YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गणना 4

4
लेव्यांच्या जबाबदार्‍या
1परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले, 2“लेव्यांच्या मुलांपैकी कहाथवंशजांची, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती कर;
3म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंत जे पुरुष दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असतील त्यांची गणती कर.
4दर्शनमंडपातील परमपवित्र वस्तूंसंबंधाने कहाथ-वंशजांनी जी सेवा करायची ती ही : 5छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आत जाऊन अंतरपट खाली काढावा व त्याने साक्षपटाचा कोश झाकावा;
6मग त्यांनी त्यावर तहशाच्या1 कातड्याचे आच्छादन घालावे; आणि त्यावर त्यांनी संपूर्ण निळ्या रंगाचे कापड पसरावे; हे झाल्यावर कोशाला त्याचे दांडे बसवावेत.
7समक्षतेच्या भाकरीच्या मेजावर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरून त्यावर तबके, धूपपात्रे, वाट्या व पेयार्पणे ओतण्याचे प्याले ठेवावेत; निरंतरची भाकरही त्यावर ठेवावी;
8मग त्यांनी त्यावर किरमिजी रंगाचे कापड पसरून वर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे; आणि मेजाला दांडे बसवावेत.
9आणि त्यांनी निळ्या रंगाचे कापड घेऊन प्रकाश देणारा दीपवृक्ष, त्यावरील दिवे, चिमटे, ताटल्या आणि त्याच्या निगेसाठी लागणारी तेलाची सर्व पात्रे झाकावीत;
10दीपवृक्ष व त्याची सगळी उपकरणे ह्यांवर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालून ती सर्व नवघणाला बांधावी.
11मग सोन्याच्या वेदीवर त्यांनी निळ्या रंगाचे कापड पसरून वर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे आणि तिला दांडे बसवावेत.
12पवित्रस्थानातील सेवेची सर्व उपकरणे निळ्या रंगाच्या कापडात गुंडाळून त्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे आणि ते सबंध नवघणाला बांधावे.
13मग त्यांनी वेदीवरील सर्व राख काढून वेदीवर जांभळ्या रंगाचे कापड पसरावे;
14आणि वेदीच्या सेवेची सर्व उपकरणे म्हणजे अग्निपात्रे, काटे, फावडी, कटोरे आदिकरून वेदीचे सर्व सामान तिच्यावर ठेवावे, त्यावर तहशाच्या कातड्याचे आच्छादन घालावे आणि तिचे दांडे बसवावेत.
15छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी पवित्रस्थान व त्यातील सर्व सामान ह्यांवर आच्छादन घालण्याचे काम संपवल्यावर कहाथवंशजांनी ते उचलून न्यायला पुढे यावे; परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये; केला तर ते मरतील. दर्शनमंडपातील जी ओझी कहाथवंशजांनी वाहायची ती हीच.
16अहरोन याजकाचा मुलगा एलाजार ह्याला जी कामगिरी सोपवून द्यायची ती ही : दिव्याचे तेल, सुगंधी धूप, निरंतरचे अन्नार्पण, अभिषेकाचे तेल, निवासमंडप व त्यातील सर्व सामान म्हणजे पवित्रस्थान व त्यातील उपकरणे ह्यांची निगा त्याने ठेवावी.”
17परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना सांगितले,
18“कहाथी कुळांच्या वंशाचा लेव्यांतून उच्छेद होऊ देऊ नये;
19ते परमपवित्र वस्तूंजवळ येतील तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून त्यांच्यासंबंधी असे करावे : अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आत जाऊन त्यांच्यातील एकेकाला त्याचे काम व ओझे नेमून द्यावे;
20पण पवित्र वस्तू पाहण्यासाठी त्यांनी क्षणभरही आत जाऊ नये; गेले तर ते मरतील.”
21परमेश्वराने मोशेला सांगितले,
22“गेर्षोनवंशजांचीही त्यांच्या वाडवडिलांची घराणी व त्यांची कुळे ह्यांना अनुसरून गणती कर;
23म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे जे पुरुष दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असतील त्यांची गणती कर.
24सेवा करणे व ओझी वाहणे ह्यासंबंधाने गेर्षोनी कुळांची कामे ही :
25निवासमंडपाचे पडदे, दर्शनमंडप व त्याचे आच्छादन, त्यावर असलेले तहशाच्या कातड्याचे आच्छादन, दर्शनमंडपाच्या दाराचा पडदा,
26निवासमंडप आणि वेदी ह्यांच्यासभोवती असलेल्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या फाटकाचे पडदे व तणावे आणि त्यांच्या सेवेला लागणारी उपकरणे, हे सर्व सामान त्यांनी वाहावे; आणि ह्या सामानासंबंधाने जे काही काम पडेल ते सर्व त्यांनी करावे.
27गेर्षोनी पुरुषांनी आपली सर्व कामगिरी अहरोन व त्याचे मुलगे ह्यांच्या आज्ञेप्रमाणे पार पाडावी. त्यांना जे काही वाहून न्यायचे व जी काही सेवा करायची त्या सगळ्याचा भार तुम्ही त्यांच्यावर सोपवावा.
28गेर्षोनी कुळातल्या पुरुषांची दर्शनमंडपातली सेवा ही होय. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली त्यांनी आपली कामगिरी पार पाडावी.
29मरारीवंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती कर;
30म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे जे पुरुष दर्शनमंडपाच्या सेवेसाठी पात्र असतील त्यांची गणती कर.
31दर्शनमंडपातल्या ज्या वस्तू वाहून नेण्याची कामगिरी त्यांना करावी लागेल ती ही : निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब आणि उथळ्या,
32आणि सभोवती असलेल्या अंगणाचे खांब, त्यांच्या उथळ्या, मेखा, तणावे आणि त्याच्या सेवेला लागणारी इतर सर्व उपकरणे त्यांनी वाहून न्यावी व त्यांची निगा राखावी; हे जे सगळे सामान त्यांना वाहून न्यायचे त्यातील हरएक वस्तू तपशीलवार त्यांच्या स्वाधीन करावी.
33मरारी कुळातील पुरुषांना दर्शनमंडपासंबंधाने जी सर्व सेवा करावी लागेल ती ही होय. अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या हाताखाली त्यांनी आपली कामगिरी पार पाडावी.”
34ह्या प्रकारे मोशे, अहरोन आणि मंडळीचे सरदार ह्यांनी कहाथवंशजांची, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती केली;
35म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे जे पुरुष दर्शनमंडपातील सेवेसाठी पात्र होते त्यांची गणती केली;
36ज्या पुरुषांची त्यांच्या कुळांप्रमाणे गणती झाली ते दोन हजार सातशे पन्नास होते.
37कहाथी कुळांपैकी जे सर्व पुरुष दर्शनमंडपातील सेवा करीत, त्यांची गणती केली ती इतकी भरली; परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केल्याप्रमाणे मोशे व अहरोन ह्यांनी त्यांची गणती केली.
38गेर्षोनवंशजांची, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती केली;
39म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे जे पुरुष दर्शनमंडपातील सेवेसाठी पात्र होते त्यांची गणती केली;
40ज्या पुरुषांची, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती झाली ती दोन हजार सहाशे तीस होती.
41गेर्षोनी कुळांपैकी जे सर्व पुरुष दर्शनमंडपातली सेवा करत त्यांची गणती केली ती इतकी भरली. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशे व अहरोन ह्यांनी त्यांची गणती केली.
42मरारीवंशजांची, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती केली;
43म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे जे पुरुष दर्शनमंडपातील सेवेसाठी पात्र होते त्यांची गणती केली;
44ज्या पुरुषांची त्यांच्या कुळास अनुसरून गणती झाली ते तीन हजार दोनशे होते.
45मरारी कुळांपैकी ज्या पुरुषांची गणती मोशे व अहरोन ह्यांनी परमेश्वराने मोशेच्या द्वारे आज्ञा केल्याप्रमाणे केली, ते इतके भरले.
46मोशे, अहरोन आणि इस्राएलांचे सरदार ह्यांनी लेव्यांची गणती त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून केली;
47म्हणजे तीस वर्षांच्या वयापासून पन्नास वर्षांपर्यंतचे जे पुरुष दर्शनमंडपातील सेवेसाठी पात्र होऊन ओझी वाहत असत,
48त्या सर्वांची संख्या आठ हजार पाचशे ऐंशी भरली.
49त्यांची सेवा आणि त्यांच्या कामाचा भार ह्यांना अनुसरून परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेच्या द्वारे त्यांची गणती करण्यात आली; ह्या प्रकारे परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या द्वारे त्यांची गणती करण्यात आली.

सध्या निवडलेले:

गणना 4: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन