1 योहान 4
4
ईश्वरी प्रेरणेची कसोटी
1प्रियजनहो, “मला पवित्र आत्मा मिळाला आहे”, असे म्हणणाऱ्या सर्व माणसांवर विश्वास ठेऊ नका, तर त्यांना मिळालेला आत्मा देवाकडून मिळालेला आहे किंवा नाही ह्याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात वावरत आहेत. 2देवाचा आत्मा तर ह्यावरून ओळखावा: जो आत्मा कबूल करतो की, येशू ख्रिस्त मानव म्हणून आला तो देवाकडचा आहे. 3जो आत्मा येशू मानव म्हणून आला हे कबूल करत नाही, तो देवाकडचा नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे. तो येणार आहे, हे तुम्ही ऐकले आहे आणि तो आत्ता जगात आलाच आहे.
4मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि खोट्या संदेष्ट्यांवर तुम्ही जय मिळवला आहे. कारण तुमच्यामध्ये जो आत्मा आहे, तो जो जगात आहे, त्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे. 5ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्यांचे ऐकून घेते. 6परंतु आपण देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. ह्यावरून सत्याचा आत्मा कोणता व असत्याचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.
देवावरची प्रीती व एकमेकांवरची प्रीती
7प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवाकडून येते. जो कोणी प्रीती करतो, तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. 8जो प्रीती करत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे. 9देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले आहे, ह्यासाठी की, त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे, ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. 10प्रीती म्हणावी तर हीच:आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हांवर प्रीती केली आणि तुम्हाआम्हांला पापांची क्षमा मिळावी म्हणून त्याच्या पुत्राला पाठविले.
11प्रियजनहो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली, तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. 12देवाला कोणी कधीही पाहिले नाही, आपण एकमेकांवर प्रीती करीत असलो, तर आपल्यामध्ये देव राहतो आणि त्याची प्रीती आपल्यामध्ये पूर्णत्व पावली आहे.
13आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो, हे आपण ह्यावरून ओळखतो की, त्याने स्वतःचा आत्मा आपणास दिला आहे. 14आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की, पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. 15येशू हा देवाचा पुत्र आहे, असे जो कोणी कबूल करतो, त्याच्यामध्ये देव राहतो व तो देवामध्ये राहतो. 16देवाची आपल्यावर जी प्रीती आहे, ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. 17न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्यामध्ये धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे. कारण ह्या जगात आपले जीवन हे ख्रिस्ताचेच जीवन आहे. 18प्रीतीमध्ये भीती नसते, इतकेच नव्हे तर परिपूर्ण प्रीती भीती घालवून टाकते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीने परिपूर्ण झालेला नाही.
19प्रथम देवाने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो. 20“मी देवावर प्रीती करतो”, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील, तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. 21जो देवावर प्रीती करतो, त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही ख्रिस्ताची आपल्याला आज्ञा आहे.
सध्या निवडलेले:
1 योहान 4: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.