YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 4

4
1“परमेश्वर म्हणतो, हे इस्राएले, जर तू माझ्याकडे वळशील, आपली अमंगल कृत्ये माझ्यासमोरून दूर करशील, बहकणार नाहीस,
2आणि सत्याने, न्यायाने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठायी आपणांस धन्य गणतील व त्याचा अभिमान बाळगतील.”
3कारण परमेश्वर यहूदा व यरुशलेम ह्यांतल्या लोकांना म्हणतो, “आपली पडीत जमीन नांगरा, काट्यांमध्ये पेरू नका.
4यहूदाचे लोकहो, यरुशलेमकरहो, परमेश्वराप्रीत्यर्थ आपली सुंता करा, आपल्या अंत:करणाची सुंता करा; नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझणार नाही असा पेटेल.”
यहूदावरील स्वारीचे भय
5यहूदात पुकारा, यरुशलेमेत जाहीर करा, आणि म्हणा की, “देशात रणशिंग फुंका; जोराने ओरडून म्हणा, ‘एकत्र व्हा, चला, आपण तटबंदीच्या नगरात जाऊ.’
6सीयोनेच्या दिशेकडे ध्वजा उभारा; आश्रयासाठी पळा, थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट, मोठा नाश आणत आहे.
7सिंह आपल्या झाडीतून बाहेर निघाला आहे; राष्ट्रांना फस्त करणारा वाट चालत आहे, तुझा देश ओस करण्यासाठी, तुझी नगरे उजाड, निर्जन करण्यासाठी तो आपल्या स्थानातून निघाला आहे;
8म्हणून तुम्ही कंबरेस गोणपाट गुंडाळा, शोक व आक्रंदन करा; कारण आमच्यावरला परमेश्वराचा तीव्र कोप अजून गेला नाही.”
9“परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की राजाचे व सरदारांचे काळीज ठाव सोडील; याजकांची त्रेधा उडेल आणि संदेष्टे भयचकित होतील.”
10तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, ‘तुमचे कुशल होईल’ असे म्हणून तू ह्या लोकांना व यरुशलेमेस खरोखर फारच चढवले आहेस; इकडे तर तलवार जिवाला जाऊन भिडली आहे.”
11त्या काळी ह्या लोकांना व यरुशलेमेस म्हणतील, “रानातील उजाड टेकड्यांवरून उष्ण वारा माझ्या लोकांच्या कन्येवर येत आहे, तो काही विंझणवारा म्हणून किंवा स्वच्छ करण्यासाठी येत नाही.
12ह्या कामास लागतो त्याहून जोराचा वारा माझ्या कार्यासाठी येईल; मी आता त्यांच्या शिक्षाही सांगतो.”
13पाहा, ढगांप्रमाणे तो येत आहे, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत; त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्ही हायहाय करणार, आमचे वाटोळे झाले आहे!
14हे यरुशलेमे, तू आपल्या अंत:करणाची दुष्टता धुऊन टाक, म्हणजे वाचशील. तुझे वाईट विचार तुझ्यामध्ये कोठवर वसणार?
15कारण दानाकडून वाणी येत आहे, एफ्राईम डोंगराकडून अरिष्टाची घोषणा होत आहे.
16ती राष्ट्रांना सांगा, पाहा, ती यरुशलेमेस जाहीर करा; “दूर देशातून वेढा घालणारे येत आहेत, यहूदाच्या नगरांसमोर ते ललकारत आहेत.
17शेत राखणार्‍यांसारखे त्यांनी तिला चोहोकडून घेरले आहे, कारण तिने माझ्याशी फितुरी केली आहे, असे परमेश्वर म्हणतो.
18तुझे वर्तन व तुझी कर्मे ह्यांमुळे तुला हा प्रसंग प्राप्त झाला आहे. ही तुझी दुष्टता आहे, ती खरोखर क्लेशदायी आहे; तुझ्या हृदयास ती भिडली आहे.”
19माझी आतडी तुटतात हो तुटतात! माझ्या हृदयकोशास वेदना होत आहेत! माझे अंतर्याम अस्वस्थ झाले आहे! माझ्याने स्तब्ध राहवत नाही! कारण माझ्या जिवा, कर्ण्याचा नाद, रणशब्द तू ऐकला आहेस.
20नाशावर नाश पुकारला आहे; कारण सर्व देश लुटला आहे; माझे डेरे अकस्मात माझ्या कनाती क्षणात लुटल्या आहेत.
21मी ध्वजा कोठवर पाहू? कर्ण्याचा शब्द कोठवर ऐकू?
22“कारण माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत; ती निर्बुद्ध, असमंजस अशी मुले आहेत; वाईट करण्यात ती हुशार आहेत, पण बरे करण्याचे त्यांना ज्ञान नाही.”
23मी पृथ्वीकडे पाहिले तर ती वैराण व शून्य झाली आहे; आकाशाकडे पाहिले तर त्यात प्रकाश नाही.
24मी पर्वतांकडे पाहिले तर ते कापत आहेत; सर्व डोंगर डळमळत आहेत.
25मी पाहिले तर कोणी मनुष्य नाही व आकाशातील सर्व पक्षी उडून गेले आहेत.
26मी पाहिले तर पाहा, बागाईत वैराण झाली आहे व परमेश्वरासमक्ष, त्याच्या तीव्र कोपाने तेथील सर्व नगरे नष्ट झाली आहेत.
27परमेश्वर म्हणतो, “सर्व देश उजाड होईल; पण मी त्याचा पुरा अंत करणार नाही.
28ह्यामुळे पृथ्वी शोक करील, वर आकाश काळे होईल; कारण मी असे बोललो आहे, मी हे योजले आहे; मी अनुताप पावणार नाही; मी माघार घेणार नाही.”
29घोडेस्वारांच्या व तिरंदाजांच्या शब्दांनी सर्व शहर पळत आहे; ते झाडीत, खडकांच्या फटीत लपत आहेत; लोकांनी प्रत्येक नगर सोडले आहे, कोणी माणूस त्यात राहत नाही.
30हे लुटलेले, तू काय करशील? तू जांभळे वस्त्र नेसलीस, सोन्याच्या अलंकारांनी भूषित झालीस, काजळ घालून आपले डोळे मोठे केलेस, तरी तुझी सुरेख दिसण्याची खटपट व्यर्थ आहे; तुझे जार तुला तुच्छ मानतात, ते तुझ्या प्राणावर टपत आहेत.
31वेणा देणार्‍या स्त्रीच्या शब्दासारखा शब्द मी ऐकत आहे; प्रथम प्रसूत होणार्‍या स्त्रीच्या वेदनांप्रमाणे वेदना ऐकत आहे; सीयोनेच्या कन्येचा स्वर ऐकू येत आहे; ती उसासे टाकत आहे, ती आपले हात पसरत आहे; ती म्हणत आहे, “हाय रे हाय! कारण ह्या मनुष्यघातक्यापुढे माझा जीव घाबरा होत आहे.”

सध्या निवडलेले:

यिर्मया 4: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन