YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 11

11
मोडलेला करार
1परमेश्वराकडून यिर्मयाला वचन प्राप्त झाले ते हे :
2“तुम्ही ह्या कराराची वचने ऐका; यहूदाचे लोक व यरुशलेमकर ह्यांच्याशी बोला.
3तू त्यांना सांग, परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, ह्या कराराची वचने जो ऐकत नाही तो शापित आहे.
4ज्या दिवशी मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून, लोखंडी भट्टीतून बाहेर काढले त्या दिवशी हा करार मी त्यांना आज्ञापिला व म्हटले, माझी वाणी ऐका व माझ्या आज्ञेप्रमाणे सगळी वचने पाळा, म्हणजे तुम्ही माझे लोक व्हाल व मी तुमचा देव होईन;
5आणि ज्यात दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा देश, आज आहे तसा, तुमच्या पूर्वजांना मी शपथपूर्वक देऊ केला, ती शपथ मी पूर्ण करीन.” तेव्हा मी उत्तर देऊन म्हटले, “हे परमेश्वरा, आमेन.”
6परमेश्वर मला म्हणाला, “यहूदाच्या नगरात व यरुशलेमेच्या रस्त्यात ही सर्व वचने पुकारून सांग : ह्या कराराची वचने ऐका व त्याप्रमाणे वागा.
7मी तुमच्या पूर्वजांना मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजवर मी त्यांना बजावून सांगत आलो आहे; नित्य मोठ्या निकडीने बजावत आलो आहे की माझा शब्द ऐका;
8पण ते ऐकेनात, आपला कान लावीनात, तर आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे ते चालत गेले; मी त्यांना ह्या कराराची वचने पाळण्यास सांगितले असून त्यांनी ती पाळली नाहीत, म्हणून त्या करारात सांगितलेले सर्व मी त्यांच्यावर आणले.”
9परमेश्वर मला म्हणाला, “यहूदातील माणसे व यरुशलेमकर ह्यांनी केलेला कट उघडकीस आला आहे.
10त्यांच्या वडिलांनी माझ्या वचनांकडे कान देण्याचे नाकारले, त्याच त्यांच्या दुष्कर्माकडे ते वळाले आहेत; अन्य देवांची सेवा करण्यास ते त्यांच्यामागे लागले आहेत; इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांनी, त्यांच्या पूर्वजांशी मी केलेला करार मोडला आहे.
11ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, मी त्यांच्यावर अरिष्ट आणतो त्यातून त्यांचा निभाव लागणार नाही; ते मला आरोळी मारतील तरी मी त्यांचे ऐकणार नाही.
12यहूदाची नगरे व यरुशलेमकर ज्या दैवतांना धूप जाळतात त्यांच्याकडे जाऊन ते आरोळी मारतील; पण संकटसमयी ती त्यांचे रक्षण मुळीच करणार नाहीत.
13हे यहूदा, तुझ्या नगरांइतकी तुझ्या दैवतांची संख्या आहे; यरुशलेमेत जितके रस्ते आहेत तितक्या वेद्या, त्या लाजिरवाण्या वस्तूंसाठी म्हणजे अर्थात बआलमूर्तीपुढे धूप जाळण्यासाठी तुम्ही मांडल्या आहेत.
14ह्याकरता तू ह्या राष्ट्रांसाठी प्रार्थना करू नकोस, त्यांच्यासाठी विनंती करू नकोस की धावा करू नकोस; कारण ते आपल्या संकटसमयी मला हाक मारतील तेव्हा मी ऐकणार नाही.
15माझ्याशी कपटाने वागणार्‍या माझ्या प्रियेचे माझ्या मंदिरात काय काम? नवसांनी व पवित्र मांस अर्पण केल्याने तुझ्यावरचे संकट टळेल काय? टळत असेल तर आनंद कर.
16परमेश्वराने तुला ‘चांगल्या फळांनी शोभिवंत असलेले हिरवे जैतून झाड’ हे नाव दिले, पण मोठी गर्जना करून त्याने त्याला आग लावली व त्याच्या फांद्या मोडल्या.
17इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ह्यांनी बआलमूर्तीस धूप जाळून मला चिडवण्याचे दुष्कर्म केले आहे; म्हणून ज्या सेनाधीश परमेश्वराने तुला लावले त्याने तुला अरिष्टाची शिक्षा सांगितली आहे.”
यिर्मयाविरुद्ध कट
18परमेश्वराने मला ते कळवले; व मला ते कळले तेव्हा तू मला त्यांची कर्मे दाखवली.
19मी तर सौम्य कोकरासारखा होतो; नकळत ते मला वधण्यास नेत होते. “ह्या झाडाचा आपण फळासकट नाश करू व त्याच्या नावाचे स्मरण पुन्हा होऊ नये म्हणून त्याला जिवंताच्या भूमीवरून नाहीसे करू,” असा त्यांचा माझ्याविरुद्ध कट चालला होता.
20तथापि हे सत्य न्याय करणार्‍या, अंतर्याम व हृदय पारखणार्‍या, सेनाधीश परमेश्वरा, त्यांचा तू सूड घेशील तो मला पाहू दे, कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे मांडली आहे.
21अनाथोथचे जे लोक माझ्या जिवावर टपले असून म्हणतात की, “तू परमेश्वराच्या नामाने संदेश देऊ नकोस, देशील तर आमच्या हातून मरशील,” त्यांच्याविरुद्ध परमेश्वर बोलला आहे.
22सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, त्यांना मी शिक्षा करीन; त्यांचे तरुण तलवारीने मरतील, त्यांचे पुत्र व कन्या दुष्काळाने फस्त होतील.
23त्यांतला कोणी शेष उरणार नाही, कारण अनाथोथ-करांवर मी अरिष्ट, त्यांची खबर घेण्याचा वर्षकाळ आणतो.”

सध्या निवडलेले:

यिर्मया 11: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन