स्तोत्रसंहिता 65
65
निसर्गामधील देवाच्या समृद्धीबद्दल उपकारस्तुती
मुख्य गवयासाठी; दाविदाचे संगीतस्तोत्र.
1हे देवा, सीयोनेत तुझी स्तुती होवो. तुला केलेल्या नवसाची फेड तेथे होते.
2तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजात येते.
3दुष्कर्मांनी मला बेजार केले आहे. तरी तू आमचे अपराध नाहीसे करशील.
4तुझ्या अंगणांत राहण्यासाठी ज्याला तू निवडून घेतोस आणि आपल्याजवळ आणतोस तो धन्य; तुझ्या घरातील, तुझ्या मंदिराच्या पवित्रस्थानातील उत्तम लाभांनी आम्ही तृप्त होऊ.
5हे आमच्या तारणार्या देवा, पृथ्वीच्या सर्व सीमांचा व दूर समुद्रांवर असलेल्यांचा आधार तू आहेस; तू न्यायाच्या भयंकर कृत्यांनी आम्हांला उत्तर देतोस.
6तू पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवतोस.
7तू समुद्रांची गर्जना, त्यांच्या लाटांचा कल्लोळ व लोकांची दंगल शमवतोस;
8म्हणून जे सीमान्त प्रदेशात राहतात तेही तुझ्या उत्पातांना भितात; दिवसाचा उदय व अस्त ह्यांच्या द्वारे तू गजर करवतोस.
9तू पृथ्वीचा समाचार घेऊन ती भिजवली आहेस; तू तिला फार फलद्रूप करतोस; देवाची नदी जलपूर्ण आहे; भूमी तयार करून तू मनुष्यांना धान्य पुरवतोस.
10तिच्या तासांना तू भरपूर पाणी देतोस; तिचे उंचवटे सपाट करतोस; तिला पावसाच्या सरींनी मऊ करतोस; तिच्यात उगवलेले अंकुर सफळ करतोस.
11तू आपल्या प्रसादाने वर्ष भूषित करतोस; आणि तुझे मार्ग समृद्धिमय झाले आहेत.
12रानांतली कुरणेही समृद्ध होतात; आणि डोंगरांना उल्लासाचे वेष्टन पडले आहे.
13कुरणे कळपांनी झाकून गेली आहेत; खोरीही धान्याने सुशोभित होऊन गेली आहेत; ती मोठ्याने जयजयकार करतात व गातात.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 65: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.