YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 28

28
हनन्याचे खोटे भविष्य
1नंतर असे झाले की त्याच वर्षी यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्या कारकिर्दीच्या आरंभी चौथ्या वर्षाच्या पाचव्या महिन्यात गिबोनकर संदेष्टा हनन्या बिन अज्जूर ह्याने परमेश्वराच्या मंदिरात याजकांसमोर व सर्व लोकांसमोर मला असे सांगितले की,
2“सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव असे म्हणतो : मी बाबेलच्या राजाचे जू मोडून टाकले आहे.
3बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याने परमेश्वराच्या मंदिरातली जी पात्रे ह्या स्थलातून घेऊन बाबेलास नेली ती सर्व दोन वर्षांच्या आत मी ह्या स्थळी परत आणीन.
4यहूदाचा राजा यकन्या बिन यहोयाकीम व बाबेलास पकडून नेलेले यहूदाचे सर्व लोक ह्यांना मी ह्या ठिकाणी परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो; कारण मी बाबेलच्या राजाचे जू मोडून टाकीन.”
5तेव्हा जे याजक व जे सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते त्यांच्यासमक्ष यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्याला म्हणाला,
6“आमेन! परमेश्वर असे करो! परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे व बंदिवासातले सर्व लोक बाबेलहून ह्या स्थळी परत आणण्याविषयी जी वचने तू संदेशरूपाने सांगितली त्यांप्रमाणे परमेश्वर करो.
7मात्र जे वचन मी तुझ्या कानी व सर्व लोकांच्या कानी पाडतो ते ऐक.
8माझ्या व तुझ्यापूर्वी जे संदेष्टे प्राचीन काळापासून होऊन गेले त्यांनी, अनेक देश व मोठी राज्ये ह्यांच्यावर लढाई, अरिष्ट व मरी येईल असा त्यांच्याविरुद्ध संदेश दिला.
9कोणी संदेष्टा शांतीचा संदेश देतो तेव्हा त्या संदेष्ट्याचे वचन प्रत्ययास आले म्हणजे समजावे की खरोखर परमेश्वराने त्याला पाठवले आहे.”
10तेव्हा हनन्या संदेष्ट्याने यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवर असलेले जोखड काढून मोडले.
11आणि तो सर्व लोकांसमक्ष म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ह्याचप्रमाणे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याचे जू मी पुर्‍या दोन वर्षांच्या आत सर्व राष्ट्रांच्या मानेवरून उतरवून मोडून टाकीन.” मग यिर्मया संदेष्टा आपल्या वाटेने गेला.
12यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवरून जोखड काढून हनन्या संदेष्ट्याने मोडल्यावर यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे :
13जा, हनन्याला सांग की, ‘परमेश्वर म्हणतो, तू लाकडी जोखडे मोडून टाकली, पण त्यांच्याऐवजी लोखंडी जोखडे मी करीन.1
14कारण सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, ह्या सर्व राष्ट्रांनी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याची सेवा करावी म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडी जू ठेवले आहे; त्यांना त्याची सेवा करावी लागेल, मी त्याला वनातले पशूही दिले आहेत.”’
15मग यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्याला म्हणाला : “हनन्या, आता हे ऐक; परमेश्वराने तुला पाठवले नाही; तू ह्या लोकांना लबाडीवर भरवसा ठेवायला लावलेस.
16ह्याकरता परमेश्वर असे म्हणतो, ‘मी तुला भूपृष्ठावरून काढून टाकीन; तू परमेश्वराविरुद्ध फितुरीचे भाषण केले म्हणून ह्या वर्षी तू खरोखर मरशील.”’
17त्याप्रमाणे त्याच वर्षी सातव्या महिन्यात हनन्या संदेष्टा मेला.

सध्या निवडलेले:

यिर्मया 28: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन