याजवळ दाटी करीत होते. आणि बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणीएक स्त्री, जी (आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून) कोणाकडूनही निरोगी होईना, तिने त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श केला आणि लागलीच तिचा रक्तस्राव बंद झाला. मग येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?” तेव्हा सर्वजण नाकारीत असता पेत्र व जे त्याच्याबरोबर होते ते त्यास म्हणाले, हे गुरूजी, समुदाय दाटी करून तुम्हास चेंगरीत आहेत. तेव्हा येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले हे मला समजले.” मग ती स्त्री, आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून, थरथर कांपत आली आणि त्याच्यापुढे उपडी पडून आपण कोणत्या कारणासाठी स्पर्श केला व लागलीच आपण कसे बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या देखत सांगितले. तेव्हा त्याने तिला म्हटले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. शांतीने जा.”
लूक 8:40-48 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जेव्हा येशू परतल्यावर, लोकांनी त्यांचे स्वागत केले, कारण ते त्यांची वाटच पाहत होते. इतक्यात याईर नावाचा एक सभागृहाचा पुढारी आला, त्याने येशूंच्या पाया पडून, त्यांनी आपल्या घरी यावे अशी आग्रहपूर्वक विनंती केली. कारण त्याची बारा वर्षाची एकुलती एक मुलगी मरणाच्या पंथाला लागली होती. येशू वाटेवर असताना, लोकांच्या गर्दीने त्यांना जणू काय चेंगरून टाकले. आणि तेथे अशी एक स्त्री होती जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती, परंतु कोणीही तिला बरे करू शकले नव्हते. ती येशूंच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला शिवली आणि तत्क्षणी तिचा रक्तस्राव थांबला. तेव्हा येशूंनी विचारले, “मला कोणी स्पर्श केला?” जेव्हा प्रत्येकाने ते नाकारले, पेत्र म्हणाला, “गुरुजी, लोक तुमच्याभोवती गर्दी करून तुमच्याकडे रेटले जात आहेत.” परंतु येशू म्हणाले, “कोणीतरी मला स्पर्श केला आहे. मला माहीत आहे माझ्यामधून शक्ती बाहेर पडली आहे.” मग आपण गुप्त राहिलो नाही, असे पाहून ती स्त्री थरथर कापत पुढे आली आणि त्यांच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणास्तव येशूंना स्पर्श केला व कसे तत्काळ बरे झालो, हे तिने सर्व लोकांसमक्ष सांगितले. येशू तिला म्हणाले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा.”
लूक 8:40-48 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर येशू परत आला, तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले. ते सर्व त्याची वाट पाहत होते. तेव्हा पाहा, याईर नावाचा एक मनुष्य आला. तो तेथील सभास्थानाचा अधिकारी होता. त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली. कारण त्याची सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी शेवटच्या घटका मोजत होती. येशू तेथून जात असता लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करत होता. तेथे बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली व कोणालाही बरी करता न आलेली अशी एक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या किनारीला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला. येशूने विचारले, “मला स्पर्श कोणी केला?” सर्व जण “मी नाही”, असे म्हणत असता पेत्र म्हणाला, “गुरुजी, लोकसमुदाय तुम्हांला गर्दी करून घेरत आहे.” येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला कारण माझ्यातून शक्ती निघाली, हे मला समजले आहे.” आपली कृती निदर्शनास आली आहे, हे पाहून ती स्त्री थरथर कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणाकरिता येशूला स्पर्श केला व कसे तत्काळ बरे झालो, हे सर्व तिने लोकांपुढे निवेदन केले. तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा.”