YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान 4:7-21

1 योहान 4:7-21 MACLBSI

प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवाकडून येते. जो कोणी प्रीती करतो, तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे. देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले आहे, ह्यासाठी की, त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे, ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच:आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हांवर प्रीती केली आणि तुम्हाआम्हांला पापांची क्षमा मिळावी म्हणून त्याच्या पुत्राला पाठविले. प्रियजनहो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली, तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. देवाला कोणी कधीही पाहिले नाही, आपण एकमेकांवर प्रीती करीत असलो, तर आपल्यामध्ये देव राहतो आणि त्याची प्रीती आपल्यामध्ये पूर्णत्व पावली आहे. आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो, हे आपण ह्यावरून ओळखतो की, त्याने स्वतःचा आत्मा आपणास दिला आहे. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की, पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे, असे जो कोणी कबूल करतो, त्याच्यामध्ये देव राहतो व तो देवामध्ये राहतो. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे, ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्यामध्ये धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे. कारण ह्या जगात आपले जीवन हे ख्रिस्ताचेच जीवन आहे. प्रीतीमध्ये भीती नसते, इतकेच नव्हे तर परिपूर्ण प्रीती भीती घालवून टाकते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीने परिपूर्ण झालेला नाही. प्रथम देवाने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो. “मी देवावर प्रीती करतो”, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील, तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो, त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही ख्रिस्ताची आपल्याला आज्ञा आहे.