YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 5

5
यरुशलेम व यहूदा ह्यांची पापे
1यरुशलेमेच्या गल्ल्यांतून इकडून तिकडे धावा व पाहून आपली खातरी करून घ्या; तिच्या चौकांत शोध करा की कोणी न्यायाने वागणारा, सत्याची कास धरणारा सापडेल काय? सापडल्यास मी त्याला क्षमा करीन.
2“परमेश्वराच्या जीविताची शपथ,” असे ते म्हणतात, तरी ती शपथ खोटी आहे.
3हे परमेश्वरा, तुझे नेत्र सत्याकडे नाहीत काय? तू त्यांना ताडन करतोस तरी ते दु:खित होत नाहीत; तू त्यांना क्षीण करतोस तरी ते ताळ्यावर येत नाहीत, ते आपली मुखे वज्रापेक्षा कठीण करतात, ते वळत नाहीत.
4तेव्हा मी म्हटले, “हे तुच्छ आहेत, हे मूर्ख आहेत; परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाचे नियम त्यांना ठाऊक नाहीत.
5ह्याकरता मी महाजनांकडे जाऊन त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग, त्यांच्या देवाचे नियम ठाऊक आहेत.” पण त्यांनी तर जोखड साफ मोडले आहे व बंधने तोडून टाकली आहेत.
6ह्यास्तव रानातला सिंह त्यांना फाडील, वनातला लांडगा त्यांना फस्त करील, चित्ता त्यांच्या नगरांजवळ दबा धरून तेथून बाहेर पडणार्‍या प्रत्येकाचे फाडून तुकडे करील; कारण त्यांचे अपराध व त्यांची मागे घसरणी ही बहुत आहेत.
7“मी तुला क्षमा कशी करू? तुझ्या पुत्रांनी मला सोडले आहे व जे देव नाहीत त्यांची त्यांनी शपथ वाहिली आहे; मी त्यांना पोटभर चारले तेव्हा त्यांनी जारकर्म केले व वेश्यांच्या घरात गर्दी केली.
8खाऊन मस्त झालेल्या घोड्यांप्रमाणे ते चोहोकडे फिरतात; त्यांतला प्रत्येक आपल्या शेजार्‍याच्या बायकोला पाहून खिंकाळतो.
9परमेश्वर म्हणतो, ह्याबद्दल मी नाही का समाचार घेणार? माझा आत्मा ह्या असल्या राष्ट्रांचे पारिपत्य नाही का करणार?
10तिच्या द्राक्षवेलांच्या रांगांत शिरा व नासधूस करा; तरी पूर्ण नासधूस करू नका. तिच्या फांद्या तोडून टाका. त्या परमेश्वराच्या नाहीत.
11कारण इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे ही माझ्याशी बेइमानपणे वागली आहेत असे परमेश्वर म्हणतो.
12ते परमेश्वराला अवमानून म्हणतात, ‘तो नाहीच; आमच्यावर अरिष्ट म्हणून येणार नाही, आम्ही तलवार व दुष्काळ पाहणार नाही.
13संदेष्टे वायुरूप होतील, त्यांच्याकडे संदेश नाही; त्यांची अशी गती होईल.”’
14ह्यामुळे परमेश्वर, सेनाधीश देव म्हणतो, “तुम्ही असे बोलता म्हणून पाहा, मी आपले शब्द तुझ्या मुखात अग्नी असे आणि हे लोक सरपण असे करीन आणि तो त्यांना खाऊन टाकील.
15परमेश्वर म्हणतो, हे इस्राएलाच्या घराण्या, पाहा, मी तुमच्यावर दुरून एक राष्ट्र आणतो; ते बळकट व प्राचीन राष्ट्र आहे; तुला त्यांची भाषा माहीत नाही, तुला त्यांचे बोलणे समजणार नाही.
16त्यांचा भाता उघडी कबर आहे; ते सर्व पराक्रमी वीर आहेत.
17ते तुझे पीक, तुझ्या मुलाबाळांचे अन्न खाऊन टाकतील; ते तुझी शेरडेमेंढरे, तुझी गुरेढोरे, खाऊन टाकतील; तुझ्या द्राक्षलता व अंजिरांची झाडे फस्त करतील; ज्या तटबंदीच्या नगरांवर तुझी भिस्त आहे त्यांना ते तलवारीने उद्ध्वस्त करतील.”
18“तरी त्या दिवसांतही मी तुमचा पुरा अंत करणार नाही, असे परमेश्वर म्हणतो.
19जर तुम्ही म्हणाल की, ‘परमेश्वर आमचा देव त्याने आमचे असे का केले?’ तर तू त्यांना सांग की, ‘तुम्ही मला सोडून आपल्या देशात अन्य दैवतांची सेवा केली तशी जो देश तुमचा नाही त्यात तुम्ही परक्यांची सेवा कराल.”’
20याकोबघराण्यामध्ये हे पुकारा आणि यहूदामध्ये जाहीर करून म्हणा की,
21“मूर्ख, बुद्धिहीन लोकहो, हे आता ऐका; तुम्हांला डोळे असून दिसत नाही. तुम्हांला कान असून ऐकू येत नाही.
22परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे भय धरणार नाही काय? माझ्यापुढे थरथर कापणार नाही काय? मी तर समुद्राला वाळू ही सीमा नेमली आहे; ही सर्वकाळची मर्यादा त्याच्याने उल्लंघवत नाही; त्याच्या लाटा उचंबळतात तरी त्यांचे काही चालत नाही; त्या गर्जना करतात तरी त्यांना ती उल्लंघवत नाही.
23तरी ह्या लोकांचे हृदय हट्टी व फितुरी आहे; ते फितून निघून गेले आहेत.
24‘जो परमेश्वर आमचा देव आम्हांला पाऊस देतो, योग्य समयी आगोटीच्या व वळवाच्या पावसाचा वर्षाव करतो, जो कापणीची नेमलेली सप्तके आमच्यासाठी राखून ठेवतो त्याचे भय आम्ही धरू,’ असे ते आपल्या मनात म्हणत नाहीत.
25तुमच्या दुष्कर्मांनी ही फिरवली आहेत, तुमच्या पातकांनी तुमचे हित रोखून धरले आहे.
26कारण माझ्या लोकांमध्ये दुष्ट जन आढळतात, ते फासेपारध्याप्रमाणे दबा धरतात; ते सापळा मांडून माणसांना धरतात.
27पिंजरा पक्ष्यांनी भरलेला असतो तशी त्यांची घरे कपटाच्या प्राप्तीने भरलेली असतात; म्हणून ते थोर व श्रीमंत झाले आहेत.
28ते धष्टपुष्ट व तेजस्वी झाले आहेत, ते दुष्कर्माची कमाल करतात; आपली चलती व्हावी म्हणून ते पोरक्यांचा न्याय करीत नाहीत, कंगालांस न्याय देत नाहीत.
29परमेश्वर म्हणतो ह्या गोष्टींबद्दल मी त्यांचा समाचार नाही का घेणार? माझा आत्मा ह्या असल्या राष्ट्रांचे पारिपत्य नाही का करणार?”
30चकित करणारे अघोर कृत्य देशात घडले आहे.
31संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?

सध्या निवडलेले:

यिर्मया 5: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन