YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 35

35
देवाच्या लोकांचे पुनर्वसन
1अरण्य व रुक्ष भूमी ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल.
2ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील; लबानोनाची शोभा त्याला मिळेल; कर्मेल व शारोन ह्यांचे ऐश्वर्य त्याला प्राप्त होईल; ती परमेश्वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्वर्य पाहतील.
3गलित हस्त दृढ करा; लटपटणारे गुडघे बळकट करा.
4घाबर्‍या मनाच्यांस म्हणा, “धीर धरा, भिऊ नका; पाहा, तुमचा देव सूड घेण्यास, अनुरूप असे प्रतिफल देण्यास येईल;” तो येईल व तुमचा उद्धार करील.
5तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिर्‍यांचे कान खुले होतील.
6तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील; कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील.
7जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल; तृषित भूमीच्या ठिकाणी उसळत्या पाण्याचे झरे होतील; कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू व लव्हाळे ह्यांसहित गवत उगवेल.
8तेथील मार्ग राजमार्ग होईल; त्याला पवित्र मार्ग म्हणतील; त्याने अपवित्र जन जाणार नाहीत; पण तो त्यांच्यासाठीच, परमेश्वराच्या लोकांसाठी होईल; त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत.
9तेथे सिंह असणार नाहीत, हिंस्र पशूंचा तेथे रिघाव होणार नाही, तेथे ते आढळणार नाहीत; पण तेथे उद्धरलेले संचार करतील.
10मुक्त केलेले परमेश्वराचे लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील; ते आनंद व हर्ष पावतील, दु:ख व उसासे पळ काढतील.

सध्या निवडलेले:

यशया 35: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन