यिर्मया 9
9
1अहाहा! माझे मस्तक जलसंचय, माझे डोळे अश्रूंचा झरा असते तर किती बरे होते! म्हणजे माझ्या लोकांच्या कन्येच्या वध पावलेल्यांबद्दल मी रात्रंदिवस अश्रुपात केला असता.
2मला वनात वाटसरूंसारखे बिर्हाड असते तर किती बरे होते? म्हणजे मी आपल्या लोकांचा त्याग केला असता, त्यांच्यापासून निघून गेलो असतो; कारण ते सर्व व्यभिचारी, बेइमान्यांचा जमाव आहेत.
3खोटे बोलण्यास ते आपली जीभ धनुष्याप्रमाणे वाकवतात; ते देशात प्रबळ झाले आहेत, पण सत्यासाठी नव्हे; ते दुष्कर्माला दुष्कर्म जोडतात; मला ते ओळखत नाहीत, असे परमेश्वर म्हणतो.
4आपापल्या शेजार्याविषयी सावध असा. कोणाही बंधूचा विश्वास धरू नका; कारण प्रत्येक बंधू खास ठकवतो, प्रत्येक शेजारी चहाड्या करीत फिरतो.
5जो तो आपल्या शेजार्याला फसवतो; ते सत्य म्हणून बोलत नाहीत; त्यांनी आपल्या जिभेस खोटे बोलण्यास शिकवले आहे, ते कुटिलाचार करण्यासाठी स्वतःस शिणवतात.
6कपटाने घेरलेली अशी तुझी वस्ती आहे; कपटामुळे ते मला ओळखण्यास अमान्य आहेत, असे परमेश्वर म्हणतो.
7ह्यासाठी सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी त्यांना गाळून पारखीन; माझ्या लोकांच्या कन्येच्या वर्तनास्तव मी दुसरे काय करणार?
8त्यांची जीभ प्राणहारक बाण आहे; ते असत्य बोलतात; ते तोंडाने शेजार्याशी सलोख्याचे भाषण करतात, पण अंतर्यामी त्याच्यावर टपून असतात.
9परमेश्वर म्हणतो, ह्याबद्दल मी त्यांचा समाचार घेणार नाही काय? माझा आत्मा ह्या राष्ट्राचे पारिपत्य करणार नाही काय?
10मी पर्वतांविषयी आक्रंदन करीन, विलाप करीन, रानातल्या कुरणांबद्दल शोक करीन; कारण ती जळून खाक झाली आहेत; त्यांवरून कोणी चालत नाहीत; तेथे कोणाला गुराढोरांचा शब्द ऐकू येत नाही; जनावरे पळाली आहेत, आकाशातील पक्षी निघून गेले आहेत.
11यरुशलेम ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान असे मी करीन; यहूदाची नगरे ओसाड, निर्जन करीन.”
नाश व हद्दपार होण्याचे भय
12हे समजून घेईल असा शहाणा कोण आहे? परमेश्वराच्या मुखाने त्याला सांगितले असून ते इतरांना कळवील असा कोण आहे? देशाचा नाश का झाला? कोणी त्यातून येत नाही असा तो जळून वैराणासारखा का झाला?
13परमेश्वर म्हणतो, “मी त्यांच्यापुढे ठेवलेले माझे नियमशास्त्र त्यांनी सोडले, त्यांनी माझा शब्द ऐकला नाही व त्याप्रमाणे ते चालले नाहीत.
14तर ते आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले त्यांच्या पूर्वजांनी त्यांना शिकवल्याप्रमाणे ते बआलमूर्तींच्या मागे लागले.
15ह्यास्तव सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, मी ह्या लोकांना कडू दवणा चारीन, त्यांना विषाचे पाणी पाजीन,
16आणि जी राष्ट्रे त्यांना व त्यांच्या पूर्वजांना माहीत नव्हती त्यांच्यामध्ये त्यांची दाणादाण करीन; त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन.”
17सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “विचार करा, मोलाने ऊर बडवणार्या स्त्रियांना बोलावून आणा, कुशल स्त्रियांना आमंत्रण करा;
18त्यांनी त्वरा करून आमच्यासाठी शोकगीत म्हणावे म्हणजे आमच्या नेत्रांतून अश्रू गळतील, आमच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहतील.
19कारण सीयोनेतून आक्रंदनाचा शब्द ऐकू येत आहे; ‘आम्हांला कसे नागवले आहे! आमची कशी फजिती उडाली आहे! आम्ही देश त्यागला आहे, कारण त्यांनी आमची घरे पाडली आहेत.”’
20स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या तोंडचे शब्द तुमचे कान स्वीकारोत; तुम्ही आपल्या कन्यांना विलापगीत शिकवा. एकमेकींना शोकगीत शिकवा.
21कारण रस्त्यांतली मुले व चौकांतील तरुण नष्ट करण्यास मृत्यू आमच्या खिडक्यांतून आत शिरला आहे, त्याने आमच्या वाड्यांत प्रवेश केला आहे.
22हे सांग, “परमेश्वर असे म्हणतो, ‘शेतात खत पडते, कापणार्याच्या मागे पेंढी गळून पडते, कोणी उचलत नाही, तशी माणसांची प्रेते पडतील.”’
देवाचे ज्ञान - मानवाचे वैभव
23परमेश्वर म्हणतो, “ज्ञान्याने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये; बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये;
24बाळगायचा असला तर, मी दया करणारा व पृथ्वीवर प्रेमदया, न्याय आणि नीतिमत्ता चालवणारा परमेश्वर आहे, ह्याची त्याला जाणीव आहे, ओळख आहे, ह्याविषयी बाळगावा; ह्यात मला संतोष आहे, असे परमेश्वर म्हणतो.”
25परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की, सुंती, पण वास्तविक बेसुनत अशा सर्व लोकांना मी शासन करीन;
26मिसर, यहूदा, अदोम, अम्मोनी, मवाबी व आपल्या केसांची चोंच काढणारे रानातले रहिवासी ह्या सर्वांना मी शासन करीन; कारण सर्व राष्ट्रे बेसुनत आहेत व इस्राएलाचे सर्व घराणे हृदयाने बेसुनत आहे.”
सध्या निवडलेले:
यिर्मया 9: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.