YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 3

3
लेव्यांची संख्या आणि त्यांची कर्तव्ये
1परमेश्वर सीनाय पर्वतावर मोशेशी बोलला त्या काळची अहरोन व मोशे ह्यांची वंशावळ ही.
2अहरोनाच्या मुलांची नावे ही : पहिला नादाब, मग अबीहू, एलाजार व इथामार.
3अहरोनाचे मुलगे अभिषिक्त याजक असून याजक ह्या नात्याने सेवा करण्यासाठी त्याने त्यांच्यावर संस्कार केला होता; त्यांचीच ही नावे आहेत.
4नादाब व अबीहू हे सीनाय रानात परमेश्वरासमोर अनधिकृत अग्नी अर्पण केल्यामुळे परमेश्वरासमोर मरण पावले; त्यांना संतती नव्हती. एलाजार व इथामार हे आपला बाप अहरोन ह्याच्या हयातीत याजक ह्या नात्याने सेवा करीत असत.
5परमेश्वराने मोशेला सांगितले की, 6“अहरोन याजकाची सेवा करण्यासाठी लेवी वंशातील लोकांना आणून त्याच्यासमोर उभे कर.
7अहरोन व सर्व मंडळी त्यांना निवासमंडपाच्या सेवेसंबंधाने जी काही कामगिरी सोपवतील ती त्यांनी दर्शनमंडपासमोर पार पाडावी.
8दर्शनमंडपातील सर्व सामान त्यांनी ताब्यात घ्यावे आणि निवासमंडपाच्या सेवेसंबंधाने इस्राएल लोकांकरता जी काही कामगिरी करायची असेल तिच्याकडे त्यांनी लक्ष पुरवावे.
9लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या हवाली कर; इस्राएल लोकांमधून ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आले आहेत.
10अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची नेमणूक कर म्हणजे ते आपले याजकपण सांभाळतील; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.”
11परमेश्वराने मोशेला सांगितले की,
12“इस्राएलातल्या सर्व प्रथमजन्मलेल्यांच्या ऐवजी मी इस्राएल लोकांतून लेवी वंश घेतला आहे; लेवी वंशातील लोक माझेच आहेत;
13कारण प्रथमजन्मलेले सर्व माझेच आहेत; ज्या दिवशी मिसर देशातील प्रथमजन्मलेले सर्व मी मारून टाकले त्याच दिवशी इस्राएल लोकांतील मनुष्यांपैकी आणि पशूंपैकी प्रथमजन्मलेले सर्व मी आपणासाठी पवित्र ठरवले; ते माझेच आहेत; मी परमेश्वर आहे.”
14परमेश्वराने सीनाय रानात मोशेला सांगितले की,
15“लेवी वंशातील जितके पुरुष एक महिन्याचे अथवा त्याहून अधिक वयाचे असतील त्यांच्या वाडवडिलांची घराणी व त्यांची कुळे ह्यांना अनुसरून त्यांची गणती कर.”
16मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याला झालेल्या आज्ञेनुसार त्यांची गणती केली.
17लेवीच्या मुलांची नावे ही : गेर्षोन, कहाथ व मरारी.
18गेर्षोनाच्या मुलांची नावे त्यांच्या कुळांप्रमाणे ही : लिब्नी व शिमी.
19कहाथाचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे : अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.
20मरारीचे मुलगे त्यांच्या कुळांप्रमाणे हे : माहली व मूशी. लेव्यांची कुळे त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे हीच आहेत.
21गेर्षोनापासून लिब्नी व शिमी ही कुळे चालू झाली; ही गेर्षोनी कुळे.
22त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांची संख्या सात हजार पाचशे भरली.
23गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्‍चिमेकडे आपले डेरे ठोकावेत.
24गेर्षोन्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार लायेलाचा मुलगा एल्यासाप हा असावा.
25दर्शनमंडपातील ज्या वस्तू गेर्षोनी पुरुषांच्या स्वाधीन करायच्या त्या ह्या : निवासमंडप, तंबू, त्यावरील आच्छादन व दर्शनमंडपाच्या दाराचा पडदा,
26निवासमंडप आणि वेदी ह्यांच्या सभोवती असलेल्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा आणि त्यातील सर्व सामानासाठी लागणारे तणावे.
27कहाथापासून अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल ही कुळे चालू झाली; ही कहाथी कुळे.
28त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते ते आठ हजार सहाशे भरले; पवित्रस्थानाचे रक्षण करण्याची कामगिरी त्यांच्याकडे असे.
29कहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेस आपले डेरे ठोकावेत.
30कहाथी कुळांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार उज्जीएलाचा मुलगा अलीसापान हा असावा.
31कोश, मेज, दीपवृक्ष, वेद्या आणि पवित्रस्थानात सेवेसाठी असलेली पात्रे व पडदा ही त्यांच्या स्वाधीन करावीत व त्यांची निगा राखण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपवावी.
32लेव्यांच्या सरदारांचा सरदार अहरोनाचा मुलगा एलाजार हा असावा; पवित्रस्थानाच्या वस्तूंचे रक्षण करण्याची कामगिरी ज्यांच्याकडे सोपवलेली आहे त्यांच्यावर त्याची देखरेख असावी.
33मरारीपासून माहली व मूशी ही कुळे चालू झाली; ही मरारी कुळे.
34त्यांच्यापैकी जितके पुरुष एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांची संख्या सहा हजार दोनशे भरली.
35मरारी कुळांच्या वाडवडिलांच्या घराण्याचा सरदार अबीहाईलाचा मुलगा सूरीएल हा असावा; त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेस आपले डेरे ठोकावेत.
36ज्या वस्तू त्यांच्या स्वाधीन करायच्या त्या ह्या : निवासमंडपाच्या फळ्या व त्यांचे अडसर, खांब, उथळ्या व त्यांचे सर्व उपकरणसाहित्य व त्यांच्या निगेचे काम.
37तसेच सभोवतालच्या अंगणाचे खांब आणि त्यांच्या उथळ्या, मेखा आणि तणावे ही त्यांच्या स्वाधीन करावीत व त्यांची निगा राखण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपवावी.
38निवासमंडपासमोर पूर्वेकडे म्हणजे दर्शनमंडपासमोर उगवतीस जे डेरे ठोकायचे ते मोशे आणि अहरोन व त्यांचे मुलगे ह्यांचे असावेत; इस्राएल लोकांकरिता पवित्रस्थानाच्या रक्षणाची जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली होती, ती त्यांनी पार पाडावी; कोणी परका जवळ आल्यास त्याला जिवे मारावे.
39परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे लेवी वंशाची त्यांच्या कुळांना अनुसरून जी गणती मोशे व अहरोन ह्यांनी केली, तिच्याप्रमाणे एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुरुष बावीस हजार भरले.
लेवी आणि प्रथमजन्मलेल्यांसाठी द्यायची खंडणी
40मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांपैकी जितके प्रथमजन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे पुरुष असतील त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने त्यांची गणती कर.
41इस्राएल लोकांच्या सर्व प्रथमजन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी वंश माझ्यासाठी घे; मी परमेश्वर आहे; आणि इस्राएल लोकांच्या पशूंच्या सर्व प्रथमवत्सांच्या ऐवजी लेव्यांचे पशू घे.”
42परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने इस्राएलांच्या प्रथमजन्मलेल्या सर्वांची गणती केली.
43प्रथमजन्मलेले एक महिन्याचे व त्याहून अधिक वयाचे जे पुरुष होते त्यांची मोजदाद केली तेव्हा त्या सर्वांच्या नावांच्या अनुक्रमाने त्यांची संख्या बावीस हजार दोनशे त्र्याहत्तर भरली.
44परमेश्वराने मोशेला सांगितले,
45“इस्राएलांच्या सर्व प्रथमजन्मलेल्यांच्या ऐवजी लेवी वंश आणि त्यांच्या पशूंच्या ऐवजी लेव्यांचे पशू घे; लेवी वंशातील लोक माझे आहेत; मी परमेश्वर आहे.
46इस्राएलांचे प्रथमजन्मलेले पुरुष लेव्यांच्या संख्येपेक्षा दोनशे त्र्याहत्तरने अधिक असल्यामुळे त्यांना सोडवण्यासाठी
47प्रत्येक पुरुषामागे पाच-पाच शेकेल घ्यावेत. पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ते घ्यावेत; शेकेल म्हणजे वीस गेरा.
48ह्या अधिक असलेल्या प्रथमजन्मलेल्यांच्या सोडवणुकीचे पैसे येतील ते अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना द्यावेत.”
49लेव्यांकडून ज्यांची खंडणी झाली त्यांच्याहून जे अधिक होते त्यांच्यापासून त्यांच्या खंडणीचा पैसा मोशेने घेतला.
50इस्राएलांच्या प्रथमजन्मलेल्यांपासून त्याने जे पैसे घेतले ते एकूण पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एक हजार तीनशे पासष्ट शेकेल भरले.
51मोशेने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे त्याला झालेल्या आज्ञेनुसार हे खंडाचे पैसे अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना दिले.

सध्या निवडलेले:

गणना 3: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन