यिर्मया 8
8
1परमेश्वर म्हणतो, त्या काळात यहूदाच्या राजांच्या अस्थी, त्यांच्या सरदारांच्या अस्थी, याजकांच्या अस्थी, संदेष्ट्यांच्या अस्थी व यरुशलेमकरांच्या अस्थी त्यांच्या कबरांतून बाहेर काढतील.
2त्या ते सूर्य, चंद्र व आकाशातील सर्व नक्षत्रगण ह्यांपुढे पसरतील; त्यांची तर त्यांनी आवड धरली, त्यांची सेवा केली, त्यांच्यामागे ते चालले, त्यांचा त्यांनी धावा केला व त्यांचे भजनपूजन केले; त्या अस्थी गोळा करून पुरणार नाहीत, तर त्या भूतलावर खत होतील.
3ह्या दुष्ट वंशाचे अवशिष्ट राहिलेले ज्या ज्या स्थळी मी हाकून लावले त्या त्या स्थळी जे बाकी उरतील ते जीवनाऐवजी मरण पसंत करतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
पाप व न्याय
4परमेश्वर म्हणतो, आणखी त्यांना सांग, कोणी पडला तर पुन्हा उठत नाही काय? कोणी बहकला तर पुन्हा वळत नाही काय?
5मग हे यरुशलेमकर एकसारखे का बहकत राहिले आहेत? ते कपटाला चिकटून राहिले आहेत, ते वळण्यास कबूल होत नाहीत.
6मी कान देऊन ऐकले पण ते ठीक बोलत नाहीत; त्यांच्या दुष्टतेचा त्यांना पश्चात्ताप होत नाही; ‘मी हे काय केले?’ असे कोणी म्हणत नाही; घोडा रणात धाव घेतो तसे ते सर्व उलटून आपल्या मार्गावर जातात.
7आकाशातील करकोची आपला नेमलेला समय जाणते; होला, निळवी व सारस आपल्या येण्याच्या वेळचे स्मरण ठेवतात; पण माझे लोक परमेश्वराचा निर्णय ओळखत नाहीत.
8‘आम्ही सुज्ञ आहोत, परमेश्वराचे नियमशास्त्र आमच्याजवळ आहे,’ असे तुम्ही कसे म्हणता? परंतु पाहा, लेखकांच्या लबाड लेखणीने ते खास खोटे केले आहे.
9शहाणे लज्जित होतात, त्यांची त्रेधा उडून ते पकडले जातात; पाहा, परमेश्वराचे वचन ते धिक्कारतात; त्यांच्यात शहाणपण कोठचे असणार!
10ह्यामुळे मी त्यांच्या स्त्रिया इतरांना देईन, त्यांची शेते नव्या वहिवाटदारांना देईन; कारण लहानापासून थोरापर्यंत ते झाडून सर्व लोभवश झाले आहेत; संदेष्ट्यांपासून याजकांपर्यंत ते सर्व कपट करतात.
11शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांच्या कन्येचा घाय ते वरवर बरा करतात.
12त्यांनी अमंगळ कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना बिलकूल लाज वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो.
13परमेश्वर म्हणतो, मी त्यांचा अगदी नायनाट करीन; द्राक्षलतेवर द्राक्षे, अंजिराच्या झाडावर अंजीर नसतील; पानेही वाळून जातील; म्हणून जे काही मी त्यांना दिले आहे ते त्यांच्यापासून निघून जाईल.”
14आपण स्वस्थ का बसलो आहोत? जमा व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात शिरू व तेथे नष्ट होऊ; कारण आम्ही परमेश्वराविरुद्ध पाप केले आहे म्हणून आम्ही नाश पावावे असे परमेश्वर आमचा देव ह्याने ठरवले आहे व विषाचे पाणी आम्हांला प्यायला दिले आहे.
15आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण काही हित होत नाही; घाय बरा होण्याची वाट पाहतो, पण पाहा, दहशतच उभी.
16“त्याच्या घोड्यांचे फुरफुरणे दानातील नगरांतून ऐकू येते; त्याच्या वारूंच्या मोठ्या खिंकाळण्यांनी सर्व भूमी हादरत आहे; ते येऊन देश व त्यातील सर्वस्व, नगर व त्यातील रहिवासी ह्यांना ग्रासून टाकतात.
17कारण पाहा, मी तुमच्यात सर्प व नाग पाठवीन, त्यांवर मंत्रतंत्र चालायचे नाहीत, ते तुम्हांला दंश करतील,” असे परमेश्वर म्हणतो.
यहूदा व यरुशलेमसाठी शोक
18हायहाय! माझ्या दुःखाचे सांत्वन मला करता आले असते तर बरे होते! माझे हृदय माझ्या ठायी म्लान झाले आहे.
19पाहा, दूर देशातून माझ्या लोकांच्या कन्येची आरोळी ऐकू येते की, “सीयोनेत परमेश्वर नाही ना? त्यात तिचा राजा नाही ना?” “त्यांनी आपल्या मूर्तींनी व परक्या खोट्या दैवतांनी मला का चिडवले आहे?”
20“सुगी सरली, हंगाम आटोपला, पण आमचे तारण झाले नाही.”
21माझ्या लोकांच्या कन्येच्या घायाने मी घायाळ झालो आहे, मी सुतकी आहे; महाभयाने मला घेरले आहे.
22गिलादात मलम नाही काय? तेथे कोणी वैद्य नाही काय? माझ्या लोकांच्या कन्येचे घाय का बरे झाले नाहीत?
सध्या निवडलेले:
यिर्मया 8: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.