YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 योहान 4:7-21

1 योहान 4:7-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

प्रियांनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती देवाकडून आहे आणि जो कोणी प्रीती करतो तो प्रत्येकजण देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हास जीवन मिळावे. अशाप्रकारे त्याने त्याची आम्हावरील प्रीती दाखवली आहे. आम्ही देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापांकरिता प्रायश्चित्त म्हणून पाठवले; यातच खरी प्रीती आहे. प्रियांनो, जर देवाने आमच्यावर अशाप्रकारे प्रीती केली तर आम्ही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे. देवाला कोणी कधीही पाहिले नाही पण जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर देव आपल्यामध्ये राहतो व त्याची प्रीती आपल्यात पूर्ण होते. अशाप्रकारे आम्हास समजू शकते की तो आमच्यामध्ये राहतो व आम्ही त्याच्यामध्ये राहतो, त्याने त्याच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतो की, जगाचा तारणारा म्हणून पित्याने पुत्राला पाठवले आहे. जर कोणी “येशू हा देवाचा पुत्र आहे” हे कबूल करतो तर त्याच्याठायी देव राहतो आणि देव त्यांच्यामध्ये राहतो. आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की, जी देवाने आमच्यावर केली. देव प्रीती आहे आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्यामध्ये राहतो. ह्यात आपल्यामध्ये प्रीती पूर्ण केलेली आहे यासाठी की, न्याय ठरण्याच्या दिवशी आम्हास धैर्य असावे, कारण जसा तो आहे तसेच आपणही या जगात आहोत. प्रीतीच्या ठायी भिती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो. “मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील, तर तो लबाड आहे कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही तर त्यास न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही ख्रिस्ताची आपल्याला आज्ञा आहे.

सामायिक करा
1 योहान 4 वाचा

1 योहान 4:7-21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

प्रिय मित्रांनो, आपण एकमेकांवर प्रीती करू या, कारण प्रीती परमेश्वरापासून आहे. जे कोणी प्रीती करतात ते परमेश्वरापासून जन्मले आहे आणि ते परमेश्वराला ओळखतात. परंतु जे प्रीती करीत नाही, ते परमेश्वराला ओळखीत नाही, कारण परमेश्वर प्रीती आहे. परमेश्वराने त्यांच्या एकुलत्या एका पुत्राला या जगात पाठविले यासाठी की, आपल्याला त्यांच्याद्वारे जीवन लाभावे त्यांनी आपल्यावरील प्रीती अशी प्रकट केली. प्रीती हीच आहे: आपण परमेश्वरावर प्रीती केली असे नाही तर त्यांनी आपणावर प्रीती केली आणि आपल्या पापांसाठी त्यांच्या पुत्राला प्रायश्चिताचा बळी म्हणून पाठविले. प्रिय मित्रांनो, ज्याअर्थी परमेश्वराने आपल्यावर एवढी प्रीती केली, त्याअर्थी आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. परमेश्वराला कोणीही कधीही पाहिले नाही; परंतु जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर, परमेश्वर आपल्यामध्ये राहतात आणि त्यांची प्रीती आपल्यामध्ये पूर्ण होत जाते. ते आपल्यामध्ये राहतात व आपण त्यांच्यामध्ये राहतो, याचा पुरावा म्हणून त्यांनी आपला स्वतःचा पवित्र आत्मा आपल्याला दिला आहे. आम्ही पाहिले आहे आणि अशी साक्ष देतो की, पित्याने त्यांच्या पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठविले आहे. येशू हे परमेश्वराचे पुत्र आहेत असे जर कोणी अंगीकारतात तर, त्यांच्यामध्ये परमेश्वर राहतात, आणि ते परमेश्वरामध्ये राहतात. परमेश्वराची प्रीती आपल्यावर आहे, ती आपण ओळखतो आणि तिच्यावर अवलंबून राहतो. परमेश्वर प्रीती आहे. जे प्रीतीत राहतात ते परमेश्वरामध्ये राहतात आणि परमेश्वर त्यांच्यामध्ये राहतात. अशा रीतीने प्रीती आपल्यामध्ये पूर्ण होते यासाठी की न्यायाच्या दिवशी आपल्याला धैर्य प्राप्त व्हावे. या जगात आपण येशू सारखे आहोत. प्रीतीमध्ये भय नसते. पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते, कारण भीतीमध्ये शासन असते. जो भीती बाळगतो तो प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नसतो. आम्ही त्यांच्यावर प्रीती करतो कारण प्रथम त्यांनी आम्हावर प्रीती केली. जे कोणी परमेश्वरावर प्रीती करण्याचा दावा करतात तरी आपल्या भावाचा किंवा बहिणीचा द्वेष करतात तर ते लबाड आहेत. कारण जर कोणी आपल्या भावाला आणि बहिणीला पाहत असूनसुद्धा त्यांच्यावर प्रीती करीत नाही तर ते परमेश्वरावर प्रीती करू शकत नाही, ज्यांना त्यांनी पाहिलेले नाही. परमेश्वराने स्वतः आज्ञा केली आहे की, जर कोणी परमेश्वरावर प्रीती करतात त्यांनी आपल्या भावावर आणि बहिणीवर सुद्धा प्रीती करावी.

सामायिक करा
1 योहान 4 वाचा

1 योहान 4:7-21 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे; जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही; कारण देव प्रीती आहे. देवाने आपल्या एकुलत्या एक जन्मलेल्या पुत्राला जगात पाठवले आहे, ह्यासाठी की, त्याच्या द्वारे आपल्याला जीवन प्राप्त व्हावे; ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुमच्याआमच्यावर प्रीती केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. प्रियजनहो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. देवाला कोणी कधीही पाहिले नाही; आपण एकमेकांवर प्रीती करत असलो तर देव आपल्या ठायी राहतो, आणि त्याची प्रीती आपल्या ठायी पूर्णत्व पावली आहे. आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो, हे आपण ह्यावरून ओळखतो की, त्याने स्वतःच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की, पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे, असे जो कोणी कबूल करतो त्याच्या ठायी देव राहतो व तो देवाच्या ठायी राहतो. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे; जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठायी धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे; कारण जसा तो आहे तसे ह्या जगात आपणही आहोत. प्रीतीच्या ठायी भीती नसते; इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते; भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली, म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. “मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे.

सामायिक करा
1 योहान 4 वाचा

1 योहान 4:7-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

प्रियजनहो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवाकडून येते. जो कोणी प्रीती करतो, तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे. देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले आहे, ह्यासाठी की, त्याच्याद्वारे आपणास जीवन प्राप्त व्हावे, ह्यावरून देवाची आपल्यावरील प्रीती प्रकट झाली. प्रीती म्हणावी तर हीच:आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हांवर प्रीती केली आणि तुम्हाआम्हांला पापांची क्षमा मिळावी म्हणून त्याच्या पुत्राला पाठविले. प्रियजनहो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली, तर आपणही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. देवाला कोणी कधीही पाहिले नाही, आपण एकमेकांवर प्रीती करीत असलो, तर आपल्यामध्ये देव राहतो आणि त्याची प्रीती आपल्यामध्ये पूर्णत्व पावली आहे. आपण त्याच्यामध्ये व तो आपल्यामध्ये राहतो, हे आपण ह्यावरून ओळखतो की, त्याने स्वतःचा आत्मा आपणास दिला आहे. आम्ही पाहिले आहे व आम्ही साक्ष देतो की, पित्याने पुत्राला जगाचा तारणारा म्हणून पाठवले आहे. येशू हा देवाचा पुत्र आहे, असे जो कोणी कबूल करतो, त्याच्यामध्ये देव राहतो व तो देवामध्ये राहतो. देवाची आपल्यावर जी प्रीती आहे, ती आपल्याला कळून आली आहे व आपण तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे, जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो व देव त्याच्यामध्ये राहतो. न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्यामध्ये धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे. कारण ह्या जगात आपले जीवन हे ख्रिस्ताचेच जीवन आहे. प्रीतीमध्ये भीती नसते, इतकेच नव्हे तर परिपूर्ण प्रीती भीती घालवून टाकते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीने परिपूर्ण झालेला नाही. प्रथम देवाने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो. “मी देवावर प्रीती करतो”, असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील, तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो, त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही ख्रिस्ताची आपल्याला आज्ञा आहे.

सामायिक करा
1 योहान 4 वाचा

1 योहान 4:7-21

1 योहान 4:7-21 MARVBSI1 योहान 4:7-21 MARVBSI
सामायिक करा
पूर्ण धडा वाचा