YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 27

27
जुवांवरून धडा
1यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या आंरभी यिर्मयाला परमेश्वराचे हे वचन प्राप्त झाले.
2परमेश्वर मला म्हणाला, “तू आपणासाठी बंधने व जू तयार करून आपल्या मानेवर ठेव.
3आणि ती यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याकडे यरुशलेमास जे जासूद आले आहेत त्यांच्या हस्ते अदोमाचा राजा, मवाबाचा राजा, अम्मोन्यांचा राजा, सोराचा राजा आणि सीदोनाचा राजा ह्यांच्याकडे पाठव;
4आणि त्यांना त्यांच्या धन्यांकडे असा निरोप देऊन पाठव की, ‘सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, तुम्ही आपल्या धन्यांना हे सांगा,
5मी आपल्या महाशक्तीने, आपले बाहू उभारून पृथ्वी आणि पृथ्वीच्या पाठीवर असलेली माणसे व पशू ह्यांना निर्माण केले आहे, व मला योग्य वाटेल त्यांना ती मी देतो.
6आता हे सर्व देश मी आपला सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याच्या हाती दिले आहेत; त्याची सेवाचाकरी करण्यास वनांतील पशूही मी त्याला दिले आहेत.
7सर्व राष्ट्रे त्याची सेवा करतील, त्याच्या पुत्रपौत्रांचीही सेवा करतील; मग त्याच्या देशाची वेळ येईल तेव्हा बहुत राष्ट्रे व थोर राजे त्याच्याकडून सेवा करवून घेतील.
8बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची सेवा जे राष्ट्र व राज्य करणार नाही आणि बाबेलच्या राजाच्या जोखडाला मान देणार नाही, अशा राष्ट्राचा त्याच्या हातून मी अंत करीपर्यंत तलवार, दुष्काळ आणि मरी ह्यांनी मी समाचार घेईन.
9तुमचे संदेष्टे, तुमचे दैवज्ञ, तुमचे स्वप्नद्रष्टे, तुमचे मांत्रिक व तुमचे जादूटोणा करणारे तुम्हांला म्हणतात की, ‘बाबेलच्या राजाची सेवा करू नका.’ त्यांचे तुम्ही ऐकू नका;
10कारण मी तुम्हांला तुमच्या देशातून घालवावे, तुम्हांला हाकून लावावे व तुम्ही नष्ट व्हावे म्हणून ते तुम्हांला खोटा संदेश देतात.
11तथापि जे कोणी बाबेलच्या राजाच्या जोखडाला आपली मान देतील व त्याची सेवा करतील त्यांना मी त्यांच्याच देशात राहू देईन; ते शेती करतील व देशात वस्ती करतील,” असे परमेश्वर म्हणतो.
12ह्या सर्व वचनांप्रमाणे यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला मी म्हणालो की, “बाबेलच्या राजाच्या जोखडाला आपली मान द्या, त्याची व त्याच्या लोकांची सेवा करा म्हणजे तुम्ही जगाल.
13जे राष्ट्र बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही त्याविषयी परमेश्वराने सांगितले आहे की, तलवार, दुष्काळ आणि मरी ह्यांनी ते मरेल, त्याप्रमाणे तू व तुझे लोक का मरता?
14जे संदेष्टे तुम्हांला सांगतात की, ‘तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करू नका’ त्यांची वचने ऐकू नका; कारण ते तुम्हांला खोटा संदेश देतात.
15परमेश्वर म्हणतो, मी त्यांना पाठवले नाही, पण ते माझ्या नामाने खोटा संदेश देतात; ह्यास्तव मी तुम्हांला व तुम्हांला संदेश देणार्‍या संदेष्ट्यांना हाकून देईन आणि तुम्ही नष्ट व्हाल.”
16तसेच मी याजकांना व सर्व लोकांना म्हणालो : “परमेश्वर म्हणतो, जे तुमचे संदेष्टे तुम्हांला सांगतात की, ‘पाहा, परमेश्वराच्या मंदिराची पात्रे लवकरच बाबेलहून परत आणण्यात येतील’ त्यांचे हे बोलणे ऐकू नका; कारण ते तुम्हांला खोटा संदेश देतात.
17त्यांचे ऐकू नका; बाबेलच्या राजाची सेवा करून आपला जीव वाचवा; ह्या नगराची नासाडी का व्हावी?
18ते जर संदेष्टे असले व परमेश्वराचे वचन त्यांच्याजवळ असले तर परमेश्वराच्या मंदिरात, यहूदाच्या राजगृहात व यरुशलेमेत जी पात्रे उरली आहेत ती बाबेलास जाऊ नयेत अशी त्यांनी सेनाधीश परमेश्वराकडे विनंती करून पाहावी.
19गंगाळसागर, स्तंभ, गंगाळाच्या बैठकी व इतर पात्रे ह्या नगरात उरली होती त्यांविषयी सेनाधीश परमेश्वर ह्याप्रमाणे म्हणतो,
20बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने यहूदाचा राजा यहोयाकीमाचा पुत्र यकन्या ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांतील सर्व सरदारांसह पकडून यरुशलेमेतून बाबेलास नेले तेव्हा त्याने पात्रे नेली नव्हती;
21ही जी पात्रे परमेश्वराच्या मंदिरात, यहूदाच्या राजगृहात व यरुशलेमेत राहिली होती त्यांविषयी सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो की,
22ती बाबेलास नेण्यात येतील व मी त्यांचा समाचार घेईपर्यंत ती तेथेच राहतील; मग मी ती तेथून घेऊन ह्या स्थली परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो.”

सध्या निवडलेले:

यिर्मया 27: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन