यिर्मया 10
10
खोटा देव व खरा देव
1हे इस्राएलाच्या घराण्या, परमेश्वर तुम्हांला जे वचन सांगतो, ते ऐका;
2परमेश्वर असे म्हणतो, “राष्ट्रांचे संप्रदाय शिकू नका; आकाशातील उत्पातांनी घाबरू नका; राष्ट्रे तर त्यांनी घाबरतात.
3लोकांचे विधी व्यर्थ आहेत; अरण्यातून कोणी तोडून आणलेले ते काष्ठच होय, ते कारागिराच्या हातच्या हत्याराने केलेले काम आहे.
4तो सोन्यारुप्याने ते भूषित करतो व हालू नये म्हणून हातोड्याने खिळे ठोकून ते घट्ट बसवतो.
5त्या मूर्ती बागेतल्या बुजगावण्यासारख्या आहेत; त्यांना बोलता येत नाही, त्या उचलून न्याव्या लागतात, कारण त्यांना चालता येत नाही; त्यांना भिऊ नका; कारण त्यांच्याने काही वाईट करवत नाही, व त्यांना काही बरे करण्याचे सामर्थ्य नाही.”
6हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीच नाही; तू थोर आहेस, पराक्रमामुळे तुझे नाम मोठे आहे.
7हे राष्ट्रांच्या राजा, तुला कोण भिणार नाही? हे तुला साजते; राष्ट्रांतील सर्व ज्ञात्यांत, त्यांच्या सर्व राज्यांत तुझ्यासमान कोणीच नाही.
8ते एकंदर सर्व पशुवत व मूर्ख आहेत; मूर्तीपासून घ्यावयाचा बोध म्हटला म्हणजे काष्ठरूप!
9तार्शीशाहून आणलेले रुप्याचे पत्रे व उफाजचे सोने ह्यांचे कारागिराने केलेले, सोनाराच्या हाताने घडलेले काम त्या आहेत, त्यांना निळा, जांभळा पोशाख चढवतात; त्या सगळ्या कुशल कारागिरांच्या हातचे काम होत.
10तरी परमेश्वर सत्य देव आहे; तो जिवंत देव, सनातन राजा आहे; त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.
11तुम्ही त्यांना हे सांगा की, “ज्या देवांनी आकाश व पृथ्वी केली नाही ते पृथ्वीवरून, आकाशाखालून नष्ट होतील.”
12त्याने पृथ्वी आपल्या सामर्थ्याने उत्पन्न केली, त्याने आपल्या बुद्धीने आकाश पसरले.
13तो आपला शब्द उच्चारतो तेव्हा आकाशात पाण्याचा गडगडाट होतो; तो पृथ्वीच्या दिगंतापासून वाफेचे लोट वर चढवतो; तो पावसासाठी विजा सिद्ध करतो आणि आपल्या भांडारातून वायू बाहेर काढतो.
14प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे; प्रत्येक मूर्तिकार मूर्तीमुळे लज्जित झाला आहे; कारण त्याने ओतलेली मूर्ती साक्षात लबाडी आहे, त्यांच्यात मुळीच प्राण नाही.
15त्या शून्य, उपहासाला पात्र वस्तू होत; त्यांचा समाचार घेऊ लागताच त्या नष्ट होतात.
16जो याकोबाचा वाटा तो त्यांसारखा नव्हे, तर तो सर्वांचा निर्माणकर्ता आहे व इस्राएल त्याच्या वतनाचा वंश आहे, सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम आहे.
यहूदाची वाताहत
17हे वेढ्यात सापडलेले, तू आपले गाठोडे गुंडाळून ह्या भूमीवरून नीघ.
18कारण परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी ह्या प्रसंगी ह्या देशाचे रहिवासी गोफणीतून भिरकावतो, मी त्यांना अशी पीडा करतो की ती त्यांना जाणवेल.”
19हायहाय! मला जखम झाली आहे, मला लागलेला मार भारी आहे! तरी मला वाटते, “हे दुःख माझ्या वाट्याला आले आहे म्हणून मला ते सोसले पाहिजे.”
20माझा डेरा लुटला आहे, माझे सर्व दोर तुटले आहेत; माझे पुत्र निघून गेले आहेत; ते नाहीत; माझा डेरा ताणायला कोणी नाही, माझ्या कनाती लावायला कोणी नाही.
21कारण मेंढपाळ पशुतुल्य झाले आहेत; ते परमेश्वराच्या शोधास लागले नाहीत म्हणून त्यांची कार्यसिद्धी झाली नाही. त्यांचा सर्व कळप विखरून गेला आहे.
22ऐका! अवई ऐका! पाहा, ती येत आहे, उत्तरदेशातून मोठी गर्दी येत आहे. ती यहूदाची नगरे वैराण, कोल्ह्यांची राहण्याची जागा अशी करून सोडील.
23हे परमेश्वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणार्या मनुष्याच्या हाती नाही.
24हे परमेश्वरा, मला शिक्षा कर, पण ती न्यायाने कर, तुझ्या कोपाने नको; नाहीतर तू मला शून्यवत करशील.
25जी राष्ट्रे तुला ओळखत नाहीत, ज्या जाती तुझ्या नामाचा धावा करीत नाहीत त्यांच्यावर तू आपल्या संतापाचा मारा कर. कारण त्यांनी याकोबाला ग्रासून टाकले आहे, त्याला खाऊन टाकले आहे, त्याचे वसतिस्थान उद्ध्वस्त केले आहे.
सध्या निवडलेले:
यिर्मया 10: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.