यिर्मया 6
6
यरुशलेम व यहूदा ह्यांचा र्हास
1बन्यामीनवंशजहो, यरुशलेमेतून रक्षणार्थ पळून जा, तकोवात रणशिंग फुंका, बेथ-हक्करेमावर ध्वज उभारा; कारण उत्तरेकडून अरिष्ट व मोठा नाश डोकावत आहे.
2सुंदर व सुकुमार अशा त्या सीयोनकन्येचा मी उच्छेद करीन.
3मेंढपाळ आपले कळप घेऊन तिच्याकडे येतील, तिच्या आसपास आपले तंबू ठोकतील, त्यांच्यातला प्रत्येक आपापल्या स्थानी चरेल.
4“तिच्याशी लढण्याची तयारी करा; उठा, आपण दुपारी चढाई करू. हाय हाय! दिवस कलला आहे, संध्याकाळची छाया वाढत आहे.”
5“उठा, आपण रात्री चढाई करून तिच्या वाड्यांचा नाश करू.”
6कारण सेनाधीश परमेश्वर म्हणाला आहे की : “झाडे तोडून यरुशलेमेसमोर मोर्चा रचा. पारिपत्य करायचे ते ह्याच नगराचे; त्याच्यात जुलूमच जुलूम माजला आहे.
7झर्यांतून जसे नित्य नवे पाणी येते तशी त्यात नित्य नवी दुष्टता घडते; त्याच्या ठायी बलात्कार व लुटालूट ह्यांचा गोंगाट ऐकू येतो; नित्य माझ्यासमोर रोग आणि जखमा आहेत.
8यरुशलेमे, शुद्धीवर ये, नाहीतर तुझ्यावरचा माझा जीव उडेल, मी तुला ओसाड व निर्जन भूमी करीन.”
9सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “द्राक्षलतांचा सरवा काढतात तसा अवशिष्ट इस्राएलाचा सरवा साफ काढून नेतील; द्राक्षे खुडणार्यांप्रमाणे तू आपला हात डाहळ्यांना घाल.”
10मी हे कोणाला सांगून पटवू म्हणजे ते ऐकतील? पाहा, त्यांचा कान बेसुनत आहे, त्यांना ऐकू येत नाही; पाहा, परमेश्वराचे वचन त्यांना निंदास्पद झाले आहे, त्यात त्यांना काही संतोष वाटत नाही.
11ह्याकरता मी परमेश्वराच्या संतापाने भरलो आहे; तो दाबून ठेवता ठेवता मी थकलो आहे; “रस्त्यातल्या पोरांवर, तरुणांच्या जमावावर तो सोड; नवरा व बायको, वृद्ध व पुर्या वयाचे ह्या सर्वांना तो गाठील.
12त्यांची घरे, शेते व स्त्रिया ही सर्व दुसर्यांच्या हाती जातील; मी आपला हात देशाच्या रहिवाशांवर उगारीन,” असे परमेश्वर म्हणतो.
13“कारण लहानथोर सर्व स्वहिताला हपापलेले आहेत; संदेष्ट्यापासून याजकापर्यंत सगळे कपटाचा व्यवहार करतात.
14शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांचा घाय ते वरवर बरा करतात.
15त्यांनी अमंगल कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना लाज मुळीच वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील,” असे परमेश्वर म्हणतो.
16परमेश्वर म्हणतो, “चवाठ्यावर उभे राहून पाहा आणि पुरातन मार्गांपैकी कोणता म्हणून विचारा; सन्मार्गाने चाला; अशाने तुमच्या जिवास विश्रांती मिळेल;” पण ते म्हणाले, ‘आम्ही चालणार नाही.’
17मी तुमच्यावर पहारेकरी ठेवून तुम्हांला म्हटले, ‘रणशिंगाचा शब्द ऐका;’ पण ते म्हणाले, ‘आम्ही ऐकत नाही.’
18ह्याकरता राष्ट्रांनो, तुम्ही ऐका; जमलेले लोकहो, त्यांचे काय होते ते समजून घ्या.
19अगे पृथ्वी, ऐक; पाहा, मी ह्या लोकांच्या कल्पनांचे फळ, अर्थात विपत्ती, त्यांच्यावर आणीन; कारण त्यांनी माझी वचने ऐकली नाहीत, माझ्या नियमशास्त्राचा त्यांनी धिक्कार केला आहे.
20शबाहून ऊद व दूर देशाहून अगरू माझ्याकडे आणण्याचे काय प्रयोजन? तुमच्या होमबलींनी मला संतोष नाही, तुमचे यज्ञबली मला पसंत नाहीत.
21ह्याकरता परमेश्वर म्हणतो, पाहा, मी ह्या लोकांच्या वाटेत अडथळे ठेवीन, बाप व लेक दोघेही त्यांवर ठोकर खाऊन पडतील; शेजारी आणि त्याचा मित्र हे नाश पावतील.”’
22परमेश्वर असे म्हणतो की : “पाहा, उत्तर देशाहून एक राष्ट्र येत आहे; पृथ्वीच्या दिगंतापासून एक मोठे राष्ट्र उठत आहे.
23ते लोक धनुष्ये व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही, ते सागराप्रमाणे गर्जना करतात; ते घोड्यांवर स्वार झाले आहेत; हे सीयोनकन्ये, ते युद्धास सिद्ध होऊन तुझ्याविरुद्ध एकजुटीने येत आहेत.”
24आम्ही त्यांचा लौकिक ऐकला आहे, आमचे हात गळून गेले आहेत; आम्हांला क्लेश झाला आहे. प्रसवणार्या स्त्रीप्रमाणे वेणा लागल्या आहेत.
25मैदानात जाऊ नकोस, कारण शत्रूची तलवार व भीती चोहोकडे आहे.
26माझ्या लोकांच्या कन्ये, कंबरेला गोणपाट गुंडाळ, राखेत लोळ; एकुलत्या एका मुलाविषयीच्या शोकाप्रमाणे शोक व आक्रंदन कर; कारण लुटारू आमच्यावर एकाएकी येईल.
27“तू त्याचा मार्ग जाणावा व पारखावा म्हणून मी तुला माझ्या लोकांत पारख करणारा1 व दुर्ग असे ठेवले आहे.
28ते सर्व फितुर्यांतले फितुरी आहेत, ते चोहोकडे चहाड्या करीत फिरतात; ते पितळ व लोखंड आहेत, त्या सर्वांची वर्तणूक बिघडली आहे.
29भाता फुंक फुंक फुंकला आहे, शिसे जळून खाक झाले आहे; ते गाळून गाळून थकले आहेत, तरी दुष्टांची छाननी काही झाली नाही.
30त्यांना टाकाऊ रुपे म्हणतील, कारण परमेश्वराने त्यांना टाकले आहे.”
सध्या निवडलेले:
यिर्मया 6: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.